Natural Resource Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Resource : निसर्गसंपदा वाचविण्याची अनोखी चळवळ

Team Agrowon

Save Natural Resources : पुणे शहराच्या सहकारनगर भागातील निसर्गप्रेमी आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रमधून निवृत्त झालेले कृषी अधिकारी बाळासाहेब फडणवीस (वय वर्षे ८८) यांनी चौदा वर्षांपूर्वी निसर्ग संवर्धनाची अनोखी चळवळ सुरू केली. यास स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. याबाबत बाळासाहेब फडणवीस म्हणाले, की सहकारनगर भाग हा पुणे शहरातील एक महत्त्वाचा हरित पट्टा आहे. या भागात रस्त्याकडेने तसेच सोसायटी, बंगल्यांच्या बागांमध्येही विविध फळझाडांची लागवड दिसते.

दरवर्षी आंबा, जांभूळ, फणस, चिकू ही झाडे फळांनी भरून जातात. परंतु ही फळे काढण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने पडून वाया जातात, ही एक प्रकारची निसर्गाची हानी आहे. याबाबत मी निसर्गप्रेमी व्यक्ती तसेच सामाजिक कार्यकर्ते राहुल माने यांना सोबत घेऊन परिसरातील घरमालक आणि सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना सांगितले, की आमच्याकडे गरजू दहा तरुणांचा गट आहे.

यामार्फत आम्ही झाडांची फळे मोफत काढून देऊ. घरमालकांना लागेल तेवढा फळांचा वाटा दिला जाईल, उर्वरित फळे सहकारनगर परिसरात स्टॉलवरून विक्री करणार आहोत. यास लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या वर्षी कैरी, चिकू, जांभूळ, फणस, शेवगा आदी फळांच्या विक्रीतून अकरा हजार रुपये मिळाले. हे सर्व पैसे गटातील युवकांना मेहनताना म्हणून वाटले. उपक्रमामुळे सोसायटी तसेच बंगलेधारकांची फळे काढण्यासाठी कुशल मजूर शोधण्याची चिंता मिटली आणि फळांची नासाडी थांबली.

दुसऱ्या वर्षी सहकारनगर परिसरातील गृहनिर्माण सोसायटी आणि चाळीस बंगलेधारकांनी आमच्याकडे हंगामापूर्वी संपर्क साधून कैरी, जांभूळ, चिकू, शेवगा आदी फळे युवा गटाकडून काढून घेण्यास सुरुवात केली. उपक्रमातून परिसरामध्ये १५ टन फळे विकली गेली. यातून एक लाख वीस हजार रुपयांची मिळकत झाली. उपक्रमाचा फायदा असा झाला, की पुण्याच्या विविध परिसरांतून आमच्या युवा गटाला सोसायटी, बंगल्यातील बागांतून फळे काढणीबाबत विचारणा होऊ लागली.

परंतु मर्यादित तरुणांचा गट असल्याने हा उपक्रम सहकारनगर, पर्वती पायथा भागांमध्येच मर्यादित ठेवावा लागला. पुढे कोरोनाच्या साथीमुळे उपक्रमात खंड पडल्याने गट विस्कळीत झाला. परंतु यंदा नव्याने पुन्हा एकदा गरजू तरुणांचा गट तयार करून उपक्रमाला चालना देण्याचा प्रयत्न आहे. आमच्या अनुभवातून शहरी आणि निमशहरी भागात निसर्ग संवर्धन, फळांची नासाडी थांबविण्यासाठी हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबविणे शक्य आहे.

‘कृषी मित्र’ उपक्रम

बॅंक ऑफ महाराष्ट्रमधून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची बॅंक ऑफ महाराष्ट्र सेवा निवृत्त संघटना आहे. गेल्या २५ वर्षांपासून ही संघटना विविध उपक्रम राबविते. यामध्ये बॅंकेतून निवृत्त झालेले कृषी अधिकारी आहेत. यांनी ग्राम विकासाला चालना देण्यासाठी कृषी मित्र गट तयार केला. याबाबत माहिती देताना बाळासाहेब फडणवीस म्हणाले, की संघटनेचे अध्यक्ष मोहन घोळवे, कार्याध्यक्ष भास्कर माणकेश्‍वर, सचिव नारायण अचलेकर यांच्या सहकार्याने दहा वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात गरजू शेतकऱ्यांसाठी उपक्रम राबवीत आहोत.

खरीव गावात ५० शेतकऱ्यांना बांधावर लागवडीसाठी फळझाडांची सहाशे कलमे दिली होती. तोरणा-राजगड परिसर समाजोन्नती न्यास यांच्या माध्यमातून भोर-वेल्हे तालुक्यातील तीन गावांमध्ये माती परीक्षण, फळझाडे लागवड, कुक्कुटपालन, हातसडी तांदूळ निर्मितीला चालना दिली आहे. गुहिणी, आंबेगाव परिसरातील शेतकऱ्यांना नाना जाधव यांच्या सहकार्याने मधमाशीपालनास सुरुवात होत आहे.

मधाचे गाव विकसित करण्यासाठी केव्हीआयसी आणि केव्हीआयबी या संस्थांच्या मदतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. महिलांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी हातसडी तांदूळ निर्मितीचे यंत्र घेऊन देत आहोत. सध्या गटातर्फे उत्पादित हातसडीचा तांदूळ थेट पुण्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. यामुळे महिलांना तांदळाचा रास्त दर मिळू लागला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलातील टेंभुर्णी फळांची उत्पादन वाढ आणि प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न आहे.

(बाळासाहेब फडणवीस ९३७०६५२९०९) - अमित गद्रे, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT