Dharashiv News : सरकारने २०१९ मध्ये हाती घेतलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहन अनुदान लाभासाठी राज्यातील १५ हजार १९३ पात्र शेतकऱ्यांचा शोध लागत नसल्याची स्थिती आहे. या शेतकऱ्यांनी प्रोत्साहन अनुदानासाठी आधार प्रमाणीकरण केले नाही.
आधार प्रमाणीकरणासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत योजनेचे प्रोर्टल सुरू ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात आधार प्रमाणीकरण राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक हजार ८२७ असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) बालाजी काळे यांनी दिली.
प्रोत्साहन अनुदानासाठी बँकांकडून या शेतकऱ्यांचा शोध सुरू असून, योजनेच्या लाभासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तातडीने बँकांशी संपर्क करून तातडीने आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
कर्जमुक्ती योजनेतून नियमित कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे. योजनेत अनेक शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेतला. त्यानंतर सरकारने योजनेचे पोर्टल बंद केले होते.
आता खास राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आले असून, शेतकऱ्यांनी आपल्या बँकांशी संपर्क साधून विशिष्ट क्रमांक घ्यावा व त्याआधारे आधार प्रमाणीकरण करून घेऊन अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. काळे यांनी केली आहे.
जिल्ह्यात अनुदानासाठी ४६ हजार ६६९ शेतकरी लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले असून, त्यापैकी ४४ हजार ७३९ शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर १३० कोटी ७७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. आधार प्रमाणीकरण न केलेल्या शेतकऱ्यांना महाआयटीकडून १८ सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
तरीही राज्यात १५ हजार १९३ शेतकऱ्यांनी, तर धाराशिव जिल्ह्यात एक हजार ८२७ शेतकऱ्यांनी अजून आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यामुळे आधार प्रमाणीकरणासाठी सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देऊ प्रमाणीकरणाचे पोर्टल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रमाणीकरण न केलेल्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी महा-ई सेवा केंद्र- सीएससी सेंटरमध्ये जाऊन आपले आधार प्रमाणीकरण करून घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे व जिल्हा उपनिबंधक काळे यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.