Shinde-Fadnavis Sarkar News : राज्याच्या मंत्रिमंडळातून कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेच्या पाच वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू द्यावा, यासाठी भाजपने दबाव आणल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यात तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता. १२) संध्याकाळी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळात कोणाला कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी केले आहे.
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडून भाजप आणि शिंदे गट यांनी एकत्र येत नवीन सरकार स्थापन केले. अनेक दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचेच मंत्रिमंडळ होते. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अवघ्या १८ मंत्र्यांना संधी देण्यात आली. हे सर्व कॅबिनेट मंत्री आहेत. दीर्घकाळापासून मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचे सांगण्यात आले. लवकरच विस्तार होईल असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेक दिवसांपासून सांगत असले तरी विस्ताराला काही मुहुर्त मिळत नसल्याने सरकारवर टीका होत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे अनेक इच्छुक आमदार मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल मोठी खलबते झाल्याची चर्चा आहे. या बैठकीत शहा यांनी शिवसेनेच्या पाच मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांना मंत्रिमंडळातून हटवण्याच्या सूचना दिल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या आहेत.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार, रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचा या यादीत समावेश असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्ताराआधी या पाच मंत्र्यांना डच्चू देण्याचा विचार सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेना मंत्री, नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दलचे वादग्रस्त वक्तव्य, टीईटी घोटाळा, सिल्लोड कृषी महोत्सव आदी अनेक प्रकरणांत त्यांची भूमिका वादग्रस्त ठरली. आता दोन दिवसांपूर्वी अकोला जिल्ह्यात कृषी विभागाच्या बोगस पथकाने निविष्ठा उत्पादक कंपन्यांच्या गोदामांवर टाकलेल्या धाडी आणि पैसे उकळल्याचे आरोप यामुळे सत्तारांचे नाव पुन्हा चर्चेत आले आहे. सत्तार यांचे मंत्रिपद जाईल, अशी चर्चा सुरू आहे. भाजप त्यासाठी आग्रही असला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्तार यांना भक्कम पाठिंबा असल्यामुळे त्यांना अभय मिळेल, असेही बोलले जात आहे.
शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याने त्यांना हटवून नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा, यासाठी भाजपकडून शिवसेनेवर दबाव असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपली वर्णी लागावी, यासाठी शिवसेना आणि अपक्ष आमदारांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अशातच भाजपच्या चंद्रकांत बावन्नकुळे यांनी माध्यमांना सांगितले की, मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे आणि कोणाला काढायचे हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. ``आज मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. शिवसेना पक्षातील निर्णयांमध्ये भाजप हस्तक्षेप करणार नाही. तो त्यांचा निर्णय असणार आहे,`` असे बावनकुळे म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.