Akola News : राज्यात गेल्या काही वर्षांत उन्हाळी सोयाबीन लागवडीची हवा तयार झाली होती. उन्हाळ्यात सोयाबीन बीजोत्पादन हा ‘ट्रेंड’ झाला होता. मात्र ही पीकपद्धती उन्हाळ्यात परवडणारी नसल्याचे लक्षात येताच हा ट्रेंड यंदा अचानक नाहीसा झाला आहे. दोन वर्षांपूर्वी ४८ हजार हेक्टरपर्यंत पोहोचलेल्या उन्हाळी सोयाबीन लागवड क्षेत्रात यंदा तब्बल ९० टक्क्यांनी घट झाली आहे. राज्यात यंदा अवघी पावणेपाच हजार हेक्टर लागवड झाली आहे.
हवामान बदलाच्या काळात खरीप पिकांना दरवर्षी पीक काढणीच्या काळात मोठा फटका बसत असतो. याचा परिणाम पुढील हंगामासाठी लागणाऱ्या बियाण्यावरही झाल्याचे गेल्या काळात घडले. यामुळेच राज्यात खरीप हंगामासाठी खात्रीशीर सोयाबीन बियाण्याची तजवीज करण्यासाठी तसेच घरगुती बियाणे वापराकडे वाढलेला कल लक्षात घेता उन्हाळी बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते.
यामुळेच दोन वर्षांपूर्वी राज्यात उन्हाळी सोयाबीन लागवडीचे क्षेत्र ४८ हजार हेक्टरपर्यंत पोहोचले होते. मात्र यंदा या लागवडीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. यंदा मराठवाड्यात हिंगोली, परभणी जिल्ह्यांमध्येच प्रामुख्याने अडीच हजार हेक्टरपर्यंत झालेली लागवड सोडली, तर उर्वरित जिल्ह्यात कुठे १००, तर कुठे २०० हेक्टरपर्यंत पेरणी पोहोचली. राज्यात सर्व मिळून पाच हजार हेक्टरपर्यंतही क्षेत्र पोहोचू शकलेले नाही.
‘महाबीज’सारखी मोठी बियाणे उत्पादक कंपनीसुद्धा या प्रयोगात उतरली होती. दोन वर्षांपूर्वी ‘महाबीज’नेही राज्यात १० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर बीजोत्पादन घेतले. मात्र यातून तेव्हा ‘महाबीज’च्या हाताला फारसे काही लागले नव्हते.
‘महाबीज’ला अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात कच्चे बियाणे मिळाले. शिवाय हे बियाणे चाचण्यांमध्येही नापास ठरले. शेतकऱ्यांना बीजोत्पादनाशिवाय व्यावसायिक पद्धतीने पीक उत्पादनातही घाटाच सहन करावा लागला. उन्हाळ्यात टिकाव धरू शकणारे पीकवाण नसल्याचाही परिणाम झाल्याचे तज्ज्ञ सांगतात.
मारक ठरलेले मुद्दे
- वाढलेले तापमान
- पाण्याची कमी उपलब्धता
- उन्हाळ्यातही अवकाळी पाऊस
- पीक परिपक्वता होण्यात अडथळे
- प्री-मॅच्युअर पीक तयार व्हायचे
- सोयाबीनचा दाणा आकाराने लहान
- हिरव्या दाण्यांची संख्या अधिक
- दाण्यांमध्ये कोरडेपणा अधिक असल्याने उगवणीवर विपरीत परिणाम
आकडे बोलतात...
सरासरी क्षेत्र ः २३ हजार ३५५ हेक्टर
यंदाची लागवड ः ४ हजार ७६२ हेक्टर
सरासरीच्या ः २० टक्के
उन्हाळी वातावरणात पीक येत नाही. पिकाची वाढ होत नाही. उत्पादनापेक्षा खर्च जास्त. दाण्याचा आकार कमी येतो. सध्या उपलब्ध असलेले वाण उन्हाळ्यात टिकाव धरू शकले नाहीत. वातावरण बदलाचा परिणाम झाला. दरवर्षी दीड ते दोन एकरांत लागवड करायचो. एकरी चार ते पाच क्विंटल उत्पादन मिळायचे, मात्र हे पीक उन्हाळ्यात परवडणारे नसल्याचा अनुभव आल्याने लागवड थांबवली. या वर्षी त्याऐवजी हिरवळीचे खत लावले.- विनोद देशमुख, शेतकरी, सवडद, जि. बुलडाणा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.