पुणेः 'मनडूस' (Mandous Cyclon) चक्रीवादळाची तीव्रता कमी होऊ लागली. दक्षिणेत काही भागांमध्ये पाऊस (Rain) पडत आहे. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरु असून शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली. राज्यातही पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला.
बंगालचा उपसागरात निर्माण झालेले 'मनडूस' चक्रीवादळ पूर्व किनाऱ्याकडे झेपावत आहे. ही वादळी प्रणाली उद्या सकाळपर्यंत पूर्व किनाऱ्यावरील पदुच्चेरी, श्रीहरीकोटा ते महाबलीपूरम दरम्यान किनाऱ्याला धडकणार आहे. समुद्रात ताशी ८० ते १०० किलोमीटर वेगाने चक्राकार वारे वाहणाऱ्या वादळाचे केंद्र ताशी १२ किलोमीटर वेगाने वायव्य दिशेकडे सरकत होते, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली.
चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांमध्ये अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. किनारी भागातील शाळांना सुट्टीही देण्यात आली. तसेच या भागातील विमानतळांवरून विमानांचे उड्डानही रद्द करण्यात आले.
उद्या पहाटे तामिळनाडू किनारपट्टीच्या मामल्लापुरम ह्या ठिकाणीच आदळण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याचे हवामान तज्ज्ञ मानिकराव खुळे यांनी सांगितले.तर वादळ परिणामानंतर उत्तर भारतातून लगेचच महाराष्ट्रात थंडी येऊ शकते, असेही खुळे यांनी सांगितले. परंतू चक्रीवादळनंतर बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याची शक्यता आहे, खुळे म्हणाले.
तर चक्रीवादळामुळे प्रणालीच्या प्रभावामुळे महाराष्ट्रासह दक्षिण भारतात ढगाळ वातावरण झाले आहे. आजपासून दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर कमाल आणि किमान तापमानातही चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
……………
प्रतिक्रिया
वादळ विरळतेकडे झुकून त्याचे हवेच्या अति तीव्र दाबात आणि त्याच दिवशी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याचे हवेच्या तीव्र दाबात रूपांतर होईल. त्यामुळे या भागात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबई आणि कोकण वगळता राज्यात तापमानात घट झाली. त्यामुळे रात्री थंडी आणि दिवसा ऊबदारपणा जाणवत आहे.
- मानिकराव खुळे, जेष्ठ हवामान तज्ज्ञ