Irrigation Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Irrigation Subsidy : धुळे-नंदुरबारला १८ कोटींचा निधी

Team Agrowon

Dhule News : कृषी विभागाच्या सूक्ष्म सिंचन योजनेतून ठिबक संच बसविलेले शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. त्यामुळे शेतकऱ्यांसह ठिबक उद्योग क्षेत्र व विक्रेतावर्गही नाराज झाला. परिणामी, राज्याच्या कृषी विभागाने काहीअंशी अनुदान वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार धुळे व नंदुरबार जिल्ह्यास एकूण १८ कोटी ४४ लाखांचा निधी मिळणे अपेक्षित आहे. आणखी काही निधी मिळणे बाकी असेल.

केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी तुषार व ठिबक योजना राबविण्यात येते. या योजनेत अनुदान थकले. ते मिळण्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा केला. पैकी धुळे जिल्ह्यासाठी १२ कोटी १३ लाख, तर नंदुरबार जिल्ह्यासाठी सहा कोटी ३१ लाखांचे रखडलेले अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

वित्त विभागाची दमछाक

विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने महायुती सरकार काही लोकप्रिय योजना घोषित करत आहे. त्यासाठी भरमसाट निधीची तरतूद केली जात आहे. परिणामी, नियमित योजनांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्यात वित्त विभागाची दमछाक होत आहे. याच सावळागोंधळात शेतकऱ्यांसंबंधी ठिबक योजनेचे अनुदान वाटप ठप्प झाले.

त्यात धुळे जिल्ह्याच्या १२ कोटी १३ लाख, तर नंदुरबार जिल्ह्याच्या सहा कोटी ३१ लाखांच्या निधीचा समावेश आहे. ते मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याने २०२१-२०२२ मध्ये ठिबक संच घेतलेल्या शेतकऱ्यांना या निधीतून अनुदान प्राप्त होईल. नंतर २०२२-२०२३ मधील योजनेच्या शेतकऱ्यांना, तर गेल्या हंगामात म्हणजेच २०२३- २०२४ मध्ये संच बसविलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित पूरक अनुदानापोटी निधी वाटप केला जाणार आहे.

प्रधानमंत्री कृषी योजना

प्रत्‍येक शेतकऱ्याच्‍या शेतास पाण्‍याची उपलब्‍धता करणे आणि पाण्‍याची कार्यक्षमता वाढवून प्रत्‍येक थेंबातून जास्‍तीत जास्‍त पीक उत्‍पादन मिळविणे, या उद्देशाने २०१५- २०१६ पासून सूक्ष्‍म सिंचन योजना ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्‍ट केली गेली. यात केंद्र व राज्‍य हिश्श्‍याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण ६०:४० करण्‍यात आले.

लाभ योजनेंतर्गत अल्‍प व अत्‍यल्‍प भूधारक शेतकरी ५५ टक्‍के व इतर भूधारक शेतकरी ४५ टक्‍के प्रमाण राखण्यात आले आहे. लाभार्थीने योजनेत सहभागी होण्‍यासाठी नोंदणी केल्‍यापासून प्रत्‍यक्षात सूक्ष्‍म सिंचन संच बसवून अनुदानाची मागणी केल्‍यानंतर योग्‍य ती पडताळणी करणे. नंतर लाभ रक्‍कम त्या‍च्या बॅंक खात्‍यावर जमा करण्‍यापर्यंतच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावरील कार्यवाहीबाबत लाभधारकास एसएमएसद्वारे कळविण्‍याची तरतूद योजनेत आहे.

योजनेविषयी विविध निकष

सूक्ष्‍म सिंचन संच उत्‍पादकाकडून प्राधिकृत केलेल्‍या वितरक किंवा विक्रेत्‍याकडून तीस दिवसांच्‍या आत बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे. लाभधारकाने पूर्वमान्‍यता मिळाल्‍यापासून तीस दिवसांच्या आत सूक्ष्‍म संच न बसविल्‍यास त्‍याची पूर्वसंमती आपोआप रद्द होईल. त्‍याला पुन्हा अर्ज करता येईल.

सूक्ष्‍म सिंचन यंत्रणा बसविण्‍यासाठी प्रतिलाभार्थी पाच हेक्‍टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देय राहील. सूक्ष्‍म सिंचन संच घटकाचे आयुर्मान सात वर्षे करण्‍यात आले आहे. त्‍यामुळे ज्‍या लाभधारकाने पाच हेक्‍टर मर्यादेत सूक्ष्‍म सिंचन योजनेचा लाभ घेतला आहे, त्यास सात वर्षांनंतर पुन्हा सूक्ष्‍म सिंचन योजनेचा लाभ घेता येतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत ४ लाख ५४ हजारांवर पूर्वसूचना

Crop Insurance : पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के अग्रिम रक्कम

Forest Right Act : वन दाव्याच्या हक्कासाठी मोर्चा

Farmer Incentive Scheme : आधार प्रमाणीकरणासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत

Women Entrepreneur : महिला उद्योजकांचे ‘आई’कडे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT