Nashik News : बाजारभावापेक्षा जास्त दर देऊन निर्यातदाराने शेतकऱ्यांकडून जवळपास ५ कोटी रुपयांची द्राक्ष खरेदी केली. मात्र पैसे देण्यास टाळाटाळ होत असून, संबंधिताचा कुठलाही संपर्क होत नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यावर फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन पैसे मिळवून देण्यासाठी निवेदन दिले आहे. यावर पालकमंत्र्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
या बाबत सविस्तर माहिती अशी, की युनायटेड फ्रेश इंडिया या निर्यातदार कंपनीला चांदवड व दिंडोरी तालुक्यांतील ११० शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष दिली होती. या कंपनीचे मालक पूर्वा चव्हाण व भागीदार सूरज कांबळे यांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात द्राक्षांची खरेदी केली. या द्राक्षाचे पैसे २० ते २५ दिवसांत मिळतील असे आश्वासन दिले होते.
परंतु शेतकऱ्यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे पैसे मिळाले नाही. पांडाणे, सोनजांब, घोडंबे, वडनेर भैरव, बहादुरी, दह्याणे या भागांतून निर्यातक्षम द्राक्षाची खरेदी केली. यावर द्राक्ष उत्पादकांनी पैशाची मागणी केली असता त्यांना देय रकमेप्रमाणे धनादेश दिले मात्र ते वटलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची जवळपास ५ कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शेतकऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे व खासदार भास्कर भगरे यांची भेट घेत संबंधित मुंबई येथील एक्स्पोर्ट कंपनीविरोधात तक्रार नोंदवली. मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे निर्देश पोलिसांना दिले. या वेळी दशरथ जाधव, बाळासाहेब चित्ते, ज्ञानेश्वर चित्ते, रावसाहेब दुगजे, जगन्नाथ जाधव, हर्षद रकिबे, विलास भवर, बापूसाहेब शिरसाठ आदी शेतकरी उपस्थित होते.
द्राक्ष उत्पादक वर्षभर काबाडकष्ट करून द्राक्षांचे उत्पादन घेत असतो, गेल्या वर्षी दुष्काळ असताना शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जगवल्या. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा माल घेऊन संबंधित कंपनीने अद्यापही पैसे दिले नाहीत. या शेतकऱ्यांना हक्काचे पैसे तत्काळ देण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.विलास भवर, तालुकाप्रमुख, ठाकरे गट, चांदवड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.