Seed Conservation Agrowon
ताज्या बातम्या

Seed Conservation : समाजाच्या प्रयत्नातून पारंपरिक बियाणे संवर्धन

भरडधान्य, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला, इ. अनेक पिके एकत्रितपणे पारंपरिक शेती पद्धतीत लावली जातात. दुष्काळ, ढगफुटी, गारपीट, वादळ, पूर, याच्यामुळे एखाद्या पिकाचे नुकसान झाले तरी इतर पिके तग धरून राहतात. माणसं आणि जनावरांच्या पोटाला पुढील वर्षी आधार देतात.

Team Agrowon

लेखिका - जुई पेठे

सातपुड्याच्या (Satpuda) दुर्गम भिल्ल गावांत पीक कापणीचा (Crop Harvest) हंगाम दिवाळीच्या आसपास सुरू होतो. कापणीकरून शेत रिकामं झालं की, त्यामधील पिकांचे अवशेष, उगवलेले गवत काढून तिकडे खळ तयार केले जाते. मळणीचे काम सुरू करण्याअगोदर खळ्याची पूजा होते.

या पूजेत साफ केलेल्या पालापाचोळ्याचा ढीग रचतात, त्यावर शेण-पाणी-मातीचा (Water And soil) थर देऊन या ढीगाची पूजा करून त्याचे सुद्धा आभार मानतात. परिसरातील जीव-जंतु-पाला-पाचोळयाशी इतका समरस होणारा हा जनजाती समाज!

यांची शेती पद्धतीसुद्धा स्वतःच्या कुटुंबासोबतच जनावरांची, जमीनीची काळजी घेते. शेतकऱ्यांना धान्य, जनावरांना चारा-वैरण आणि शेताला खत असे सर्वच यातून मिळते. स्थानिक भौगोलिक-जैविक परिस्थिति व उद्भवु शकणाऱ्या नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन, परिसराच्या क्षमता व मर्यादा यांचे भान राखून, माणूस,जनावरे व जमिनीचे पोषण करणारी, वर्षानुवर्षाच्या अनुभवांवर उभी राहिलेली ही एक अद्भुत व्यवस्था आहे.

रीडस् ही संस्था महाराष्ट्र, गुजराथ, तेलंगणा आशा विविध राज्यांमध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे नाशिक व अमरावती या 4 जिल्ह्यातील 80-90 गावांमध्ये ही संस्था काम करते. स्थानिक संस्था संघटनांना नैसर्गिक संसाधन आधारित उपजीविकांचे बळकटीकरणासाठी शास्त्रीय व तांत्रिक मार्गदर्शन व सहकार्य करते.

या विषयात जल-जमीन-जंगल-पशुधन हे सर्वच विषय अंतर्भूत आहेत. परंपरागत शेती ही या सर्व संसाधनांची काळजी वाहणारी व्यवस्था असल्यामुळे शेती हा रीडस्च्या कामातील एक महत्वाचा आयाम आहे. पारंपरिक बीज, स्थानिक सेंद्रिय निविष्ठा व भूमीसुपोषण हे रीडस्च्या शेती विषयक कामातील प्रमुख focus आहे.

शाश्वत धारणाक्षम शेती

भरडधान्य, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला, इ. अनेक पिके एकत्रितपणे पारंपरिक शेती पद्धतीत लावली जातात. दुष्काळ, ढगफुटी, गारपीट, वादळ, पूर, याच्यामुळे एखाद्या पिकाचे नुकसान झाले तरी इतर पिके तग धरून राहतात. माणसं आणि जनावरांच्या पोटाला पुढील वर्षी आधार देतात.

नवीन शास्त्रीय अभ्यासानुसार या पद्धतीला मिश्रपीक पद्धती (mixed cropping system) असे म्हटले जाते. पिकांच्या मुळांची व फांद्यांची रचना, जमिनीची सुपीकता, सूर्यप्रकाशाची उपलब्धता, वाऱ्याचा वेग या सर्व संसाधनांचा, पुरेपूर वापर या पद्धतीत होतो. एका पिकाचे अवशेष हे दुसऱ्या पिकासाठी संसाधन किंवा पोषण म्हणून काम करते. अनेक प्रकारच्या वनस्पती शेतात विखुरल्या असल्यामुळे रोग-कीडिंचा प्रादुर्भाव मर्यादित राहतो (ETL- economic threshold level). विविध पीकांमधील सहसंबंधांमुळे मिश्रपीक पद्धती अधिक स्वयंपूर्ण असते व यात बाहेरच्या संसाधनांची आवश्यकता कमी भासते.

पारंपरिक पीक पद्धतीत स्थानिक खाद्यसंस्कृति, हवामान, जमीन, पाण्याच्या उपलब्धता, आशा सर्व बाबींचा विचार केला जातो. आशा मिश्र-लागवडीसाठी शेतकऱ्यांनी स्थानिक परिस्थितीनुरूप पीकांचे विविध वाणं तयार केले व पिढ्यानपिढ्या सांभाळून ठेवले.

परिसरातील काही वैशिष्ठ्यपूर्ण वाण

ज्वारीचे वाण: हलक्या जमिनीत, लवकर तयार होणारी स्वादिष्ट ‘ओहवी जुवार’

स्थानिक देवता ‘देवमोगरा’ हिची लाडकी, पांढरीशुभ्र, गोड चवीची, टपोऱ्या दाण्यांची, रोगप्रतिकारक‘दूध-मोगरा जुवार’

लाल रंगाची, चिकट, पापडांसाठी योग्य, पीठ पुष्कळ दिवस चांगले राहू शकणारी ‘चिकणी जुवार’

हलक्या जमिनीत येणारी, पक्षांना खाता न येणारी, ‘पाखरी जुवाई’

उंच वाढणारी, चांगला चारा निर्माण करणारी, गोड दाणे असलेली, ‘जेखराळी माणिजुवाई’ या ज्वारीचे एकदा उत्पन्न काढून पुन्हा खोडवा घेता येतो

मक्याचे वाण: हलक्या जमिनीत येणारा मोठ्या दाण्यांचा मका ‘वोडा डोडा’

दुष्काळ व अन्न तुटवडा असताना लवकर परिपक्व होणारा, रंगीत मका ‘ओहवा राअता डोडा’

भाजीपाल्याचे वाण: सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ साठवण क्षमता असणार, लहान आकाराचा, लाल भोपळा ‘साकियो कोयलो’

होळीच्या पवित्र नृत्यात पाळण करणाऱ्याच्या कमरेला बांधले जाणारे सुरईच्या आकाराचे दुधी भोपळे, ‘तुंबाडे’

भगरीचे प्रकार: अति पावसात पिके कुजून गेली तर जमीन पुन्हा तयार करून भाद्रपदामध्ये लावता येणारी, दवाच्या ओलाव्यावर वाढवू शकणारी ‘मोर’ हा भगरीचा प्रकार

हिवाळ्यात पाण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी चारा व धान्यासाठी वापरली जाणारी ‘पादी’ नावाची भगर.

बियाणे निर्मितीचा भारतीय वारसा आणि सद्यस्थिति

अशा प्रकारच्या अनेक वाणांना नंदुरबार जिल्ह्याच्या दुर्गम गावांमधील जनजाती शेतकऱ्यांनी पिढ्यांपिढ्या राखून ठेवलेल्या आहेत. कमी-अधिक प्रमाणात देशभरातील जनजाती शेतकऱ्यांचे असेच योगदान आहे. देशभरातील अनेक पारंपरिक वाणांची निर्मिती, संगोपन व संवर्धनाचे श्रेय त्यांना जाते.

बियाणे निर्मिती मधील इतका उज्वल वारसा असूनही दुर्दैवाने सद्यपरिस्थितीत भारतातील बहुतांशी बीज संशोधनाचा दृष्टिकोन हा अतिशय एककल्ली व संकुचित आहे. अधिक उत्पादन देणारे, सिंचन-रसायनांना चांगला प्रतिसाद देणाऱ्या वाणांच्याच निर्मितीची चढाओढ लागून राहिली आहे. स्वाभाविकच पीक पद्धतींची शिफारस देखील अशाच प्रकारे केल्या जातात. यातून शेतीच्या उत्पादन खर्चात बेसुमार वाढ होते. हा खर्च बियाणे, विविध रासायनिक निविषठा, मशागतीची अवजारे यामध्ये विभागला आहे.

बाहेरून खरेदी केलेल्या संसाधनावर शेतकऱ्याचे अवलंबूनत्व वाढत चालले आहे. मोनोकल्चर/ एक पीक पद्धतीचा विस्तार होताना दिसतो. खर्चाचा ताळेबंद बसवण्यासाठी शेतात एकाच प्रकारचे पीक, किंबहुना एकाच वाणाचे पीक घेतले जाते. यातून शेतकरी कुटुंब आपली अन्नसुरक्षा गमावतात. तसेच चारा, कडबा, खत हे देखील मिळत नाही. एखाद्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकाचे नुकसान झाले किंवा रोग किडींचा प्रादुर्भाव झाला तर त्या हंगामात संपूर्ण नुकसान होवून, शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ येते. आर्थिक गुंतवणूक भरमसाठ असल्यामुळे अनेक वेळेला शेतकरी कर्ज बाजारी होवून जातात.

दृष्टिकोण विकासाची स्वाभाविक प्रक्रिया:

या परिस्थितीबाबत सर्व शेतकरी अनभिज्ञ आहे असे मात्र नाही. अक्कलकुवा तालुक्याच्या पहाडी भागात मोलगी परिसर सेवा समिती नामक स्थानिक जनजाती शेतकऱ्यांचे संघटन आहे. योजक: सेंटर फॉर रिसर्च अँड स्टरॅटेजिक प्लॅनिंग फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या मार्गदर्शनातून ते आपल्या परिसराचा अभ्यास व धारणाक्षम विकासाची प्रक्रिया करत आहेत.

मागील काही वर्षात सातपुड्यातील पावसाचे स्वरूप बदलले आहे, तो उशिरा सुरू होवून पार नोवेंबर पर्यन्त लांबतो असे त्यांनी अनुभवातून नोंदवले आहे. अशा परिस्थितीत दाणे भरण्याच्या काळातील पावसामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढून पिशवीबंद हायब्रीड ज्वारीचे खूप नुकसान होते.

धान्य तर हाती लागत नाहीच, पण हायब्रिड ज्वारी उंचीने कमी असल्यामुळे यातून जनावरांच्या चाऱ्याचीही व्यवस्था होऊ शकत नाही. मात्र या बदललेल्या पर्जन्यमानात ‘दूधमोगरा’ हे पारंपरिक वाण ८-१० फूट उंची गाठते, त्याचे कणीस देखील हायब्रीड ज्वारी पेक्षा मोठे आणि दाणे टपोरे असतात. कणीस मोकळे व सैल असल्यामुळे त्यात पावसाचे पाणी अडकून राहत नाही व बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव टळतो. शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा पारंपरिक दुधमोगरा ज्वारी लावण्याकडे कल वाढला आहे.

हवामान बदलाच्या या काळात पारंपरिक वाणांचे महत्व वाढत जाणार हे तर उघडच आहे. दुर्दैवाने आधुनिकीकरणाच्या ओघात अनेक स्थानिक वाणं नोंदणी होण्याअगोदर लोप पावल्या आहेत.

पारंपरिक वाणांची नोंदणीचे काम मोठ्या स्तरावर तातडीने सुरू होणे अतिशय गरजेचे आहे. योजकच्या मार्गदर्शनातून, REEDS व कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारच्या मदतीने सुजाण सामाजिक संघटनांनी पारंपरिक वाणांची सहभागीय नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे.

या नोंदणीमध्ये अधिकाधिक समाज घटकांना सहभागी कसे करून घेता येईल, यावर भर असतो. आशा प्रकारच्या लिखित नोंदींमुळे या पारंपरिक ज्ञानाचे अधिकार Intellectual Property Rights (IPR) जनजाती समाजाकडे राहायला मदत होईल.

या नोंदणी कार्यक्रमाची दखल महाराष्ट्र राज्य जैवविविधता महामंडळाने घेऊन, या माहितीचे पुस्तकस्वरूपात प्रकाशन केले. परिसरात बाईफ BAIF सारख्या संस्थेने देखील ज्वारी, मका, इ. वाणांची नोंदणी केली आहे.

जिवंत वाण:

वाणांचे संवर्धन करणे, म्हणजे त्यांना साठवून ठेवणे एवढेच नसते. बदलत जाणाऱ्या हवामान परिस्थितीत स्वतःच्या जनुकीय घडणीत अनुकूलन करत राहण्याची संधि बियाण्याला मिळत राहण्यासाठी त्यांची योग्य हंगामात पेरणी होणे देखील तितकेच आवश्यक आहे.

नैसर्गिक अनुकूलनासोबतच योग्य निवड संस्कारांमधून बियाण्याची कणसे निवडली जाणे, त्यांची योग्य साठवणूक होणे व पेरणीपूर्वी योग्य बीजप्रक्रिया करणे सर्वच महत्वाचे असते. या सर्व प्रक्रियेतूनच दुर्गम भागातील शेतीला climate resilience प्राप्त होईल. या दृष्टिकोनातून मोलगी परिसरात एकलव्य आदिवासी विकास मंडळाच्या वतीने पारंपरिक बियाण्यांचा संग्रह कंजाला येथे मेराली जैवविविधता केंद्र या नावाने केला आहे. यामध्ये ज्वारीचे ६२, भाताचे २५, मक्याचे ३, चवळीचे १८, वालपापडीचे २२ वाण नोंदवले गेले आहेत. ते वेळोवेळी शेतकऱ्यांना पुरवले जातात.

तात्पर्य: स्थानिक जनजाती समाजाची कुलदैवत ‘देवमोगरा देवी’ सुद्धा कृषिदेवता आहे. तिच्या दर्शनासाठी जाताना सोबत भात-ज्वारी-मका बीज घेऊन जाण्याची पद्धत आहे. मातेच्या मंदिरात मोठ्या कणग्यांमध्ये आपापला बियाण्यांचा चढावा जमा केला जातो. दर्शनासाठी 3 राज्यांमधील भिल-मावची-पावरा-तडवी समाज येतो व कणग्यांमध्ये बियाणे जमा करतो. परत फिरताना या कणगीतिल मूठ-मूठ धान्य प्रसाद म्हणून माघारी नेले जाते.

घरच्या बियाण्यात ते मिसळून पुढील हंगामात त्याची पेरणी करतात. आधुनिक शास्त्राच्या दृष्टीने जनुकीय वैविध्यातून बियाण्याला स्थैर्य व तग धरून राहण्याची क्षमता वाढते. आशा परांपरांमुळे या दुर्गम भागातील समाज व त्यांची शेती दीर्घकाळ टिकून राहिली आहे. स्थानिक परिस्थितीला अनुकूल परंपरागत बियाणे हा आपल्या देशाचा मोठा वारसा आहे.

भारतीय शेतकऱ्यांचे शेती व बियाणे विषयातील उन्नत ज्ञानाचे हे द्योतक आहे. या वारशाचा योग्य मान राखणे आवश्यक आहे. हे बियाणे व त्यांच्याशी जोडलेले पारंपरिक ज्ञान संकलित करणे, त्याचे संरक्षण, संवर्धन करणे, शेतकऱ्यांनी ते पेरत राहणे हेच या ज्ञान परंपरेचे आधुनिक पूजन ठरेल.

लेखिका - जुई पेठे

प्रोग्राम कोऑर्डिनेटोर, रीडस्, महाराष्ट्र. Member, PPV&FR Authority, Agriculture and Farmers Welfare Ministry, Government of India.

फोन ७५८८१०९५२०

ईमेल: Jui.Pethe@reedsbharat.org

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT