Taloda News : तळोदा तालुक्यासह सातपुड्याच्या दऱ्या खोऱ्यात बिबट्या, अस्वल, तरस ,कोल्हा, लांडगा या हिंस्र प्राण्यांसह शेकडोंच्या संख्येने मोरांचा अधिवास असल्याचे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या प्राणी गणनेवरून स्पष्ट झाले.
वन विभागाकडून नेमकी संख्या अजून कळली नसली तरी या प्राण्यांचा अधिवास दिसून आल्याने वन्यप्रेमी व प्राणी प्रेमींसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र ही जैवविविधता टिकून राहण्यासाठी सर्वांच्या सामूदायिक प्रयत्नांची गरज असल्याचे देखील बोलले जात आहे.
मेवासी वनविभाग तळोदा यांच्यामार्फत बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणी गणना करण्यात आली. या अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील तळोदा, अक्कलकुवा खापर, मोलगी, वडफळी व काठी अशा सहा वनपरिक्षेत्रात ही प्राणी गणना करण्यात आली.
गणना करण्यासाठी २१ ठिकाणी जंगलात मचाण उभारण्यात आले होते. त्यासाठी ६३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून गमन, जामठी, वाल्हेरी राणीपूर, मालदा, काठी, वडफळी, मोकस, मोगरा, जमाना, कुंडवा, सुरगस, मोलगी, मोगराबारी अशा ठिकाणी वन कर्मचाऱ्यांनी रात्रभर जागून प्राण्यांचा अधिवास शोधण्याचा प्रयत्न केला.
कर्मचाऱ्यांना बिबट्या, तरस, अस्वल, कोल्हे, लांडगे, रानडुकरे अशा प्रजातीचे प्राणी दिसून आल्याचे सांगण्यात आले. रात्रभर कोल्ह्यांची कुई कुई तर बिबट्यांची डरकाळी देखील ऐकू आल्याचे सांगण्यात आले.
या प्राणी गणनेसाठी तळोदा मेवासी वन विभागाचे उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपवनसंरक्षक, सहा वनक्षेत्रांचे वनक्षेत्रपाल, वनपाल व वन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पक्षीप्रेमींसाठी पर्वणी
तळोदा अक्कलकुवा तालुक्यातील वनक्षेत्रात मोर प्रजातींच्या पक्षांची संख्या लक्षणीय आढळून आली आहे. मालदा, राणीपूर, वाल्हेरी वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मोरांचे वास्तव्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे पक्षी प्रेमींसाठी ही पर्वणी ठरली असून पक्षीप्रेमींनी देखील आनंद व्यक्त केला आहे.
बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना करण्यात आली. विविध ठिकाणी मचाण उभारण्यात आले होते. प्राण्यांची आकडेवारी अजून उपलब्ध झालेली नाही. तरी वनक्षेत्रात बिबट्या, अस्वल, कोल्हे, लांडगे व मोर अशा वन्य प्राण्यांच्या अधिवास दिसून आला आहे. त्यात मोरांची संख्या लक्षणीय आहे.लक्ष्मण पाटील, उपवनसंरक्षक, मेवासी वन विभाग तळोदा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.