Hapus Mango Agrowon
ताज्या बातम्या

Hapus Mango : हापूसचा हंगाम लांबणार

हवामानातील बदलाचा यंदाही परिणाम

Team Agrowon


ॲग्रोवन वृत्तसेवा
रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : ‘ऑक्टोबर हीट (October Heat) ’ची वाणवा, तापमानातील चढ-उतार, थंडीचे कमी प्रमाण या वातावरणीय कारणांमुळे बागांना पालवी फुटण्यास झालेला उशिरामुळे हापूस आंबा हंगाम (Hapus Mango Season) लांबणीवर पडणार आहे. नोव्हेंबरमध्ये मोहर येण्याऐवजी पालवी येत असल्याने मोहर महिनाभर लांबणार असल्याचे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हापूस बागायतदारांनी ही चिंता व्यक्त केली आहे.

कोकणात सर्वसाधारणपणे ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून आंबा कलमांना मोहोर येण्यास सुरवात होते. परंतु यावर्षी नोव्हेंबर महिना संपत आला तरी अजूनही मोहोराऐवजी पालवी दिसत आहे. थंडी उशिरा सुरू झाल्याने ८० टक्क्यांहून अधिक कलमांच्यावर पालवी आहे. काही भागात केवळ १० टक्के कलमांवर मोहोर फुटत असल्याचे चित्र असल्याने यंदा आंबा हंगाम महिनाभर लांबण्याची शक्यता आहे. बहुतांश कलमांना डिसेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात मोहोर येण्याची शक्यता असल्याने हंगाम मार्च अखेरीपर्यंत सुरू होईल, असा बागायतदारांचा अंदाज आहे.

यंदा ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत पावसाचे वातावरण होते. ऑक्टोबर हीट जाणवली नाही. झाडांच्या मुळांमधील पाणी सुखलेले नाही. वनस्पती वाढ नियंत्रकांचा वापर केलेल्या कलमांना मोहर फुटण्यास सुरवात झाली आहे, मात्र ते प्रमाण अत्यल्प आहे.

---चौकट----
दृष्टिक्षेपात हापूस क्षेत्र (हेक्टरमध्ये)
रत्नागिरी जिल्हा : ६५ हजार
सिंधुदुर्ग जिल्हा : ३५ हजार

चौकट--------
‘देवगड हापूस’ही लांबणार
देवगड परिसरात हापूस कलमांना नोव्हेंबरमध्ये मोहोर येण्याऐवजी पालवी दिसत आहे. यंदाही प्रारंभी पोषक परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु थंडीने गणित बिघडल्यामुळे हंगाम महिनाभर लांबण्याची शक्यता बागायातदारांनी व्यक्त केली आहे. साधारणात: मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हापूस काही प्रमाणात बाजारपेठेत दिसू लागेल. त्यामुळे दरही चढेच राहतील, असा अंदाज आहे. किनारपट्टी भागातील हापूस मार्चपासून बाजारपेठेत दाखल होतो. मात्र जिल्ह्याच्या पूर्वपट्टयातील आंबा एप्रिल अखेरीस परिपक्व होण्यास सुरुवात होते. गेल्यावर्षी १५ मे नंतर पूर्वपट्टयात आंबा तयार झाला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा लागवडीखाली ३५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी २८ हजार क्षेत्र उत्पादनक्षम आहे. देवगड हापूसचे बहुतांश क्षेत्र देवगड, मालवण, वेंगुर्ला तालुक्यात आहे. याशिवाय कुडाळ, सावंतवाडीसह अन्य तालुक्यांमध्ये देखील आंबा लागवड वाढली आहे.


यंदाच्या हंगामात थंडी उशिरा सुरू झाल्यामुळे कलमांवर सध्या पालवी दिसत आहे. ही पालवी तयार झाल्यानंतर मोहोर फुटेल. साधारणपणे १३ ते १५ अंश सेल्सिअस तापमान १२ ते १५ दिवस टिकून राहिल्यास चांगला मोहोर येतो. गेल्या तीन दिवसांपासून देवगड पट्यात चांगली थंडी वाढू लागली आहे. त्यामुळे मोहोर फुटण्यास अनुकूल वातावरण तयार झाले आहे. काही भागात कलमांना मोहोर देखील आला आहे. बागायतदारांनी सध्याच्या काळात कोवळी पालवी तसेच मोहोरावरील तुडतुड्यांच्या नियंत्रणाकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
- डॉ. विजय दामोदर, प्रभारी अधिकारी,
आंबा संशोधन उपकेंद्र, रामेश्वर, जि. सिंधुदुर्ग


देवगड पट्यात हापूस कलमांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पालवी आणि अखेरपर्यंत मोहोरण्यास सुरवात होणे अपेक्षित असते. परंतु थंडी लांबल्याने नोव्हेंबर अखेरपर्यंत पालवी फुटत आहे. त्यामुळे हंगाम महिना ते सव्वा महिना लांबण्याची शक्यता आहे.
- तेजस मुळम, कलबंई, जि. सिंधुदुर्ग


सध्याचे वातावरण पोषक असून थंडीचा जोरही वाढत आहे. ही परिस्थिती पंधरा दिवस अशीच राहिली, तर हापूसच्या हंगामाचे स्पष्ट चित्र होईल. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षीत उष्मा नव्हता. त्याचा परिणाम हंगामावर झाला आहे.
- देवेंद्र झापडेकर, रत्नागिरी, आंबा बागायतदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavistar Ai App: ‘कृषी’कडून शेतकऱ्यांसाठी ‘महाविस्तार एआय’ ॲप

California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत

Crop Loan: कर्जदार ९४ हजार शेतकऱ्यांना परतफेडीची चिंता

Farmer Protest: ‘शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या’

Sugar Commissioner: राज्याच्या साखर आयुक्तपदी डॉ. संजय कोलते यांची नियुक्ती

SCROLL FOR NEXT