Milk Production Agrowon
ताज्या बातम्या

Milk Production : दूध उत्पादनात घट; मागणीत ७ टक्क्यांनी वाढ

देशातील दूध उत्पादनाला कोरोना लॉकडाऊन आणि लम्पी स्कीन रोगामुळे मोठा फटका बसला. कोरोना काळात पशुधन संख्या वाढली नाही, तर लम्पीच्या काळात गोवंशाची संख्या कमी झाली.

Team Agrowon

Pune News भारतात सध्या डेअरी उत्पादनांची टंचाई (Dairy Product Shortage) जाणवत आहे. लॉकडाऊनमध्ये दुभत्या जनावरांचे प्रजनन कमी झाले. तसेच ‘लम्पी स्कीन’ रोगामुळे (Lumpy Skin Disease) गोवंशाची झालेली जीवितहानी आणि बाधित जनावरांची कमी झालेली दूध क्षमता यामुळे देशातील दूध उत्पादन (Milk Production) कमी आहे. पण दुसरीकडे मागणीत ७ टक्क्यांपर्यंत वाढ झाली.

त्यामुळे दूध आणि डेअरी उत्पादनांच्या किमती वाढल्या आहेत. देशात पुढील वर्षभर टंचाई जाणवू शकते. त्यामुळे जगातील आघाडीचा दूध उत्पादक असलेल्या भारतावर दूध पावडर आणि इतर डेअरी उत्पादने आयातीची वेळ येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशातील दूध उत्पादनाला कोरोना लॉकडाऊन आणि लम्पी स्कीन रोगामुळे मोठा फटका बसला. कोरोना काळात पशुधन संख्या वाढली नाही, तर लम्पीच्या काळात गोवंशाची संख्या कमी झाली. यामुळे देशातील दूध उत्पादन घटले. परिणामी दुधाच्या दरात मागीलवर्षीच्या तुलनेत १५ टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली.

बहुतेक भागांमध्ये दुधाचे सरासरी भाव ५६ रुपये प्रतिलिटरच्या दरम्यान पोचले आहेत. दुधाचे भाव वाढल्याने किरकोळ महागाई वाढत असल्याचे सरकारी संस्थांचे म्हणणे आहे. तसे पाहिले तर ग्राहक किंमत निर्देशांकात दुधाला ६.६ टक्के भारांक आहे. त्यामुळे दूध दरवाढीचा मुद्दा लगेच चर्चेत येतो.

कोरोनानंतरच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात दुग्धजन्य पदार्थांना मागणी होती. त्यामुळे २०२२ मध्ये भारतातून डेअरी उत्पादनांची निर्यात ३९ टक्क्यांनी वाढली.

त्यानंतर देशात दूध उत्पादन कमी होत गेले. परिणामी देशातील बटर अर्थात लोणी आणि दूध पावडरचा साठा कमी झाला. तसेच कोरोनानंतर देशात प्रथिनेयुक्त डेअरी उत्पादनांना मागणी वाढली होती. यामुळे दरात वाढ दिसत आहे.

एका अहवालानुसार, देशात ज्या प्रमाणात डेअरी उत्पादनांची मागणी वाढली, त्या प्रमाणात दूध उत्पादन वाढले नाही. शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दुभत्या जनावरांच्या किमती वाढल्या आहेत. कोरोना काळात दुधाचे दर कमी होते.

त्यावेळी पशुधनाचे भावही कमी झाले होते. लॉकडाऊनच्या काळात दुधाचा खपही कमी झाला होता. पशुपालनातून या काळात शेतकऱ्यांना तोटाच झाला. त्यामुळे दुभत्या जनावरांची संख्या कमी झाली. परिणामी दूध उत्पादनवाढीच्या काळातही साठा कमी राहिला.

मागणी वाढली

डेअरी उद्योगांच्या मते, देशात चालू वर्षात डेअरी उत्पादनाच्या मागणीत चांगली वाढ झाली. देशातील डेअरी उत्पादनांची मागणी ७ टक्क्यांनी वाढली. पण त्यातुलनेत देशातील दूध उत्पादन वाढले नाही. देशातील उत्पादनातील वाढ ही केवळ एक टक्क्याच्या दरम्यान असू शकते. तर मागील दशकभरात देशातील दूध उत्पादन वाढीचा वार्षिक दर ५.६ टक्क्यांवर होता.

वर्षभर तुटवडा राहणार?

शेतकरी आणि डेअरी उद्योगाच्या मते, देशातील दूध उत्पादन चालू वर्षात वाढण्याची शक्यता कमीच आहे. दुभत्या जनावरांची संख्या ऑक्टोबरनंतर वाढू शकते. त्यानंतरच दूध उत्पादनही वाढेल.

त्यामुळे २०२३ मध्ये दूध उत्पादन वाढण्याची शक्यता कमीच आहे. दुसरीकडे डेअरी उत्पादनांना मागणी चांगली आहे. पण ऐन उन्हाळ्यात डेअरी उत्पादनांचा पुरवठा कमी असल्याने पुढील काळात आणखी दरवाढ शक्य आहे.

आयात करावी लागणार का?

देशात सध्या डेअरी उत्पादनांची मागणी वाढली. मात्र त्यातुलनेत उत्पादन वाढले नाही. परिणामी दरात वाढ झाली. उत्पादन यंदा कमीच राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे भारतावर दूध पावडर आयातीची वेळ येऊ शकते, असे उद्योगाकडून सांगण्यात येत आहे.

भारताची दूध पावडर आयात यंदा विक्रमी पातळीवर पोहचू शकते, असाही अंदाज आहे. असे झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारातही दरवाढ शक्य आहे. भारताची जानेवारीतील दूध पावडर आणि मलाई आयात विक्रमी झाली आहे.

‘लम्पी स्कीन’ रोगाचा मोठा फटका

देशात लम्पी स्कीन रोगाने गोवंशाची मोठी हानी झाली आणि दूध उत्पादनही घटले. देशातील लाखो गोवंशाला लम्पी स्कीन रोगाची लागण झाली होती.

तर देशात १ लाख ८४ हजार गोवंश मृत्यूमुखी पडले. यापैकी राजस्थानमध्ये ७६ हजार जनावरांचा समावेश आहे. आता लम्पी आटोक्यात आला तरी उत्पादनक्षमता कमी झाली आहे.

तसेच लम्पीतून बऱ्या झालेल्या जनावरांची दूध देण्याची क्षमताही कमी झाली. ही जनावरे बरी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला होता. त्यामुळे हे शेतकरी आजही तोट्याचा दूध व्यवसाय करत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT