Crop Insurance Agrowon
ताज्या बातम्या

Pik Vima Kharif 2023: पीक विमा मुदतवाढीमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा

Team Agrowon

Pradhan Mantri Fasal Bima Yojana : सर्व्हर डाऊन, वेबसाईट संथ चालणे, अतिवृष्टीमुळे रस्ते बंद असल्याने जन सुविधा केंद्रांपर्यंत (Common Service Center- CSC) पोहोचण्यात अडथळे यासारख्या अडचणींमुळे ज्या शेतकऱ्यांना ३१ जुलै पर्यंत पीक विमा भरणे शक्य नाही, त्यांना आता दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी पिक विमा भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै होती. ही मुदत वाढविण्याची मागणी शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात केली जात होती. अनेक आमदारांनीही त्यासाठी आग्रह धरला होता. अखेर केंद्र सरकारने ही मागणी मान्य करत मुदत तीन दिवसांनी वाढवली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना ३ ऑगस्टपर्यंत पीक विम्याचा अर्ज भरता येईल. 

राज्यात एकीकडे अतिवृष्टी झाल्याने पिके पाण्याखाली गेली आहेत. तर दुसरीकडे पुरेसा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तसेच अनेक ठिकाणी गोगलगाय सारख्या कीटकांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात अनेक ठिकाणी पाऊस झालेला असला तरी ऑगस्टमध्ये पाऊस पुन्हा ओढ देण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. एकंदरित या हंगामात पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढणे फायदेशीर ठरेल, असे जाणकारांनी सांगितले. 

खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.  तसेच यंदापासून राज्य सरकारने १ रुपयात पीक विमा योजना लागू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे विमा हप्ता भरण्याची गरज उरलेली नाही. शेतकऱ्यांचा विमा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. 

यंदा शेतकऱ्यांनी विमा योजनेला भरभरून प्रतिसाद दिला. दरम्यान, आतापर्यंत १ कोटी ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असल्याचे ट्विट कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दिवसाला सहा ते सात लाख शेतकरी अर्ज भरत आहेत. परंतु अनेक ठिकाणी पीकविम्याचे सर्व्हर डाऊन असणे, ऑनलाइन सातबारा न निघणे आदी कारणांमुळे नोंदणी करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे राज्यभरातून पीक विम्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी होत होती. त्यानुसार आता केंद्र सरकराने पीकविमा भरण्याची मुदत ३ ऑगस्टपर्यंत वाढवली आहे.  


कोणत्या पिकांसाठी विमा

खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका, भुईमूग, कारळे, तीळ, सोयाबीन, कापूस आणि खरीप कांदा अशा एकूण १४ अधिसूचित पिकांसाठी, अधिसूचित महसूल, मंडळ, क्षेत्रात शेतकऱ्यांना सहभाग घेता येईल. 

अर्ज कसा करायचा?

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी विहित मुदतीपूर्वी संबंधित बँक, http://pmfby.gov.in आणि आपले सरकार सेवा केंद्र, जन सुविधा केंद्र  यांच्यामार्फत विमा अर्ज करता येईल.  कर्जदार आणि बिगर कर्जदार अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेतील सहभागासंदर्भात शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास तालुका संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय तसेच तालुका कृषी अधिकारी, नजिकची बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत सध्याचे हरभरा दर ?

Sugarcane FRP : ऊस उत्पादकांना ‘एफआरपी’बाबत अपेक्षा

Heavy Rain Damage : पुसदमध्ये अतिवृष्टिग्रस्तांना विशेष पॅकेज देण्याची मागणी

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन अनुदानासाठी प्रतीक्षाच

Crop Insurance : पालम तालुक्यातील शेतकरी पीकविमा परताव्यापासून वंचित

SCROLL FOR NEXT