Sugarcane Harvester
Sugarcane Harvester Agrowon
ताज्या बातम्या

Sugarcane Harvester : ऊसतोडणी यंत्रामुळे ठिबकचे नुकसान टाळण्याचा प्रयत्न

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : ऊस तोडणी यंत्राने तोडणी (Sugarcane harvester) करताना उसातील ठिबकचे नुकसान (Drip Irrigation) कमी व्हावे यासाठी शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याने (Shree Dutt Sugar Factory) पुढाकार घेतला आहे.

कारखान्याच्या सभासदांच्या शेतजमिनीवर येथून पुढील काळात ठिबक सिंचन करणाऱ्या कंपन्यांमार्फत सुलभ व कमी खर्चातील ठिबक सिंचन पद्धतीची प्रात्यक्षिके घेण्यात येणार आहेत.

रविवारी (ता. २९) शिरोळ येथील कारखान्यात राज्यातील नामवंत ठिबक सिंचन कंपन्यांचे प्रतिनिधी, विविध विद्यापीठांचे शास्त्रज्ञ, कारखाना व्यवस्थापन व शेतकऱ्यांमध्ये कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत निर्णय घेण्यात आला.

यंत्राने ऊस तोडीमुळे ठिबकचे नुकसान कमी व्हावे, अशा पद्धतीचे उपक्रम राबवणारा ‘दत्त’ पहिला कारखाना ठरला आहे.

गेल्या काही वर्षापासून ऊस तोडणी यंत्राने ऊस तोडणी वाढली आहे. मात्र यंत्राने ऊस तोडणी करताना ठिबक सिंचनाचे नुकसान होत असल्याने अनेक शेतकरी यंत्राने ऊस तोडणीचा पर्याय नाकारतात.

परिणामी यंत्र उपलब्ध असूनही ऊस तोडणी होऊ शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन कारखान्यांनी या संयुक्त बैठकीचे आयोजन केले.

यावर दिवसभर विविध तज्ञांमार्फत चर्चा झाली. राज्यातील नामवंत ठिबक सिंचनाचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.

बैठकीत सब सरफेस ठिबक सिंचन, स्प्रिंकलर, कमी जाडीचा पाइप वापरून ठिबक सिंचन आदी विषयांवर कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मते मांडली.

सब सरफेस ठिबक सिंचन हा पर्याय होत असला तरी तो सर्वच जमिनीमध्ये चालणारा नसल्याने अनेकांनी ही पद्धत योग्य नसल्याचे सांगितले.

अखेर कारखाना व्यवस्थापनाने प्रत्येक कंपनीला एक एकर जमीन प्रात्यक्षिकासाठी देण्याचे जाहीर केले.

यानुसार भारी व हलक्या जमिनीची निवड करून स्वस्तात ठिबक सिंचन करणे व ते ऊस तोडणी यंत्रासाठी अनुकूल असणे या बाबी तपासाव्यात असे सांगण्यात आले.

उसाची भरणी झाल्यानंतर लॅटरल दोन सरीच्या मध्ये ठेवणे, दोन्ही बाजूस पाल्याचे अच्छादन करणे, आदी बाबींवरही चर्चा झाली.

अखेर कंपन्यांनी कारखाना सभासदांच्या एक एकरावर प्रात्यक्षिके करावीत, जो पर्याय योग्य होईल तो स्वीकारावा, असे ठरवण्यात आले.

चर्चासत्रात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू योगेंद्र नेरकर, शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी, सुरेश पवार, डॉ. पी. पी. शिंदे, अजय देशपांडे, ‘नेटाफेम’चे अरुण देशमुख, ‘फिनोलेक्स’चे सुनील पाटील, ‘कोठारी ठिबक’चे जी. एच. यादव, ‘जैन ठिबक’चे आनंद गुलदगंड आदी उपस्थित होते.

कारखान्याचे कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगान्ना, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव, ए. एस. पाटील यांनी नियोजन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

Agrowon Podcast : कापूस वायद्यांमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, गहू यांचे काय आहेत दर ?

Agriculture Update : विकसित केलेले वाण शेतकऱ्यांनी वापरावे : कलंत्रे

SCROLL FOR NEXT