Sitabai and Laxman Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Sita Lakshman Jungle Story: तानाजी कड्याच्या जंगलातील ४० वर्षांची साथ; सीता-लक्ष्मण यांच्या जीवनाची कहाणी

Maharashtra Rural Life: तानाजीच्या कड्यालगतच्या जंगलात राहणारे एक भूमिहीन शेतकरी दांपत्य म्हणजे लक्ष्मण बिरू पवार आणि त्याची पत्नी सीताबाई पवार. दोघेही अतिकष्टाळू, जिवाला जीव देणारे आणि प्रामाणिक. आसपास हिंस्र श्‍वापदं असतानाही ते न डगमगता ४० वर्षांपासून संसार करीत आहेत.

मनोज कापडे

Sinhgad Forest Couple Story: सह्यादीतील सिंहगड पर्वतरांग शिवरायांच्या इतिहासाची साक्ष देते. गडाचे स्मरण करता आठवतो तो शूरवीर तानाजी मालुसरे आणि मग आपसूक डोळ्यासमोर येतो घोरपडीच्या मदतीने तानाजी चढून गेला तो तानाजी कडा! याच कड्यालगतच्या जंगलात कळकीच्या मेटावर झोपडीत राहणारे एक भूमिहीन शेतकरी दांपत्य म्हणजे लक्ष्मण बिरू पवार आणि त्याची पत्नी सीताबाई पवार. दोघेही अतिकष्टाळू, जिवाला जीव देणारे आणि प्रामाणिक.

आसपास हिंस्र श्‍वापदं असतानाही दोघेही न डगमगता ४० वर्षांपासून संसार करीत आहेत. सारं जंगल तुमच्या मालकीचे आणि तुम्ही भूमिहीन कसे, असा प्रश्‍न मी लक्ष्मणरावांना विचारला. ‘‘जंगलातल्या भूमिहीन कुणब्यांना न्याय देणारा एकच शिवाजी राजा होऊन गेला. त्याने तर सारा सह्याद्री आम्हाला दिला होता.

परंतु आता जग आमचं राहिलं नाही. मी तसा मूळ रायगडासमोरील चांदरच्या जंगलातला. वडिलांनी ५० वर्षांपूर्वी कोणालाही न विचारता २५ एकर जमीन रातोरात विकली आणि मी भूमिहीन झालो. मग तोरणा काठच्या वेल्हा गावात आलो. तेथे शेतमजुरी आणि गुरे वळून पोट भरत होतो. लग्नानंतर मी सीताबाईच्या या जंगलात कायमचा राहायला आलो. पण, अजूनही माझं स्वःमालकीचं झोपडं झालेलं नाही,” असे लक्ष्मणरावांनी सांगितले.

बाळूचा ढाबा

सीताबाई देखील मूळच्या या जंगलातल्या नव्हत्या. त्या सह्याद्रीतील सांगवी नावाच्या डोंगरी भागातला शेतकरी बारकू रावजी बादड यांच्या कन्या. बारकूला बाळू आणि रामदास अशी दोन मुले. मात्र दुर्दैवाने पोटासाही दोन्ही मुलांनी गाव सोडलं. बाळू मग चालत सिंहगडावर आला व तेथेच त्याने पर्यटकांना भाजीभाकरी देणारं पहिलं छोटं हॉटेल टाकलं. ते बाळूचा ढाबा म्हणून प्रसिद्धीला आलं. बाळूचीच सख्यी बहीण म्हणजे सीताबाई.

बाळू आणि रामदासने सीताबाईला रोजगारासाठी कळकीच्या मेटावर आणलं आणि सीताबाई सिंहगडाची जंगलकन्या बनली. लक्ष्मण आणि सीताबाई दोघांनाही ना घर ना शेती. तरीही दोघांचं लग्न तानाजी कड्याच्या खाली लागलं. पंगतीला वरण, भात, भाजी आणि बुंदीचे लाडू होते. लग्न होताच दोघे संसारासाठी शेतमजुरी करू लागले. पण मजुरी कमी मिळायची. मग दोघे जंगलातून लाकडं गोळा करून आणू लागले.

कुटुंबाला आधार लिंबूपाणीचा

काट्याकुट्यात घुसून लाकडाची मोळी बांधायची; उरात धडकी भरणाऱ्या गडाच्या मागच्या कड्यावरून मोळीसह सीताबाई-लक्ष्मण गडावर जायचे. तेथे मोळी विकून दहा रुपये मिळवायचे. त्यातून मीठमिरची विकत घेऊन रोजचा दिवस काठायचे. अर्थात, या कष्टाळू जीवनाविषयी दोघांची तक्रार नव्हती. गडावर नंतर मोठमोठ्या मनोऱ्यांची उभारणीची सरकारी कामं निघाली. ते सारे मनोरे आजूबाजूच्या जंगलातील शेतकऱ्यांनी खांद्यावर लोखंडी खांब, दगड, सिमेंटच्या गोण्या वाहून उभे केले.

त्यापैकीच एक मजूर म्हणजे लक्ष्मणराव. दूर जंगलातून गडावरचा मनोरा दिसता लक्ष्मणरावांना ते दिवस आठवतात. पुढे गडावर स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर आला. त्यामुळे हॉटेलवाल्यांनी मोळ्या विकत घेणे बंद केले. त्यामुळे सीताबाई-लक्ष्मण यांच्या मोळी विक्रीवर गदा आली. दोघांनाही काय करावे ते सुचेना. पण निराश न होता पोटासाठी हालचाल करणे क्रमप्राप्त होते.

त्यामुळे मग सीताबाई गडावर लिंबूपाणी, भाजीभाकरी विकू लागली. इकडे लक्ष्मणरावांनी थोड्या कोंबड्या, बकऱ्या जमवत पशुपालनाकडे लक्ष दिले. जंगलात उन्हाळ्यात पाणी नसल्यावर भल्या सकाळी ही जोडी गडावर जाई आणि तेथील देवटाक्याचे पाणी घेऊन झोपडीत येई. सीताबाई घरची काम आटोपून पुन्हा गडावर जाई आणि दिवसभर लिंबूपाणी विकून सांजेला झोपडीत परतत असे.

त्यांच्या संसाराला चार फळं आली. थोरली रूपाली केवळ तिसरी शिकली आणि चांदरच्या जंगलात शेतकरी कुटुंबात लग्न होऊन गेली. त्यानंतर आला तो समीर. काही न शिकता तो पानशेतला एका बंगल्यावर वॉचमन बनला. तिसरी राणी. ती लग्न होऊन तोरणा पाठीमागच्या जंगलात शेतकरी कुटुंबात गेली. शेवटचा मुलगा सचिन. तो गडावर रोजंदारीवर स्वयंपाकी बनला. लक्ष्मणरावांनी गुराखी म्हणून खूप कष्ट केले. आता त्यांच्याकडे चार बकऱ्या, चार गायी आहेत. दोघांनी ४० वर्षांत पै-पै साचवून घरासाठी दोन गुंठे जागा घेतली आहे. घर बांधायचं की शेवटचा मुलगा सचिनचं लग्न करायचं, असा मुद्दा उभा होता. घर बांधता आधी मुलाचं लग्नं करण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे.

( समीर पवार, ७०५७४५१५३२)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

Farmer Compensation: भरपाईतही नव्या दरामुळे फटका

Leopard In Solapur: बिबट्यांची संख्या पन्नास की शंभर?

White Grub Infestation: हुमणी नियंत्रणासाठी कृषी विभागाचे वरातीमागून घोडे

Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी

SCROLL FOR NEXT