अकोला ः जिल्ह्यात दोन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे (Akola Rain Update) अनेक ठिकाणी पाणी साचणे, धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे नदी, नाल्यांतील पाण्याची पातळी वाढण्याचे (Dam Water Level) प्रकार घडले आहेत. प्रशासनाने केलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार जिल्ह्यात सुमारे ३२ हजार ३९६ हेक्टरवरील पिके बाधित (Crop Damage) झाली आहेत. यात बाळापूर तालुक्यात सर्वाधिक २५ हजार हेक्टरवरील पिकांचा समावेश असून, मंगळवारी (ता. १९) सुद्धा जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर वाहत असल्याने बाधित क्षेत्रात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यात १७ जुलैपासून पावसाचा जोर वाढला होता. दोन दिवस सर्वत्र संततधार पाऊस तर काही मंडळांत अतिवृष्टीही झाली. यामुळे सर्वच नदी-नाल्यांना पूर आला. सखल भागातील शेतांमध्ये अनेक तासांपासून पावसाचे, पुराचे पाणी साचलेले आहे. नदी-नाल्यांच्या काठावरील पिके खरडून गेली आहेत. प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार अकोला तालुक्यात ७७ गावांतील सोयाबीन, कापूस, तूर या पिकांचे ७१६० हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. तर बाळापूर तालुक्यात सर्वाधिक २५ हजार २३६ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. ५८ गावांतील हे क्षेत्र आहे.
पूर्णेला पूर...
वऱ्हाडातील सर्वातं मोठी नदी असलेल्या पूर्णेला अनेक तासांपासून मोठा पूर आला आहे. या पुरामुळे अकोला-अकोट, अकोला -दर्यापूर, नांदुरा-जळगाव जामोद मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. नदीवर म्हैसांग, गांधीग्राम, येरळी येथे असलेल्या पुलांवरून सुमारे सात ते आठ फूट पाणी वाहत असल्याने यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
‘वाण’चे सहा दरवाजे उघडले
अकोला-बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वाण प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे वान नदीला मोठा पूर आला असून, या नदीच्या काठावरील गावांच्या पुलावरून पाणी वाहत आहे. वाण प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने यात पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. मंगळवारी (ता. १९) यामध्ये ५३.७७ दलघमी साठा होता. ६५.६१ टक्के हे धरण भरल्याने नदीपात्रात प्रतिसेंकद १२८.३० घनमीटर सेंकद या प्रमाणे पाणी सोडले जात आहे. या नदीच्या काठावरील वारी भैरवगड, वारखेड, दानापूर, सोगोडा, वडगाव वाण, काटेल, कोलद, काकनवाडा, वानखेड, पातुर्डा या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. नदीला पूर आल्याने काटेल-कोलद, दुर्गादैत्य-वानखेड गावांचा संपर्क तुटला होता.
बाधित गावांची संख्या -१३५
बाधित क्षेत्र -३२३९६ हेक्टर
बाधित तालुके - अकोला, बाळापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.