Raju Shetti News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी संघटनेतील अंतर्गत धुसफूसाची नाराजी उघड केली आहे. मागच्या काही काळापासून रविकांत तुपकर नाराज असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. अशातच तुपकरांनी काल (ता. २) कार्यकर्ता मेळावा घेत 'स्वाभिमानी'मधील काही वरिष्ठांवर थेट नाराजीचा सूर व्यक्त केला.
दरम्यान यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्याशी चर्चा केल्यास ते म्हणाले की, रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी युवा आघाडी विदर्भचे प्रशांत डिक्कर यांच्यातील तो अंतर्गत वाद आहे. यातून संघटनेला किंवा चळवळीला तडा जाईल असे काही नाही. आम्ही राज्य कार्यकारणीची पुढच्या आठवड्यात बैठक घेऊन दोघांनाही बोलवून घेत योग्य मार्ग काढणार असल्याची त्यांनी सांगितलं.
तुपकर हे बुलडाणा लोकसभा मतदार संघातून तयारी करत आहेत ते स्वाभिमानीचे लोकसभेचे उमेदवारही असतील असे राजू शेट्टी म्हणाले. रविकांत तुपकर आणि प्रशांत डिक्कर हे बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे काम करतात पूर्वी ते दोघे एकत्र काम करत होते परंतु काही कारणास्तव त्यांच्यात मतभेद झालेत.
मी रविकांत तुपकर यांच्या सभा किंवा मोर्चे असतील तर जात असतो. डिक्कर यांच्याही सभांना जात असतो परंतु यातून गैरसमज होईल असे काही नाही. हा वाद लवकर मिटवला जाईल. दरम्यान तुपकर आणि डिक्कर हे दोघेही शेतकरी चळवळीसाठी काम करतात. त्यांचे बुलडाण्यात शेतकरी चळवळीसाठी मोठे योगदान आहे. परंतु अंतर्गत मतभेदामुळे त्यांच्यात नाराजी असेल तर लवकरच बैठक घेत वाद संपवला जाईल अशी माहिती शेट्टी यांनी अॅग्रोवनशी बोलताना दिली.
रविकांत तुपकर यांची भूमिका काय?
राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरून तरुणांना एकजूट केले पण आपल्यावर अन्याय होत असेल तर काय करायचे असा थेट सवाल त्यांनी कार्यकर्त्यांना केला. यावेळी कार्यकर्त्यांसह आपण राज्यभर रान उठवणार असल्याची घोषणा केली. परंतु ते स्वाभिमानीतच राहणार की दुसरा कोणता झेंडा घेणार याबाबत अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही.
तुपकरांनी जिल्ह्यात, तसेच राज्यात सुरू असलेल्या संघटनेतील अंतर्गत राजकारणाचा समाचार घेतला. संघटनेत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना राज्यस्तरावरील काही नेते परस्पर पदांवरून काढून टाकत आहेत. याबाबत कुठलीही विचारणा आपणास होत नसल्याचे सांगत आपणही तुमच्या जिल्ह्यात येऊन असे करू शकतो.
मात्र आपण करणार नाही. स्वाभिमानीचे संस्थापक राजू शेट्टी जिल्ह्यात आजवर तीन वेळा आले. मात्र आपणास दोन वेळा त्यांच्या दौऱ्याबाबत माहिती नव्हती, अशी खंत त्यांनी जाहीर बोलून दाखवली.
राज्यात संघटना वाढीसाठी वेळोवेळी प्रयत्न केले. लोक जोडले. त्यातील बरेच मोठेही झाले. मात्र आता दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवत आपल्यावर वार केला जात आहे, असेही तुपकर म्हणाले.
लढा सुरूच ठेवणार
मागील काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत धुसफूस आज तुपकरांच्या भाषणातून व्यक्त झाली. शेतकरी चळवळीत आजवर केलेला प्रवास थांबवायचा की चालू ठेवायचा, असा प्रश्न कार्यकर्त्यांना विचारला. त्यावर उपस्थित सर्वांनी हा लढा सुरू ठेवण्याबाबत घोषणा दिल्या.
तुपकरांची राष्ट्रवादीशी जवळीक
मागच्या काही महिन्यांपासून तुपकर यांचे राजू शेट्टी यांच्यासोबत मतभेद असल्याची चर्चा रंगत आहे. अशातच रविकांत तुपकर यांनी राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. यावर तुपकर संघटनेला रामराम करणार का अशी जोरदा चर्चा होती. याचबरोबर रविकांत तुपकर यांनी सदाभाऊ खोत यांच्या संघटनेत जाऊन पुन्हा युटर्न घेतला होता. आता ते काय भूमिका घेतात यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.