Anup Kumar Agrowon
ॲग्रो विशेष

Anup Kumar : शेतकऱ्यांच्या जाणिवांना समर्पित दैनिक

Team Agrowon

अनुप कुमार

Article by Anup Kumar : भारतातील कोणत्याही अन्य भाषेत ‘ॲग्रोवन’सारखा व्यापक वाचकवर्ग असलेले कृषी वर्तमानपत्र नाही. शेतकरीकेंद्रित जाणिवेतून सुरू झालेले हे वर्तमानपत्र वाचनीय आणि माहितीपूर्ण असते. दैनंदिन प्रशासकीय कामकाज पाहताना मला याचा अतिशय फायदा होतो, ही बाब मी नि:संकोचपणे मान्य करतो. कार्यालयात आल्यानंतर पहिल्यांदा मी या दैनिकातील प्रमुख बातम्या वाचून काढायला विसरत नाही. त्यातून अनेकदा आपल्या धोरणात्मक बाबींसंदर्भात सर्वसामान्य शेतकऱ्याचा दृष्टिकोन किंवा प्रतिक्रिया काय आहे हेही कळते. माझ्यासाठी फीडबॅक मॅकेनिझम म्हणून हे दैनिक उपयुक्त वाटते.

आजकाल अनेक मुद्रित, इलेक्ट्रॉनिक आणि वेब माध्यमे सवंग लोकप्रियतेसाठी निगेटिव्ह बातम्यांवर भर देताना दिसतात. लोकांना सुस्पष्ट, वस्तुनिष्ठ आणि परिपूर्ण माहिती देण्याची गरज असताना वरवरच्या माहितीवर आधारित बातम्या अनेक जण देत असतात. त्यामुळे लोकांचे नुकसान होते. ‘ॲग्रोवन’मधूनही अनेकदा प्रशासनाच्या विरोधात बातम्या येत असतात. त्यामुळे आम्हाला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पण हे क्वचित होते.

उदाहरणार्थ, पीकविम्याच्या संदर्भात पावसाच्या खंडाबाबत बातमी प्रसिद्ध झाली. ही बातमी शेतकऱ्यांना दिलासा देणारी असली तरी याबाबतीत राज्य सरकारची भूमिका मर्यादित आहे. पीकविम्याची नियमावली केंद्र सरकारने ठरवली आहे. त्याला अनुसरूनच कार्यवाही होत आहे. त्या मार्गदर्शक सूचना बदलण्याचे काम राज्य सरकार करू शकत नाही. शेतकरी मात्र त्यासाठी राज्य सरकारला दोषी धरतात. अर्थात, अशा बातम्यांमधून होणारी जनजागृतीही आवश्यक असते.

शेतकऱ्यांना उचित मार्गदर्शन केवळ सरकारी यंत्रणाच करेल असे नाही; तर ही जबाबदारी वृत्तपत्रांचीही आहे. ‘ॲग्रोवन’ ती पार पाडत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी सजग आहे. देशात समाजमाध्यमांचा सर्वाधिक वापर महाराष्ट्रात होतो. या माध्यमातून शेतकरी माहितीची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर करत आहेत. आज शेतकरी माहिती मिळविण्यासाठी कुठल्याही एक यंत्रणेवर अवलंबून नाहीत. अशा काळात अचूक माहिती देण्यासंदर्भात विश्‍वासार्हता महत्त्वाची ठरणार आहे.

शेतकऱ्यांना हवामानाच्या अचूक अंदाजाची माहिती देण्याला आता आपण प्राधान्य दिले पाहिजे. मुद्रित माध्यमांबरोबरच डिजिटल प्लॅटफॉर्म त्यासाठी उपयुक्त आहे. शेतकऱ्यांना रसायनांच्या अतिवापराचे परिणाम कळू लागले आहेत. अशा काळात सेंद्रिय कीडनाशकांचे महत्त्व पटवून देण्याबरोबरच योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे.

शेतकऱ्यांना चाकोरीबद्ध मार्गदर्शनाची गरज नाही. कालबाह्य गोष्टींपेक्षा शेतकरी आधुनिकतेकडे वळला पाहिजे, तशी निर्णयक्षमता तयार झाली पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे. कृषी महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या बाहेरही अनेक कृषितज्ज्ञ आहेत. त्यांनी दिलेली माहिती, सल्ला तपासून प्रकाशित करण्यावर भर द्यायला हवा. अनेक लेखक हे सरकारी भाषेत लिहितात. ते शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे वाचकांचा फिडबॅक घेऊन बदल केले, तर अंक अजून तरुण होत जाईल.

अनेक शासकीय अधिकारी निवृत्तीनंतर लिहायला उत्सुक असतात; पण ते शेतकऱ्यांच्या भाषेत, वाचनीय लिहितीलच असे नाही. शिवाय, सगळे ज्ञान काही शासकीय अधिकाऱ्यांनाच असते असे नाही. केळीमध्ये जाचक पॅटर्न, चंद्रपूरच्या दादासाहेब खोब्रागडेंनी विकसित केलेले एचएमटी वाण, राहीबाई पोपेरेंनी पारंपरिक बियाणे जतन करण्यासाठी केलेले मूलभूत काम अशी अनेक उदाहरणं सांगता येतील, की या माणसांनी आपापल्या क्षेत्रात विद्यापीठापेक्षाही मोठे काम केले आहे. तळागाळातील शेतकऱ्यांनी आपल्या ताकदीवर मोठ्या प्रमाणात यशोगाथा निर्माण केल्या आहेत. त्यांना या दैनिकात यथायोग्य स्थान मिळते, हे कौतुकास्पद आहे.

(शब्दांकन : बाळासाहेब पाटील)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Upsa Irrigation Scheme : परभणी, मानवत तालुक्यांत उपसा सिंचन योजना प्रस्तावित

Bullet Train : बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुसाट

Crop Loan : पीककर्ज वाटपप्रकरणी दाखल गुन्हे मागे घ्या

Panchganga Sugar Factory : पंचगंगा साखर कारखान्याच्या वार्षिक सभेला गालबोट, कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी

Electricity Bill Waive : कोल्हापुरातील पाणी संस्थांना वीजबिल माफीची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT