Cow Milk Rate  Agrowon
ताज्या बातम्या

Cow Milk Rate : गायीच्या दुधाचे दर ३५ रुपये देणे अशक्य

Dairy industry : डेअरी उद्योगाने सांगितल्या अडचणी

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Cow Milk : पुणे ः गायीच्या दुधाचे खरेदीदर प्रतिलिटर ३५ रुपये करण्यासाठी राज्य शासनाने आदेश जारी केल्यास त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही, असे डेअरी उद्योगातील (Dairy industry) सूत्रांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ म्हणाले, ‘‘गायीच्या दुधाचा खरेदीदर प्रतिलिटर ३५ रुपये करण्याची सूचना शासनाने एक बैठक घेऊन केली होती. मात्र, बाजारपेठेत तशी परिस्थिती नसल्याचे आम्ही स्पष्ट केले.

त्यामुळे दरवाढीची सूचना व्यवहार्य नसल्याचे आम्ही त्याच बैठकीत स्पष्ट केले आहे. अर्थात, जादा दर देण्याचा आदेश शासन काढू शकते. तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता नाही.

शासनाने ३५ रुपये दराने आधी ‘महानंद’मार्फत स्वतःचेच दूध खरेदी करून दाखवावे. यापूर्वी २०१८ मध्ये शासनाने असेच खरेदीदर वाढवून प्रतिलिटर २५ रुपये देण्याचे आदेश दिले होते. ते आम्ही ऐकले आणि प्रचंड तोटा सहन केला. त्यामुळे डेअरी उद्योग आता सावधपणे भूमिका घेईल.’’

‘‘शेतकरी हितासाठी दुधाचे खरेदीदर वाढविण्यास कोणाचाही आक्षेप नाही, असे दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाने स्पष्ट केले आहे. दुधाची खरेदीदरातील वाढ व्हावी, ही आमचीदेखील इच्छा आहे. परंतु, शासनाच्या सूचनानुसार लगेच दरवाढ करता येत नाही.

बाजारपेठेतील स्थिती, उत्पादन खर्च आणि उपपदार्थांचे भाव याचे गणित तपासूनच दरवाढीचे निर्णय घ्यावे लागतात. शासनाने सद्यःस्थितीचा अभ्यास करावा व खरेदीदराबाबत उचित निर्णय घ्यावा,’’ असेही श्री. कुतवळ यांनी स्पष्ट केले.

संघाचे अध्यक्ष गोपाळराव म्हस्के म्हणाले, ‘‘३४ ते ३५ रुपयांच्या खाली दुधाची विक्री करणे शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही. मात्र, त्यासाठी शासनाला दोन पावले पुढे यावे लागेल. राज्य शासनाने अनुदानाची योजना आणल्यास शेतकऱ्यांना दुधाचे खरेदीदर निश्चितपणे जास्त मिळू शकतील.

परंतु, सहकारी किंवा खासगी दूध प्रकल्प तोटा सहन करून दुधाचे खरेदीदर वाढविण्याची शक्यता नाही. शासनाने स्वतःहून प्रतिलिटर ४-५ रुपये अनुदान दिल्यास दरवाढ शक्य आहे. शेजारील राज्यांना दरवाढ देणे परवडते; मग आपल्या राज्याला का नाही, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.’’

‘‘दूध प्रकल्पांना खरेदीदर ठरविण्यापूर्वी बाजारपेठेचा अभ्यास करावा लागतो. सध्या दूध भुकटी व लोण्याचे बाजार घसरता आलेख दर्शवीत आहेत. अशा स्थितीत खरेदीदर एकदम वाढविणे शक्य होणार नाही’’, असे सोनई दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष दशरथ माने यांनी स्पष्ट केले.

डेअर उद्योगाचे मत असे...
- ३५ रुपये दराने ‘महानंद’ने खरेदी करून दाखवावे
- भुकटी व लोण्याच्या दराचा घसरता आलेख


- दूध प्रकल्प तोटा सहन करून दुधाचे खरेदीदर वाढविण्याची शक्यता कमी
- शासनाने प्रतिलिटर ४-५ रुपये अनुदान दिल्यास दरवाढ शक्य
- शासनाने सद्यःस्थितीचा अभ्यास करून निर्णय घ्यावा

राज्यात सध्या गायीच्या दुधाचा खरेदीदर सरासरी प्रतिलिटर ३२ रुपये आहे. मात्र, भुकटीचे दर प्रतिकिलो ३३० रुपयांवरून २५० रुपयांपर्यंत घसरले आहेत.

तसेच, लोण्याचे भावदेखील प्रतिकिलो ४३० रुपयांवरून ३५० रुपयांपर्यंत गडगडले आहेत. त्यामुळे पुढील दोन-तीन महिने तरी दुधाचा खरेदीदर ३२ ते ३३ रुपयांवर स्थिरावण्याची शक्यता आहे.
- श्रीपाद चितळे, संचालक, चितळे उद्योग समूह.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाईचे वितरण सुरू

Agrowon Diwali Article : आदिवासींची निसर्गपूरक शेती

Agrowon Diwali Article: शाश्‍वत शेती पद्धतीशिवाय पर्याय नाही

Soybean MSP : हमीदर ५३२८ रुपयांचा खरेदी केली केवळ ५०० रुपये क्‍विंटलने

Agrowon Diwali Article: स्त्रियांची शाश्‍वत शेती

SCROLL FOR NEXT