Narendra Modi
Narendra Modi Agrowon
ताज्या बातम्या

Narendra Modi : स्थायी विकासावर भर ः मोदी

टीम ॲग्रोवन

नागपूर ः ‘‘शेतकऱ्यांसह समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याचे धोरण, त्यांच्यासाठीच्या योजनांतून (Government Scheme) त्यांचा स्तर उंचावण्यासाठीचा उद्देश, सोबतच सामान्यांच्या कररूपी पैशाचा दूरदृष्टी ठेवून विनियोग व त्यातून स्थायी विकास (Stable Development) हा सध्याच्या सरकारचा अजेंडा आहे. स्थायी विकासाच्या या मॉडेलमुळेच आम्ही गुजरातमध्ये (Gujarat Election) विक्रमी मतांनी जिंकू शकलो. या पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी मात्र कररूपी पैशाचा विनियोग सत्ता हडपण्यासाठीच केला,’’ असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील रस्त्याचे लोकार्पण, मेट्रो-२ योजनेचे भूमिपूजन, नागपूर-बिलासपूर वंदेभारत एक्‍स्प्रेसला हिरवा झेंडा अशा विविध उपक्रमाच्या उदघाटनानिमित्त एम्स परिसरात आयोजित जाहीर सभेत मोदी बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी आदी उपस्थित होते.

मोदी म्हणाले, ‘‘खाडी देशांकडे आपण कुतूहलाने पाहतो. परंतु संसाधनांचा विकास केल्याने ते आज विकसनशील ठरले आहेत. ‘फ्यूचर रेडी’ राष्ट्र असावे त्याकरिता तसे व्हिजन असले पाहिजे. भारतीय ज्या सिंगापूरला सातत्याने जातात, ते सिंगापूरही कधीकाळी सामान्य राष्ट्र होते. आता ते जगाचे आर्थिक केंद्र बनले आहे.

त्यांनी देखील सामान्यांच्या पैशाची उधळपट्टी केली असती, तर सिंगापूरही मागास राहिला असता. भारताच्या मागासलेपणाचे कारण म्हणजे या ठिकाणी बोकाळलेला भ्रष्टाचार. सामान्यांच्या पैशातून सत्ता विस्ताराचेच प्रयत्न यापूर्वीच्या सत्ताधारी, विरोधकांनी केले. आताचे सरकार मात्र सामान्यांच्या पाई-पाईचा विनियोग राष्ट्र समृद्धीसाठी करणारे आहे.’’

‘‘संसाधनांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल. देशातील सध्याचे स्थायी विकासाचे मॉडेल पुढील २५ वर्षांचे व्हिजन ठेवून तयार केले आहे. यातूनच नव्या विकसनशील राष्ट्राची उभारणी होईल. गुजरातने स्थायी विकासाच्या बळावरच विक्रमी मते दिली. विरोधकांनी सुद्धा शॉर्टकर्टऐवजी स्थायी विकासावर भर दिला तरच त्यांचा टिकाव लागेल,’’ असा टोला मोदी यांनी लगावला.

‘‘पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या औद्योगिक क्रांतीतून देशाला काहीच साधता आले नाही. आता चौथ्या औद्योगिक क्रांतीत मात्र देशाला आपले अस्तित्व दाखविण्याची संधी आहे. ही संधी आम्ही सोडणार नाही. औद्योगिक क्रांतीतून रोजगार निर्मितीचा उद्देश साधता येईल,’’ असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला.

मेट्रो प्रवासात विद्यार्थ्यांशी संवाद

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली. संकष्ट चतुर्थीनिमित्त त्यांनी शुभेच्छा देत युवकांना नवा संकल्प करण्याचा संदेश दिला. या वेळी त्यांनी बॅण्ड पथकात शिरत ढोल वाजविण्याचा आनंद घेतला. मेट्रो प्रवासात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

महाराष्ट्रावर आशीर्वाद असू द्या ः मुख्यमंत्री शिंदे

समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरेल. परंतु विदर्भ, मराठवाड्याला समृद्ध करणाऱ्या या जागतिक दर्जाच्या प्रकल्पात अनेकांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु हा विरोध झुगारत आता प्रकल्प मार्गी लागला आहे. यातून या भागातील शेतीचे अर्थकारण सुधारण्यास मदत होईल. केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्‍त प्रयत्नांतून हा प्रकल्प झाला. यापुढे देखील अशा जागतिक दर्जाच्या प्रकल्पासाठी पंतप्रधानांचे आमच्यावर आशीर्वाद असू द्यावेत,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ‘‘या पुढील काळात ‘जी-२० परिषद नागपुरात होईल. त्याचा उपयोग ब्रॅण्डिंगसाठी करता येईल. अशा अनेक संधी यापुढील काळात केंद्राकडून मिळाव्यात. नवे उद्योग या भागात येतील यासाठी देखील केंद्राने बळ द्या,’’ अशी मागणी शिंदे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Golden Jubilee : मातीच्या सन्मानाने ‘स्वराज ट्रॅक्टर्स’चा सुवर्ण महोत्सव साजरा

Crop Nutrient Management : पीक उत्पादन वाढीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापन

Fishery Employment : मत्स्य व्यवसायातील रोजगाराच्या विविध संधी

Raju Shetti Vs Eknath Shinde : 'शेतकरी तुम्हाला दहशतवादी वाटला का'? राजू शेट्टींच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीसा

Bird flu : केरळमधील बर्ड फ्लूने कर्नाटक अलर्टमोडवर; सीमावर्ती भागात तपासणी वाढवली

SCROLL FOR NEXT