महाराष्ट्रावरील हवेचे दाब वाढत असून या आठवड्यात १०१० ते १०१२ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहिल्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण आणि जोर कमी होईल. उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी होईल. (Monsoon Rain) दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर (RainFall) काही काळ राहील.
त्यानंतर तेथेही कमी होईल. ईशान्य मॉन्सून अखेरच्या टप्प्यात आहे. ऑक्टोबर महिन्यात १२ तारखेपर्यंतचा पावसाचा आढावा घेतला असता भंडारा जिल्ह्यात सरासरी पेक्षा २१८ टक्के, धुळे जिल्ह्यात २०९ टक्के, गोंदिया जिल्ह्यात १७२ टक्के, जळगाव जिल्ह्यात १५६ टक्के, वाशीम जिल्ह्यात १४० टक्के, अकोला जिल्ह्यात १४० टक्के,अमरावती जिल्ह्यात ११३ टक्के,यवतमाळ जिल्ह्यात ११३ टक्के आणि नागपूर जिल्ह्यात ११८ टक्के अधिक पाऊस झाला आहे. लांबपल्याचा स्थानिक ठिकाणांचा पावसाचा अंदाज देता धुळे,जळगाव, मध्य विदर्भ आणि पूर्व विदर्भात यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, असा आपण १ जून २०२२ रोजी दिलेला अंदाज खरा ठरला आहे.
कोल्हापूर,सांगली, ठाणे, मुंबई, रायगड, सातारा, नगर, हिंगोली तसेच पालघर,लातूर, नांदेड, वर्धा या जिल्ह्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मात्र सरासरी पेक्षा कमी झाला आहे. उर्वरित जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. यापुढे पावसाचे प्रमाण कमी होऊन उघडीप राहील.
१) कोकण ः सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी २२ ते ३४ मि.मी. आणि सोमवारी ६० मि.मी. पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात रविवारी ८ मि.मी. आणि सोमवारी १८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात सोमवारी ४ मि.मी. पावसाची शक्यता असून पालघर जिल्ह्यात पावसात उघडीप राहणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ९ कि.मी. राहील. कमाल तापमान पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील;
तर रायगड व ठाणे जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील; तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यात ते २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ७० ते ८० टक्के तर दुपारची ४३ ते ५७ टक्के राहील.
२) उत्तर महाराष्ट्र ः नाशिक, धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ कि.मी. राहील.
कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील; तर किमान तापमान २१ अंशसेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ६० ते ७० टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आद्रता ४० टक्के राहील.
३) मराठवाडा ः उस्मानाबाद, लातूर व नांदेड जिल्ह्यात रविवारी २६ ते ३२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात ३४ मि.मी. पावसाची शक्यता असून नांदेड जिल्ह्यात ५१ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
बीड व परभणी जिल्ह्यात रविवारी ७ मि.मी. आणि सोमवारी ३३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी ५ ते ७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ कि.मी. राहील. कमाल तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ७४ ते ८९ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आद्रता ५४ ते ६५ टक्के राहील.
४) पश्चिम विदर्भ ः पश्चिम विदर्भात पावसात उघडीप राहील. बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती या जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील; तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ६७ ते ७७ टक्के राहील; तर दुपारची सापेक्ष आद्रता ४० ते ४८ टक्के राहील.
५) मध्य विदर्भ ः यवतमाळ जिल्ह्यात रविवारी २२ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात २३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वर्धा व नागपूर जिल्ह्यात सोमवारी ७ ते ८ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. राहील.
कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील; तर किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ७६ ते ८५ टक्के, तर दुपारची ५७ ते ६२ टक्के राहील.
६) पूर्व विदर्भ ः रविवारी चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ३० ते ३५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तसेच सोमवारीही तितक्याच पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ७ कि.मी. राहील.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील; तर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ८१ ते ९४ टक्के तर दुपारची ६० ते ७० टक्के राहील.
७) दक्षिण पश्चिम महाराष्ट्र ः रविवारी कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात ३२ मि.मी., सांगली व सातारा जिल्ह्यात २२ मि.मी., पुणे जिल्ह्यात १७ मि.मी. व नगर जिल्ह्यात ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे.
मात्र सोमवारी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात ६० मि.मी., पुणे जिल्ह्यात ५० मि.मी., सोलापूर जिल्ह्यात ३४ मि.मी. व नगर जिल्ह्यात २५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ९ कि.मी. राहील.
कमाल तापमान ३४ ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आद्रता ७४ ते ९२ टक्के राहील व दुपारची सापेक्ष आद्रता ४० ते ६० टक्के राहील.
कृषी सल्ला ः
१) जनावरांना रोगप्रतिबंधक लस द्यावी.
२)कोंबड्यांना लसीकरण करावे.
३) फळबागांचा हस्त बहर धरावा.
४) द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी पूर्ण करावी.
५) हरभरा, गहू, रब्बी ज्वारीची पेरणी योग्य ओलीवर व वेळेवर करावी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.