नवी दिल्ली : राॅयटर्स वृत्तसंस्थेने देशातील साखर उत्पादन यंदा ७ टक्क्यांनी कमी राहील, असा अंदाज व्यक्त केल्यानंतर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय साखर बाजारात खळबळ उडाली. त्यावर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने खुलासा करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु गेल्या वर्षीपेक्षा यंदा सव्वादोन लाख टनाने साखर उत्पादन कमी राहील, असे महासंघाने म्हटले आहे.
देशातील ऊस गाळप हंगाम सुरु होऊन एक महिना उलटला. यंदा देशातील साखर उत्पादन विक्रमी पातळीवर पोचेल, असा अंंदाज साखर उद्योगाने व्यक्त केला होता. केंद्र सरकारनेही अतिरिक्त साखर उत्पादन गृहित धरून निर्यातीचे धोरण आखले. परंतु आता साखर उत्पादन कमी होण्याची बातमी रॉयटर्सने दिल्यामुळे उलटसुलट चर्चेला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील साखर निर्यातीला परवानगी मिळणार का, मिळाली तरी त्याचे प्रमाण कमी राहील का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी निवेदन प्रसिध्दीस दिले आहे. काही वृत्तसंस्थांनी यंदा देशातील साखर उत्पादन ७ टक्क्याने कमी राहील, असे म्हटले आहे. या वृत्तामुळे देशातीलच नव्हे तर जागतिक साखर क्षेत्रात खळबळ उडाली आहे, असे या निवेदनात नमूद केले आहे.
दांडेगावकर पुढे म्हणतात की, देशभरातील गाळप हंगाम परतीच्या पावसामुळे जवळपास दोन ते तीन आठवडे उशीरा सुरु झाला. त्यातच केंद्र शासनाने नवे साखर निर्यात धोरण जाहीर करण्यास जवळपास एक महिना उशीर केला. त्यासोबतच हंगामाच्या सुरुवातीला पडलेली कडाक्याची थंडी नंतरच्या काळात गायब झाली. या सर्व घटनांमुळे काही तज्ज्ञांनी घाईघाईत भारतातील साखर उत्पादनात घट होणार असल्याचे भाकित केलेले दिसते, अशी टिप्पणी दांडेगावकर यांनी केली आहे.
``वास्तविक हंगाम किमान ६० दिवसाचा पूर्ण झाल्याशिवाय ऊस व साखर उत्पादन याचा अंदाज वर्तविता येत नाही. तसेच उसाखालील क्षेत्रात झालेली वाढ, खोडव्याचे प्रमाण, हवामानाचा तुरे येण्यावर दिसत असलेला परिणाम अशी जमिनीवरची वास्तव परिस्थिती लक्षात घेऊन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने यंदाच्या हंगामात अपेक्षित साखर उत्पादन ३५७ लाख टन राहण्याचा अंदाज दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन सव्वा दोन लाख टनांनी कमी राहील,`` असे दांडेगावकर यांनी म्हटले आहे.
यंदा ३० नोव्हेंबरअखेर गेल्या वर्षीच्या तुलनेत ८९ लाख टन ऊस गाळप जास्त झाले असून २ लाख ९० हजार टन अधिक साखर उत्पादन झाले आहे. परंतु यंदा साखर उतारा घटला आहे.
…………
उत्पादनाचे अंदाज
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने साखर उत्पादनाचा अद्ययावत अंदाज वर्तवला आहे.
यंदाच्या हंगामातील अपेक्षित उत्पादनः ३५७ लाख टन
गेल्या वर्षीचे साखर उत्पादनः ३५९ लाख २५ हजार टन
गेल्या वर्षीपेक्षा साखर उत्पादनातील घटः २ लाख २५ हजार टन
………….
प्रतिक्रिया
चालू हंगामात मागील हंगामातील ६१ लाख ५३ हजार टन साखर शिल्लक आहे. यंदा इथेनॉलसाठी ४५ लाख टन साखरेचा वापर होईल. तर २७५ लाख टनांचा स्थानिक खप आणि ७५ लाख टन साखर निर्यातीचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा साखरेचा शिल्लक साठा ७१ लाख ५३ हजार टन राहण्याचा अंदाज आहे. ही स्थिती लक्षात घेता साखरेच्या दरावर फारसा परिणाम होणार नाही.
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ