कोल्हापूर ः हिंदुत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपला (BJP) ग्रासले असल्यामुळे शिवसेना (Shivsena) फोडण्याचे पाप भाजपने केले, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना बुधवारी (ता. १२) केली. शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच होती, असा जोरदार हल्लाबोलही जयंत पाटील यांनी केला.
काही झालं तरी प्रोफेशनली आपल्याला टिकायचे तर समोरचा पक्ष फोडला पाहिजे हा उद्देश ठेवून भाजपने शिवसेना फोडली. तसे कारस्थान रचण्यात आले. आता नावही आणि चिन्हही काढून घेण्यात आले, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आणि ती कुणाच्या घरात गेली हे थोड्या दिवसांत समोर येईल. म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याची व्यवस्था आयोगाच्या माध्यमातून होईल यात शंका नाही, असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंडाळीची कबुलीच दिल्यामुळे अर्थ स्पष्ट आहे, की शिवसेना फोडण्याचे आणि बाळासाहेबांच्या पक्षाचे दोन तुकडे करण्याचे कारस्थान भाजपने केले आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला. आता बाळासाहेबांची शिवसेना हे नाव निवडणूक आयोग मान्य करतो. बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचे वडील. उद्धव ठाकरे यांचा त्या नावावर पूर्ण अधिकार असे असताना निवडणूक आयोग निर्णय घेतो हे किती प्लॅनिंगने सुरू आहे आणि भयंकर आहे हे महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात येतेय.
त्यामुळेच राज्यातील जनतेचा भाजप आणि एकनाथ शिंदे सरकारवरील राग पदोपदी वाढतोय असेही जयंत पाटील म्हणाले. शिवसेनेने ज्याला उमेदवारी दिली आहे त्याला साम-दाम-दंड भेद वापरायचा व त्याला पळवायचे हे योग्य आहे का, असा संतप्त सवालही जयंत पाटील यांनी या वेळी केला. जो उमेदवार शिवसेनेने ठरवला आहे त्याचा प्रचार शिवसेनेने केला आहे. अंधेरी विधानसभा मतदार संघात शंभर टक्के शिवसेना निवडून येईल अशी परिस्थिती आहे.
यातून महाराष्ट्रातील जनमताची एक छोटीशी चाचणी मुंबईकरांची होणार आहे. अंधेरी मतदार संघात मराठी भाषिक संख्या मर्यादित असून हा बहुभाषिक मतदारसंघ आहे, त्यामुळे तिथला निर्णय कसा येतो आणि काय येतो हे बघण्याचे औत्सुक्य असतानाच उमेदवार पळवायचा हे जे लोक करत असतील तर राज्यातील जनतेच्या लक्षात येईल आणि पुढच्या विधानसभा निवडणुकीत यांच्याविरोधात कोण उभा राहणार नाही याची व्यवस्थाही ते करू शकतील, असा उपरोधिक टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.
पवार साहेबांनी केली महाविकास आघाडीची स्थापना
शिवसेनेचा जो फुटीर गट आहे त्याचा पदोपदी महाराष्ट्रात निषेध व्हायला लागला आहे. म्हणून मग कुणावर बोलायचं तर राष्ट्रवादीवर हा त्यांचा उद्देश आहे. राष्ट्रवादीने शिवसेना, काँग्रेस यांच्यासोबत पुढाकार घेऊन साथ दिली आणि पवार साहेबांनी महाविकास आघाडीची स्थापना केली, असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.