Solapur News : टाळ-मृदंगाचा गजर करणारे वारकरी, उंचावलेल्या भगव्या पताका, माउली-माउली नामाचा टिपेला पोचलेला अखंड जयघोष आणि अश्वानं केलेल्या नेत्रदीपक दौडीने संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील खुडुस (ता. माळशिरस) येथील दुसऱ्या गोल रिंगणाने रविवारी (ता.२५) वारकऱ्यांचे डोळे दिपले.
गेल्या काही दिवसांपासून तीव्र उन्हामुळे काहिली काहिली झालेल्या वारकऱ्यांना गेल्या दोन दिवसांतील ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे काहीसा आल्हाददायक अनुभव येतो आहे. दरम्यान आलेल्या मॅान्सूनने रखडलेल्या खरिपाच्या पेरण्या पुन्हा सुरु होणार आहेत. ‘विठुरायाने जणू आमचे ऐकले’, हे भाव वारकऱ्यांच्या चेहऱ्यांवर जाणवत आहेत.
दरम्यान, रविवारी सकाळी माळशिरसमधला मुक्काम उरकून माउलींचा पालखी सोहळा वेळापूरकडे निघाला. सोहळा खुडुस पाटीवर आला, तेव्हा खुडूसला परंपरेप्रमाणे चोपदारांनी रिंगण लावले. नंतर भोपळे दिंडीतील मानकऱ्याने निशाण घेऊन धाव घेतली. त्यानंतर स्वाराचा आणि मानाच्या अश्वाने दोन फेऱ्या मारल्या आणि रिंगण पूर्ण केले.
अश्वाच्या या फेरीनंतर वारकऱ्यांनी टाळमृदंगाचा गजर आणि विठुनामाचा जयघोष करत हा आनंद डोळ्यात साठविला. वातावरण भक्तिपूर्ण झाले. दुपारी पालखी निमगाव पाटीवर विसाव्यासाठी थांबली. त्यानंतर पुढे ती वेळापूरमुक्कामाठी मार्गस्थ झाली. आज (ता.२६) ठाकुरबुवा समाधीजवळ गोल रिंगण होईल. तर दुपारनंतर टप्पा येथे सोपानदेव आणि ज्ञानदेव ही बंधूभेट होईल.
संत तुकाराम महाराज पालखी बोरगावात
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा रविवारी (ता.२५) माळीनगरात होता. सकाळी माळीनगरला उभे रिंगण रंगले. हे रिंगण पाहण्यासाठीही वारकरी आणि भाविकांची मोठी गर्दी झाली. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने या रिंगणसोहळ्याचा अनुभवही उपस्थितांनी घेतला. यानंतर पालखी सोहळा बोरगावकडे मार्गस्थ झाला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.