Crop Advisory Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कोकण विभागातील फळबागांसाठी कृषी सल्ला

Crop Protection : काजूच्या नवीन आलेल्या पालवीवर ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. ही कीड पालवीतील रस शोषून घेत असल्यामुळे नवीन पालवी सुकून जाते.

Team Agrowon

काजू

पालवी अवस्था

काजूच्या नवीन आलेल्या पालवीवर ढेकण्या (टी मॉस्किटो बग) किडीचा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. ही कीड पालवीतील रस शोषून घेत असल्यामुळे नवीन पालवी सुकून जाते. या किडीच्या नियंत्रणासाठी, लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ६ मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.

काजू बागेतील गवत, रोगग्रस्त फांद्या काढून बागेची साफसफाई करावी.

सुपारी

फळधारणा

ऑक्टोबर महिन्यात सूर्यप्रकाशाची तीव्रता आणि एकूणच उष्णतेचे प्रमाण अधिक असते. सुपारीच्या खोडावर दक्षिण व पश्‍चिम दिशेकडून पडणाऱ्या तीव्र सूर्यकिरणांमुळे ठरावीक भागातील खोड भाजून निघते. भाजलेल्या ठिकाणी ते खोलगट व काळे पडते. कालांतराने असे झाड वाऱ्यामुळे मोडून पडू शकते. आपल्या बागेतील तापमानाचा अंदाज घेऊन जिकडून तीव्र सूर्यप्रकाश अधिक काळ पडतो, त्या दिशेने खोडावर गवताचा पेंढा किंवा सुपारीच्या झावळ्या बांधाव्यात.

जिल्ह्यात काही ठिकाणी सुपारीची फळे तडकून, फुटून गळून पडताना दिसून येत आहेत. अशा वेळी पाणी द्यावे. बोरॅक्स (०.५ टक्के) म्हणजे अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे द्रावणाची झाडांवर फवारणी करावी.

आंबा

अ) वाढीची अवस्था

आंब्याला मोहर येण्यासाठी झाडाच्या मुळांना ताण बसणे आवश्यक असते. यासाठी आंबा बागेतील झाडांच्या बुंध्यालगतच्या एक मीटर परिघातील गवत काढून घ्यावे. आळ्यातील माती मोकळी करावी. बागेतील मोकळ्या जागेमध्ये उथळ अशी नांगरट करावी. बागेची साफसफाई शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी. त्यामुळे आंबा बागेतील जमिनीतील पाण्याचे प्रमाण लवकर कमी होण्यास मदत होईल. आणि झाडांना ताण बसण्यास मदत होईल.

ब) अतिजुनी बाग पुनरुज्जीवन करताना...

पारंपरिक पद्धतीने लागवड केलेल्या आंबा बागेमध्ये जुन्या अनुत्पादित झाडांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेल्या ‘मध्य फांदी छाटणी व इतर मध्यम फांद्यांची विरळणी’ या पद्धतीचा अवलंब करावा. या तंत्रज्ञानानुसार खूप जुन्या आणि उंच झाडांची छाटणी बुंध्यापासून दोन तृतीयांश उंचीवर करावी. कमी वयाच्या आणि कमी उंचीच्या झाडांची छाटणी १२ ते १५ फूट उंचीवर करावी.

छाटणी केलेल्या झाडांवर क्लोरपायरीफॉस ५ मि.लि. प्रति लिटर पाणी या प्रमाणे संपूर्ण झाडावर फवारणी करून झाड भिजवून घ्यावे. या कीटकनाशकाच्या द्रावणाची छाटणी केलेल्या झाडांच्या मुळांमध्ये देखील ओतावे. त्यानंतर १ लिटर ब्लॅक जपान डांबराच्या द्रावणामध्ये २.५ ग्रॅम कार्बेन्डाझिमची भुकटी मिसळून कापलेल्या फांद्यांच्या भागावर लावावे.

छाटणी केल्यानंतर सुरुवातीच्या काळात झाडाला १० ते १५ दिवसांच्या अंतराने १५० ते २०० लिटर पाणी द्यावे. नवीन फुटवे आल्यानंतर दोन आठवड्यांनी ३ ते ५ फुटवे ठेवून नवीन फुटव्यांची विरळणी करावी. पहिली विरळणी केल्यानंतर, छाटणी केलेल्या भागापासून खाली फुटवे येण्यास सुरुवात होते. या आलेल्या फुटव्यांपैकी दर फुटावर एक याप्रमाणे खोडाच्या सर्व बाजूंनी फुटवे ठेवून अन्य फुटवे काढून टाकावेत.

क) घन लागवडीतील छाटणी...

५ × ५ मी. किंवा ६× ४ मी. अंतरावर घन लागवड केलेल्या आंबा बागांमध्ये सुरुवातीच्या काळापासून नियमित छाटणी करणे आवश्यक असते. या छाटणीमध्ये उंची कमी करणे, फांद्या एकमेकांमध्ये गेल्या असल्यास छाटणे आणि वाळलेल्या फांद्या काढून टाकणे या गोष्टींचा अंतर्भाव असतो. घन लागवड असलेल्या बागांमधील कलमांची उंची दोन ओळींच्या अंतराच्या ८० टक्के इतकी ठेवावी.

वांगी, मिरची, टोमॅटो

रोपवाटिका तयारी

रब्बी हंगामासाठी मिरची, वांगी, टोमॅटो या पिकाची लागवड करण्यासाठी रोपवाटिका करावी लागेल. त्यासाठी जमीन वाफसा स्थितीत असताना मशागतीची कामे सुरू करावीत. वाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत ५०० किलो प्रति गुंठा मिसळावे. ३ मी. लांब × १ मी. रुंद × १५ सें.मी. उंचीचे गादीवाफे तयार करावे. पेरणीच्या वेळेस गादीवाफ्यावर प्रति चौरस मीटर ३५ ग्रॅम युरिया, १०० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट व २५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश मिसळून घ्यावे.

१० सें.मी. अंतरावर ओळीने बियाण्याची पेरणी करावी. पेरणी करण्याअगोदर बियाण्याद्वारे पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बियाण्यास थायरम ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची ५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात प्रक्रिया करावी. ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करतेवेळी किंचित पाणी लावून जैविक बुरशीनाशकाचे पातळ आवरण बियाण्याभोवती होईल, असे पाहावे.

नारळ

वाढीची ते फळधारणा

नारळ बागेमधील किडीच्या नियंत्रणासाठी मृत माडाची खोडे काढून नष्ट करावीत. पालापाचोळा गोळा करून बागेत स्वच्छता राखावी.

नारळावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. या किडीच्या व्यवस्थापनासाठी माडावर नीम तेल (०.५ टक्का) ५० मि.लि. प्रति १० लिटर पाणी या प्रमाणे १५ दिवसांच्या अंतराने तीन फवारण्या कराव्यात. त्यानंतर १० दिवसांच्या अंतराने पाण्याच्या तीन फवारण्या प्रेशर पंपाच्या साह्याने कराव्यात. यामुळे मित्रकीटकांचे संवर्धन होते. पांढरी माशी या किडींच्या व्यवस्थापनास मदत होते. किडीच्या प्रादुर्भावाकडे बागेचे नेहमी निरीक्षण करावे.

नारळावरील इरिओफाइड कोळीच्या प्रादुर्भावामुळे फळाच्या देठाखालच्या भागात पांढरट पिवळे त्रिकोणी चट्टे दिसून येतात. प्रादुर्भावग्रस्त भागावरील फळांचे आवरण तडकते, परिणामी नारळ लहान राहतात. लहान फळांची गळ होते. या किडीच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी नारळ बागेत स्वच्छता ठेवावी.

या बागेमध्ये कडूनिंबयुक्त कीटकनाशक ५ टक्के किंवा ॲझाडिरॅक्टीन (१५०० पीपीएम) ७.५ मि.लि. अधिक ७.५ मि.लि. पाणी किंवा फेनपायरेक्झिमेट (५ टक्के प्रवाही) १० मि.लि. अधिक २० मि.लि. पाणी मिसळून मुळांद्वारे द्यावे. हे द्रावण मुळांद्वारे दिल्यानंतर पुढील ४५ दिवसांपर्यंत नारळ काढू नयेत.

याशिवाय बुटक्या माडावर कडूनिंबयुक्त कीटकनाशक १ टक्का किंवा ॲझडिरॅक्टिन (१००० पीपीएम) ४ मि.लि. किंवा फेनपायरेक्झीमेट (५ टक्के प्रवाही) २ मि.लि. प्रति लिटर पाणी या द्रावणाची नारळाच्या घडावर पडेल अशी फवारणी करावी. फवारणी करण्यापूर्वी सर्व कीडग्रस्त व तयार नारळ काढून घ्यावेत. पडलेली फळे, फुलोरा गोळा करून नष्ट करावा.

नारळाच्या आळ्यामध्ये ओलावा टिकविण्यासाठी नारळाच्या शेंड्या पुराव्यात. तसेच वरून झावळ्यांचे आच्छादन करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT