Pune News : मॉन्सूनची दमदार वाटचाल सुरू असल्यामुळे खरिपाच्या उर्वरित पेरा झपाट्याने पूर्ण होत असून, राज्याचा एकूण पेरा आता ७८ टक्क्यांपर्यंत गेला आहे. विशेष म्हणजे सोयाबीनचा पेरा १०३ टक्क्यांवर, तर कपाशीचा पेरा आता ९४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. भात वगळता सर्व पेरण्या आठवडाभरात आटोपतील, असा अंदाज सूत्रांचा आहे.
१४२ लाख हेक्टरवर खरीप हंगाम घेणाऱ्या राज्यात कपाशी, सोयाबीन, तूर आणि भात ही मुख्य खरीप पिके आहेत. एकूण क्षेत्रापैकी ११० लाख हेक्टरवर पेरा झालेला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत पेरा ११९ लाख हेक्टरपर्यंत झालेला होता. पेरण्यांची टक्केवारी बघता गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी याच कालावधीत ९३ टक्के पेरण्या पूर्ण केल्या होत्या. यंदा मॉन्सून उशिरा आल्यामुळे सध्याचा पेरा ७८ टक्क्यांपर्यंत दिसतो आहे.
‘‘गेल्या आठवडा भरातील पावसामुळे सोयाबीन, कपाशीच्या पेऱ्याची समस्या निकालात निघाली आहे. या पंधरवड्यात खरिपाच्या सर्व पेरण्या आटोपतील. कोणत्याही भागात खरिपाचे क्षेत्र नापेर राहणार नाही.
सध्या सर्व पेरण्यांमध्ये केवळ भाताच्या पेरण्या पिछाडीवर आहेत. मात्र भाताला भरपूर पाऊस हवा असल्यामुळे अगदी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत भाताची पुनर्लागवड चालू राहील,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.
राज्यात सध्या कपाशीच्या सरासरी ४२ लाख हेक्टरपैकी २० जुलैपर्यंत ३९.४७ लाख हेक्टरचा पेरा (९४ टक्के) आटोपला आहे. सोयाबीनच्या ४१.४९ लाख हेक्टर सरासरी क्षेत्रापैकी शेतकऱ्यांनी यंदा आतापर्यंत ४२.७४ लाख हेक्टरवर पेरा केला आहे. शेतकरी साधारणतः १३ लाख हेक्टरवर तुरीचा पेरा करतात.
त्यापैकी आतापर्यंत ९.५३ लाख हेक्टरवर (७४ टक्के) पेरा झालेला आहे. भात लागवडीचा विचार करता सरासरी १५ लाख हेक्टरवर भात घेतला जातो. शेतकऱ्यांनी आतापर्यंत ३१ टक्के लागवड पूर्ण केली आहे. विदर्भात यंदा ७ ऑगस्टपर्यंत लागवड सुरु राहील. त्यामुळे भाताचेही क्षेत्र नापेर राहण्याची शक्यता वाटत नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
पेरण्यांमध्ये वर्धा, यवतमाळची आघाडी
मॉन्सूनच्या हुलकावणीमुळे यंदा गेल्या पंधरवड्यापर्यंत अनेक जिल्ह्यात समाधानकारक पेरा झालेला नव्हता. मात्र, गेल्या आठवडाभरातील पावसामुळे अनेक जिल्ह्यांनी पेरण्यांमध्ये आघाडी घेतली आहे.
२० जुलैअखेर सरासरी खरीप क्षेत्राच्या तुलनेत वर्धा (९७ टक्के), यवतमाळ (९५ टक्के), अमरावती (९४ टक्के), बुलडाणा (९२ टक्के) तर जळगाव (९१ टक्के) या जिल्ह्यांनी आघाडी घेतली आहे. मात्र, ठाणे (९ टक्के), पुणे (३८ टक्के), सोलापूर (२९ टक्के), सांगली (२० टक्के), भंडारा (२८ टक्के) आणि गडचिरोली (२६ टक्के) असे जिल्हे खरीप पेऱ्यात अद्यापही पिछाडीवर आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.