Seeds
Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Production : एक हजार एकरावर पैदासकार बियाणे उत्पादन घेणार

माणिक रासवे  

Kharif Season Update In Parbhani : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या परभणी येथील प्रक्षेत्रावरील ३० ते ३५ वर्षांपासून पडीक असलेली एक हजार एकर जमीन लागवडी योग्य करण्यात आली आहे. या जमिनीवर ‘महाबीज’च्या सहकार्याने यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन, ज्वारी तसेच अन्य पिकांचे पैदासकार बियाणे (ब्रीडर सीड) उत्पादन घेतले जाणार आहे.

परिणामी, बीजोत्पादनात दोन ते तीन पट वाढ होईल. जलसंधारण‌ तसेच संरक्षित सिंचनासाठी प्रक्षेत्रावर विविध ठिकाणी प्रत्येकी १ कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेचे ६ शेततळ्यांची निर्मिती केली जात आहे.

ड्रोन स्कूल तसेच भाडेतत्त्वावरील ड्रोन केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ड्रोन तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी संपूर्ण मराठवाडाभर ड्रोन यात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांनी दिली.

गुरुवारी (ता. १८) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ५१ वा वर्धापन दिन आहे. यानिमित्त डॉ. इंद्र मणी यांनी ‘ॲग्रोवन’शी संवाद साधला. कृषी विद्यापीठाच्या आगामी शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षणविषयक उपक्रमांची माहिती देताना डॉ. इंद्र मणी म्हणाले, की फार्मर फर्स्ट (शेतकरी प्रथम) तसेच ग्रास रूट ते ग्लोबल या संकल्पनेनुसार कृषी विद्यापीठाचे कार्य सुरू आहे. प्रक्षेत्रावर जलसंधारणाची कामे केली जात आहे.

शेततळ्यांच्या माध्यमातून जलसाठे निर्माण केले जात आहेत. ६ पैकी २ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या नोव्हेंबर महिन्यात छत्रपती संभाजीनगर येथे १२ वी नॅशनल सीड काँग्रेस घेण्यात येईल. यात देशभरातील बियाणे उत्पादक कंपन्या सहभागी होतील.

शेतकरी मेळाव्यांचे स्वरूप यंदापासून बदलण्यात येत आहे. ‌येत्या ता. १७ सप्टेंबरपासून, तसेच मार्च महिन्यात तीनदिवसीय शेतकरी मेळावे तसेच प्रक्षेत्रावर पीक प्रात्यक्षिके घेण्यात येतील. विद्यापीठाकडे पाच ड्रोन व दोन ग्राफ्टिंग रोबोट उपलब्ध आहेत. परभणी येथे ड्रोन स्कूल द्वारे प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत.

न्यू हॉलंड कंपनीशी केलेल्या सामंजस्य करारानुसार दीड हजार शेतकऱ्यांना कृषी यंत्रांचा कार्यक्षम वापराचे प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. टाफे कंपनी सोबतच्या सामंजस्य करारातून परभणी येथे महाराष्ट्र यांत्रिक केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

त्याद्वारे यांत्रिकीकरण व सिंचनातील आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले जाणार आहे. सौरऊर्जेच्या वापरावर भर देण्यासाठी मोहीम राबविली जाईल. नवीन शैक्षणिक धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तसेच संशोधनासाठी प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. विद्यार्थी वसतिगृहांची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

राज्य शासनाकडून मंजूर २५ कोटी रुपये निधीतून विविध विभागांतील आठ आधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. छत्रपती संभाजी नगर येथे महिला कृषी महाविद्यालय तसेच गल्ले बोरगाव (ता. खुलताबाद) येथे आले संशोधन केंद्र, सिल्लोड तालुक्यात रेशीम महाविद्यालय आणि मका संशोधन केंद्र प्रस्तावित आहे.

तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्यासाठी आपण अमेरिकेतील चार आणि जपान देशातील एका विद्यापीठाचा दौरा केला आहे. राष्ट्रीय उच्च शिक्षण कृषी प्रकल्पअंतर्गत २६ विद्यार्थी थायलंड येथे प्रशिक्षण घेऊन आले.राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाचे मानांकन सुधारण्यासाठी सर्वत्र प्रयत्न केले जात आहेत.

विद्यापीठ स्तरावरील भरती प्रक्रिया सुरू केली जाईल, तसेच महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद स्तरावरील पदभरती सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे. डाबरच्या सहकार्याने विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर औषधी वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे, असे डॉ. इंद्र मणी यांनी नमूद केले.

कृषी हवामानविषयक सल्ला प्रणाली विकसित...

कीड, रोग, यांसह अन्य शेती कामांचे व्यवस्थापन योग्य वेळेवर करता यावे. यासाठी कृषी हवामानविषयक सल्ला शेतकऱ्यांपर्यंत तत्काळ पोहोचविण्यासाठी प्रणाली विकसित केली जात आहे.

क्रॉपसॅप अंतर्गत कीड-रोग व्यवस्थापनासाठी रोड मॅप तयार केला जात आहे. त्यासाठी कृषी विभागासोबत समन्वयातून काम केले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’ म्हणजेच खासगीकरणाकडे वाटचाल

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या ‘सोन्या’चे दर कधी वाढणार?

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

Sugar Industry : ‘डीएसटीए’कडून आज चर्चासत्राचे आयोजन

Agri Tourism Festival : ग्रामसंस्कृतीतून राज्यात कृषी पर्यटनाला सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT