Jalna News : मागील १५ ते २० दिवसांपासून असलेले ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते तसेच बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे फळगळ दिसून येत आहे. फळगळ थांबविण्यासाठी नत्रयुक्त खतांचा व बुरशी नाशकांचा फवारणीद्वारे वापर करावा. मोसंबी पिकात अन्नद्रव उपलब्धतेसाठी जैविक खतांवर भर देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी प्रमुख डॉ. संजय पाटील यांनी केले.
जालना जिल्ह्यातील मोसंबी पिकातील फळगळीचा प्रश्न लक्षात घेऊन तातडीने कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे मोसंबी पिकातील फळगळ समस्या व व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण शुक्रवारी (ता. ११) आयोजित करण्यात आले होते.
अध्यक्ष म्हणून मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण भगवानराव काळे तर प्रमुख व्याख्याते म्हणून बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील, कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी, मृद्शास्त्रज्ञ राहुल चौधरी, इंजिनीअर पंडित वासरे, उद्यानविद्या तज्ज्ञ सुनील कळम यांची उपस्थिती होती.
मराठवाडा शेती साहाय्य मंडळाचे विश्वस्त कृषिभूषण काळे म्हणाले, की एकात्मिक व्यवस्थापनातून मोसंबी पिकात होणारी फळगळ कमी करणे शक्य आहे. मोसंबी हे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रतिष्ठेचे फळ पीक आहे. इतर फळ पिकांच्या तुलनेत बदलत्या हवामानात मोसंबी हे शाश्वत उत्पादन देणारे पीक आहे.
सद्यःस्थितीतील फळगळ समस्याला तोंड देण्यासाठी जमीन व्यवस्थापन, झाडाजवळचा वाफसा, अन्नद्रव्याची गरज तसेच कीड व रोग व्यवस्थापनाचा अभ्यासपूर्वक शास्त्रीय वापर होणे गरजेचे आहे, असे मतही श्री. काळे यांनी व्यक्त केले.
मोसंबीमधील कीड व रोगामुळे होणारी फळगळ थांबविण्यासाठी एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाचा वापर करावा, असे अजय मिटकरी यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. मोसंबीतील अन्नद्रव्य व्यवस्थापन यावर राहुल चौधरी यांनी तर सिंचन व्यवस्थापन यावर पंडित वासरे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन पीक संरक्षण तज्ज्ञ अजय मिटकरी यांनी केले तर आभार उद्यानविद्या तज्ज्ञ सुनील कळम यांनी मानले. कार्यक्रमास जिल्ह्यातील साठपेक्षा जास्त गावातून मोसंबी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.