विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सत्ताधाऱ्यांकडून भाजपचे आमदार राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. रविवारी ही निवडणूक होणार आहे.
नार्वेकर यांना सुमारे १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचे सत्ताधारी गोटातून सांगितले जात आहे. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) हे ४५ वर्षांचे असून अध्यक्षपदी निवड झाल्यास ते विधानसभेचे आजवरचे सर्वात तरूण अध्यक्ष ठरतील.
रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होईल. याच निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत शनिवारपर्यंत असून महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजन साळवी यांनी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील (Jayanat Patil) आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव चव्हाण यावेळी उपस्थित होते. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी असा सामना पहायला मिळणार आहे.
साळवी हे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आहेत. शिवसेनेतील बहुतांशी आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असताना साळवी मात्र ठाकरे यांच्यासोबत राहिले. त्यांच्या पक्षनिष्ठेमुळे शिवसेनेने (Shivsena) त्यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी संधी दिली.
रविवारी अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत सरकारने बाजी मारली तर शिंदे सरकारचे विधानसभेतील बहुमत सिद्ध होईल. त्यानंतर विश्वासदर्शक ठराव ही औपचारिकता असेल. त्यामुळे शिंदे सरकारची खरी परीक्षा रविवारी होणार आहे.
१६ आमदारांच्या अपात्रतेची टांगती तलवार सरकारवर आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदावर (Assembly Speakar)भाजपचा उमेदवार निवडून आल्यास या प्रकरणाला निर्णायक वळण लागू शकते. त्यामुळे अध्यक्षपदाची निवडणुक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकावी लागेल.
दरम्यान विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसतर्फे संग्राम थोपटे (Sangram Thopte) हे अर्ज दाखल करतील, असे विधान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले. संग्राम थोपटे हे काँग्रेसचे भोरचे आमदार आहेत. ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव थोपटे यांचे ते चिरंजीव आहेत. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी ही शक्यता नाकारली. प्रारंभी काँग्रेसकडून डमी अर्ज दाखल करण्याची चर्चा होती, मात्र आता निर्णय झाला आहे. महाविकास आघाडीकडून केवळ राजन साळवी यांचाच अर्ज असेल, असा खुलासा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.
निवडणुकीवर काँग्रेसचा आक्षेप
विधानसभा अध्यक्ष पदाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना निवडणूक कशी लावली? यासंदर्भात काँग्रेसने विधी मंडळाचे प्रधान सचिव यांना पत्र दिले आहे. या निवडणुकीबाबत काँग्रेसने आपला आक्षेप नोंदवला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.