Kolhapur News : केंद्राने साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादनासाठी ६.७ लाख टन बी-हेवी मोलॅसिस वापरण्याची परवानगी दिली आहे. याचा फायदा साखर कारखान्यांना होणार आहे. साखर उद्योग या मागणीसाठी सातत्याने आग्रही होता.
साखरेच्या किमती अपेक्षित प्रमाणात वाढत नसल्याने धास्तावलेल्या साखर कारखान्यांना या निर्णयाने संजीवनी मिळाली आहे. आसवनी निहाय ३१ मार्च अखेरच्या बी हेवी मोलॅसीसच्या मात्रेतून तयार होणाऱ्या इथेनॉलची खरेदी करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे मंजूर करण्यात येत आहेत.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या माहितीनुसार, ‘या परवानगीने बी हेवी मोलॅसिसच्या शिल्लक साठ्यांमध्ये अडकलेल्या सुमारे ७०० कोटी रुपयांची रक्कम वापरता येणार आहे. त्यातून तयार होणाऱ्या ३८ कोटी लिटर इथेनॉलच्या विक्रीतून सुमारे २३०० कोटी रुपये रक्कम देशभरातील आसवनी प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांना उपलब्ध होईल. यामुळे साखरेचे साठे कमी होण्यात व त्याच्या फलस्वरूप स्थानिक साखरेचे विक्री दर सुधारण्यात मदत होईल,’ असा दावा महासंघाने केला आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये केंद्र शासनाने घेतलेल्या आढाव्यात देशातील साखरेची उपलब्धता कमी राहण्याचा आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक बाजारातील साखरेच्या दरात अवाजवी वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला. हा अंदाज प्रमाणभूत मानून केंद्राने ७ डिसेंबर २०२३ च्या आदेशाद्वारे उसाचा रस, साखरेचा अर्क तसेच बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीस तातडीने बंदी आणली.
या अकस्मात झालेल्या निर्णयामुळे संपूर्ण साखर उद्योगात खळबळ उडाली. कारखान्यांमध्ये तयार असलेले इथेनॉल, इथेनॉलसाठी लागणारे बी हेवी मळीचे साठे तसेच तेल कंपन्यांशी केलेले करार या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. इथेनॉल निर्मितीच्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत केंद्राकडून मिळालेले प्रोत्साहन आणि दिलेल्या आश्वासनाच्या विश्वासार्हतेवर साशंकता निर्माण झाली. या क्षेत्रात झालेली व होणारी आर्थिक गुंतवणूक धोक्यात येण्याची स्थिती उद्भवली.
त्यामुळे इथेनॉल निर्मितीवरील बंधने उठविण्याची मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघासह साखर उद्योगातून होत होती. ही परिस्थिती पाहून केंद्राने १५ डिसेंबर २०२३ च्या सुधारित आदेशानुसार अधिकाधिक १७ लाख टन साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविण्याची परवानगी दिली. याच दरम्यान डिसेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे उसाचे व साखरेचे उत्पादन अनपेक्षितपणे वाढले.
परिस्थिती बदलल्याने इथेनॉल निर्मितीवरील नियम आणखी शिथिल करावेत, या मागणीने जोर धरला. साखरेची उपलब्धता अगोदरच्या अंदाजापेक्षा २० ते २५ लाख टनाने वाढली.सुधारित वाढीव साखर उपलब्धतेची आकडेवारी, देशभरातील कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पांमध्ये शिल्लक राहिलेल्या सुमारे सात लाख टन बी हेवी मळीचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करावा, अशी मागणी `महासंघा`चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे केली होती.
अनेक कारणांमुळे आज साखर उद्योग संकटात आहे. साखरेचे दरही अपेक्षित वाढत नाहीत, या पार्श्वभूमीवर केंद्राने दिलेली परवानगी कारखान्यांना तारू शकेल.पी. जी. मेढे, साखर तज्ज्ञ
बी मोलॅसिस साठ्याचे काय करायचे ही चिंता कारखानदारांना होती. आता साठे रिकामे होऊन संभाव्य नुकसान टळू शकेल.विजय औताडे, साखर तज्ज्ञ
या निर्णयामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे. कारखान्यांना बी हेवी मळीच्या शिल्लक साठ्यांत अडकलेली रक्कम मिळू शकेल. आसवनी प्रकल्प असणाऱ्या कारखान्यांना याचा फायदा होईल. शेतकऱ्यांना उसाची रक्कम वेळेत व पूर्णपणे मिळण्यास मदत होईल. या प्रक्रियेमधून सुमारे ३.२५ लाख टन अतिरिक्त साखर इथेनॉल निर्मितीकडे वळविली जाईल.हर्षवर्धन पाटील, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ
...असा होईल फायदा
सध्या देशातील गाळप हंगाम संपत आला आहे. कारखाने बंद झाले असले, तरी अनेक कारखान्यांकडे बी हेवी मोलॅसिस शिल्लक आहे. परवानगीअभावी हे मोलॅसिस पडून होते. या निर्णयामुळे ते आता इथेनॉल निर्मितीसाठी वापरता येईल. त्यातून चांगली रक्कम कारखान्यांना मिळू शकेल. याचा फायदा शेतकऱ्यांना बिले देण्यासाठी होईल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.