बाजारात विक्रीसाठी आलेल्या म्हशी.
बाजारात विक्रीसाठी आलेल्या म्हशी. 
बाजारभाव बातम्या

सिद्धेश्‍वर यात्रेतील बाजारात खिलार बैल, म्हशींचे आकर्षण !

Sudarshan Sutaar

सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धेश्‍वर यात्रेनिमित्त विजापूर रस्ता परिसरातील श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात जनावरांचा बाजार चांगलाच फुलला आहे. यंदा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक आदी राज्यांतून एकूण तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल झाली. खिलार बैल, दुभत्या गायी- म्हशी  बाजाराच्या आकर्षण ठरल्या आहेत. बाजाराच्या पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक दीड लाख रुपयांपर्यंत बैलजोड्यांची विक्री झाली. दिवसाकाठी सुमारे २० लाख रुपयांहून अधिक उलाढाल बाजारातून झाली.

जनावरांच्या बाजाराविषयी विजापूर रस्त्यावरील रेवणसिद्धेश्‍वर मंदिराच्या समोरील विस्तीर्ण पटांगणात जनावरांचा बाजार भरतो. दरवर्षी साधारण दहा जानेवारीपासून त्यास सुरवात होते. यात्रा सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात दररोज तर त्यानंतर जानेवारीअखेर दर महिन्याच्या मंगळवारी तो भरतो. अनेक वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे. जिल्ह्याची ओळख असलेले खिलार बैल, खिलार खोंड, पंढरपुरी म्हशी यांच्यासह विविध दुभती जनावरे बाजाराची आकर्षण ठरतात. यंदाही पुढील दोन मंगळवारी (ता. २२) व २९ जानेवारीपर्यंत तो भरेल.   बाजार उलाढाल, वैशिष्ट्ये  

  • यंदा पहिल्याच आठवड्यात सुमारे तीन हजारांहून अधिक जनावरे दाखल
  • त्यात दीड हजारापर्यंत बैल, पाचशेपर्यंत म्हशी आणि उर्वरित खोंड, गायींचा समावेश
  • दिवसाकाठी ५० ते १०० जनावरांची विक्री. आठवड्यात आत्तापर्यंत पाचशेहून अधिक जनावरांचे व्यवहार
  • खिलार बैलजोड्याला सर्वाधिक दीड लाख रुपयांपर्यंतचा दर.
  • पंढरपुरी म्हैस - ६० ते ७० हजार रुपये.
  • जाफराबादी म्हैस- लाख रुपयांच्या पुढे.
  • खोंड- वयानुसार- २० ते २५ हजार रुपयांपर्यंत
  • दिवसाकाठी २० लाखांच्याही पुढे व्यवहार
  • सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, पंढरपूर, मोहोळ, माढा या भागांसह कर्नाटकातील विजयपूर, गुलबर्गा आदी भागांतून येतात जनावरे.
  • सर्वाधिक संख्या खरेदीदारांची. कर्नाटक व आंध्र प्रदेशात मोठे डेअरी फार्म असून तेथे खास पंढरपुरी, जाफराबादी म्हशी तसेच खिलार, गीर गायीही नेल्या जातात.
  • शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. जनावरांची विक्री झाल्यास स्वखुशीने ते सिद्धेश्‍वर देवस्थान समितीस देणगी देऊ शकतात. सक्ती नाही.  
  • शेतकऱ्यांना दहा रुपयांत जेवण मंदिर समितीकडून परगावाहून आलेल्या शेतकऱ्यांसाठी व खरेदीदारांसाठी स्वस्त भाजी भाकरी योजना जनावर बाजार परिसरात करण्यात आली आहे. यात दहा रुपयांमध्ये दोन भाकरी, एक भाजी, भात, आमटी असे भोजन देण्यात येते. दररोज दीड ते दोन हजार शेतकरी त्याचा लाभ घेतात. पिण्याचे पाणी, विजेची व्यवस्था जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. जनावरे धुण्यासाठी हौदाची व्यवस्था आहे. विजेची सोय त्याचप्रमाणे काही ठिकाणी मंडप उभारून सावलीची सोय केली आहे.

    कासरा, घंट्याही उपलब्ध जनावरे खरेदी केल्यानंतर नवीन कासरा, गळ्यातील घंटी, मोरकी घेण्याचीही सोय आहे. काही छोट्या व्यावसायिकांना या ठिकाणी वस्तूंच्या विक्रीसाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे जनावरांच्या खरेदीनंतर शेतकऱ्यांना अन्यत्र जाण्याची गरज भासत नाही. प्रतिक्रिया मला बैल खरेदी करायचा होता. मात्र किंमत जास्त असल्याने व्यवहार जमला नाही. मात्र माझ्या ‘बजेट’मधून या बाजारातून २२ हजार रुपयांना चांगल्या खोंडाची खरेदी केली. अन्य बाजाराच्या तुलनेत तो स्वस्त मिळाला. बुद्धाप्पा चेंडके, शेतकरी, कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर

    माझी शेती नाही. मात्र दूध व्यवसायासाठी म्हशी हव्या होत्या. या बाजारातून जाफराबादी म्हैस ६३ हजार रुपयांना खरेदी केली. दिवसाला ती दहा लिटरपर्यंत दूध देते. रेवणसिद्ध डोळे, हत्तूर, ता. दक्षिण सोलापूर

    सर्वाधिक गीर गायी, कालवडी, खोंडे विक्रीस आणली होती. आत्तापर्यंत सुमारे १४ ते १८ जनावरांचे व्यवहार झाले. येथे दरही बऱ्यापैकी मिळतात. सोमनाथ जकनाईक, व्यापारी

    दरवर्षी बाजारात शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न असतो. उत्पन्न कमावणे हा या देवस्थान समितीचा उद्देश नसतो. परंपरा आणि शेतकऱ्यांची सोय यांचा मेळ घालतो. यंदा बाजार पहिल्याच आठवड्यात चांगला भरला. व्यवहारही होत आहेत. - बसण्णा खदनाळे, ७३५००६४५०७  व्यवस्थापक, जनावर बाजार विभाग,  सिद्धेश्‍वर देवस्थान कमिटी  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Climate Change : हवामान बदलाचा फळबागेला जोरदार फटका

    Indian Politics : गांधींचा वारसा, मोदींचा आरसा

    Delhi Farmers' protest : शेतकरी आंदोलनाचा थर्मल प्लांटला फटका; कोळसा पुरवठा बंद, अनेक रेल्वे गाड्या रद्द

    Devgad Hapus : बॉक्स देवगड हापूसचा पण आंबा कर्नाटकचा, ग्राहकांची उघड लूट

    Market Trend : बाजारकलासाठी हवामान, नवीन सरकारकडे लक्ष

    SCROLL FOR NEXT