
Pune News: छत्रपती श्री. शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी (ता. जुन्नर) किल्ल्यावर शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह विविध मंत्री उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने जुन्नर शहरात पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘हिंदवी स्वराज्य महोत्सवा’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार शरद सोनवणे यांनी दिली.
शिवजयंतीच्या निमित्ताने उद्या (ता.१९) पहाटे शिवनेरी गडदेवता शिवाई देवीची महापूजा विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिवजन्माचा प्रमुख सोहळा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थित होणार आहे.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, वनमंत्री गणेश नाईक, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, उपवनसंरक्षक अमोल सातपुते आदी अधिकाऱ्यांसह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, हिंदवी स्वराज्य महोत्सवाच्या निमित्ताने आमदार शरद सोनवणे यांच्या संकल्पनेतून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बैलगाडा शर्यत, कब्बडी स्पर्धा, शिवनेर केसरी कुस्ती स्पर्धा, फटाक्यांची भव्य आतषबाजी, गौरव माझ्या महाराष्ट्राचा, वैशाली सामंत यांचा संगीत रजनी कार्यक्रम, शिवाजी महाराजांच्या जीवनपटावरील शिवसह्याद्री महानाट्याचे आयोजन आणि पारंपरिक साहसी खेळांचे सादरीकरण ठेवण्यात आले आहे.
या विविध कार्यक्रमांना पर्यटनमंत्री शंभुराज देसाई आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, या विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने जुन्नर शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व रस्त्यांवर विशेष ऐतिहासिक प्रवेशद्वारांची उभारणी करण्यात आली आहे. या सजावटीमुळे जुन्नरला ऐतिहासिक स्वरूप आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.