Amravati News : २०१९ मधील पीककर्जाच्या माफीसाठी पात्र असतानाही माफी मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्याने म्हातारपणीची ठेव म्हणून जमा केलेल्या फिक्स डिपॉझिटमधूनच पीककर्जाची रक्कम परस्पर कपात केल्याचा गंभीर प्रकार येथील महाराष्ट्र बँकेने केला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या बँक प्रशासनाविरोधात गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, असा संतप्त सवाल आमदार बळवंत वानखडे यांनी संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाला खडसावताना केला.
अंजनगावसुर्जी तालुक्यातील लखाड येथील शेतकरी रमेश गणपत सावरकर यांनी महाराष्ट्र बँक शाखा अंजनगाव येथून २०१६ मध्ये ९५ हजार ६६८ रुपये पीककर्ज काढले होते.
परंतु सततच्या नापिकीमुळे आणि अल्पभूधारक असल्यामुळे ते पीककर्ज भरण्यास असमर्थ ठरले.
अशातच २०१९ मध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची योजना सुरू झाली. त्यामुळे आपण कर्जमाफीसाठी पात्र असल्याने आज ना उद्या कर्जमाफी होईल, या आशेवर शेतकरी रमेश सावरकर यांनी कर्ज भरले नाही.
परंतु बँकेने कोर्टाच्या नोटीस पाठवणे सुरू केले. अशातच त्या शेतकऱ्याला लोकन्यायालयात बोलावून तुमचे खाते ७२ हजार रुपयात सेटलमेंट करून देतो, असे आश्वासन बँक व्यवस्थापकाने दिले व काही कागदांवर त्यांच्या सह्या घेतल्या. त्यानंतर शेतकरी सावरकर यांची प्रकृती बिघडल्यामुळे ते बँकेत जाऊ शकले नाही.
परंतु महाराष्ट्र बँकेने ३१ मार्च २०२३ ला शेतकरी रमेश सावरकर यांनी बँकेत ठेवलेल्या दोन लाख रुपयांच्या फिक्स डिपॉझिटमधून एक लाख ८१ हजार रुपये परस्पर पीककर्जाच्या खात्यात वळती केले. या गंभीर बाबीची माहिती आमदार बळवंत वानखडे यांना कळताच कुठलाही विलंब न लावता त्यांनी महाराष्ट्र बँक गाठली आणि व्यवस्थापकास चांगलेच खडसावले.
शेतकऱ्याच्या फिक्स डिपॉझिटमधून परस्पर रक्कम का वळती केली, असा सवालही बँक व्यवस्थापकास करून सदर बाब तातडीने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या कानावर टाकून संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे केली. यावेळी आमदार बळवंत वानखडे यांच्या सोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद दाळू, शहराध्यक्ष प्रदीप देशमुख उपस्थित होते.
लखाड येथील शेतकऱ्याच्या जमा ठेवीमधून रक्कम कपात केल्याची कार्यवाही ही बँकेच्या नियमाप्रमाणेच करण्यात आली आहे.- रूपेश नंदनवार, महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.