Bajara Sowing
Bajara Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Bajara Sowing : खानदेशात बाजरी पेरणीला सुरुवात; क्षेत्र वाढण्याचा अंदाज

Team Agrowon

जळगाव ः खानदेशात बाजरीच्या पेरणीला (Bajara Sowing) सुरुवात झाली आहे. यंदा क्षेत्र किंचित वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बाजरी अधिक थंडीत पेरू नये, असे शेतकरी म्हणतात. परंतु यंदा थंडी हवी तशी नाही. यामुळे शेतकरी आगाप पेरणी करीत आहेत. अनेकदा खानदेशात जानेवारीच्या मध्यात पेरणी केली जाते. परंतु यंदा ही पेरणी १५ ते २० दिवस लवकर सुरू झाल्याचे दिसत आहे.

अनेक शेतकऱ्यांनी यंदा कांदा, मका पिकाऐवजी बाजरी पेरणीचे नियोजन केले आहे. काहींनी मका, कांद्याची लागवड कमी करून उर्वरित क्षेत्रात बाजरी पेरणीचे नियोजन केले आहे. यामुळे बाजरीच्या क्षेत्रात किंचित वाढ होईल. यंदा सुमारे साडेसात ते आठ हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी होईल. मागील हंगामात सुमारे सात हजार हेक्टरवर बाजरी होती. जळगाव जिल्ह्यात तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे.

धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा व साक्री हे तालुके बाजरीसाठी प्रसिद्ध आहेत. जळगावमधील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, भडगाव, जामनेर. धरणगाव व चोपडा भागात बाजरीचे क्षेत्र अधिक असते. धुळ्यातील शिंदखेडा तालुका बाजरीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात खरीप व रब्बीतही अनेक शेतकरी बाजरीची पेरणी करतात. सुमारे ९० ते १०० दिवसांत बाजरीचे पीक येते. उन्हाळ्यात काही भागांत जलसाठे कमी होतात.

त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरवातीलाच बाजरीचे पीक काढणी करून उत्पादन घरात आणण्याच्या दृष्टीने शेतकरी नियोजन करीत आहेत. कारण उन्हाळ्यात पाण्याची समस्या तयार झाल्यास किंवा विजेची अडचण आल्यास पिकाची हानी होते. ही बाब लक्षात घेऊन अनेक शेतकरी लवकर किंवा आगाप पेरणी करीत आहेत. बाजरीला बाजारात २१०० रुपये प्रतिक्विंटलवर दर आहे. तसेच उठावही आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मक्याऐवजी बाजरीला पसंती दिली आहे.

अनेक शेतकऱ्यांनी कांदेबाग केळीची काढणी ९० टक्के झालेल्या बागेतही पेरणी केली आहे. तापी, गिरणा, अनेर नदीच्या क्षेत्रात बेवडसाठी बाजरीची पेरणी शेतकरी करतात. बाजरी पिकाचे बेवड केळी किंवा पुढे कापूस पिकासाठी लाभदायी मानले जाते. बाजरीचा चाराही सकस असतो. त्याच्या चाऱ्यासही चांगला दर असतो. यामुळेदेखील काहींनी बाजरीची पेरणी केली आहे. एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन व आगाप येणाऱ्या वाणांच्या पेरणीला शेतकरी पसंती देत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : वादळी पूर्वमोसमी पावसाचा इशारा कायम

Mango Season : हापूसच्या लोकप्रियतेत रायवळ आंबा गायब

Panhala Monsoon Rain : पन्हाळा तालुका पूर्वहंगामी पावसाच्या प्रतीक्षेत; खरिपाच्या मशागतीसाठी पावसाची गरज

Sangli DCCC Bank : सांगली जिल्हा बॅँकेची ‘८८’अंतर्गत चौकशी सुरू

Fodder Shortage : चाऱ्याअभावी पशुधन संकटात

SCROLL FOR NEXT