सेवानगर : कपाशीवर औषध (Cotton Pesticide) फवारल्यानंतर दोन तरुण शेतमजुरांचा मृत्यू झाला.(Farmer Death) ही घटना आखेगाव (ता. शेवगाव) येथे शुक्रवारी घडली. मृत्यू झालेल्या संबंधित शेतमजुरांसोबत असलेले इतर सहकारी गायब असल्याने याघटनेबाबत नातेवाइकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. वैभव आबासाहेब बीडकर (वय २८, रा. आखेगाव, ता. शेवगाव) व कृष्णा बबन काकडे (वय ३०, रा. सोमठाणे, ता. पाथर्डी) अशी कपाशीवरील औषध फवारणीनंतर (Farmer Death Due To Pesticides) मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
नगर जिल्ह्यातील शेवगाव, पाथर्डी तालुक्यांत कापसाचे क्षेत्र अधिक आहे. सध्या फुले, बोंडाच्या स्थितीत कापसाचे पीक आहे. त्यामुळे कीटकनाशक फवारणीचे काम वेगात सुरू आहे. आखेगाव (ता. शेवगाव) येथे सहा मजुरांनी दिवसभर कीटकनाशकाची कापसावर फवारणी केली. त्यानंतर ते येथील सोमठाणा शिवारातील शेतात बसले होते.
ते घरी येत नसल्याचे पाहून घरच्यांनी त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांचा फोन वाजत असल्याने एका व्यक्तीने तो घेतला. तसेच दोघे तेथे पडल्याची माहिती फोनवरून दिली. त्यानंतर नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दोघांना शेवगाव रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने कृष्णा काकडे यास शेवगाव येथे, तर वैभव बीडकर यांस नगर येथील रुग्णालयात दाखल केले.
परंतु त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मृत तरुण मजुरांसोबत असलेले इतर चार मजूर गायब असल्याने नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. औषध फवारणीनंतर मजुरांचा मृत्यू झाला असला, तरी त्यांच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच कळणार आहे. ‘फवारणीबाबत काळजीची जागृती नाही’ कापूस व अन्य पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी, मजुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत.
त्यामुळे मागील काही दिवसांपासून कृषी विभागाने कीटकनाशकांची फवारणी करताना काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत राज्यभर जनजागृती केली. मात्र नगर जिल्हा त्याला अपवाद आहे. नगर जिल्ह्यात कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीच याबाबत सतत उदासीनता पाहायला मिळत आहे.
कापूस पिकांबाबतच्या योजनेवर लाखो रुपये खर्च केले जात असताना फवारणी करण्याबाबत जनजागृतीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने मात्र एकही कार्यशाळा घेतली नसल्याची नगर जिल्ह्याची स्थिती आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.