Drought Condition Agrowon
ताज्या बातम्या

Baramati Drought Condition : बारामतीच्या जिरायती भागामध्ये पावसाअभावी दुष्काळसदृश परिस्थिती

Team Agrowon

Baramati Drought News : मोरगाव, ता. बारामती ः तालुक्याच्या पश्‍चिम पट्ट्यात पावसाअभावी खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून निसटला असून, चाराटंचाई निर्माण झाली आहे. पुरेशा पाण्याअभावी बारामतीच्या जिरायती पट्ट्यामध्ये सध्या दुष्काळसदृश परिस्थिती असून, पावसाने ओढ दिल्यास रब्बी हंगामही धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

वास्तविक, जिरायती पट्ट्यामध्ये खरीप हंगामामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये बाजरी, चारा पीक, कांदा पीक यांचे उत्पादन घेतले जाते, मात्र ही सगळी पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात. सध्या खरीप हंगामामध्ये पावसाअभावी बाजरीच्या पेरण्या सरासरी तुलनेपेक्षा खूपच कमी प्रमाणात झाल्या आहेत. या भागांमध्ये असलेले नैसर्गिक स्रोत कालवा, शेततळी, नदी-नाले कोरडे ठाक पडले आहेत. त्यामुळे त्या त्या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. केवळ दोन तास विद्युत मोटर चालल्यानंतर, विहिरीत पाणी येईपर्यंत शेतकरी पाणी देऊ शकत नाहीत.

या पार्श्‍वभूमीवर सरकारने टंचाईग्रस्त गावांमध्ये दुष्काळ जाहीर करून टंचाई निवारण फंडातून किमान चारा आणि पाणी याची उपलब्धता करून द्यावी, अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे.
बारामतीच्या पश्‍चिम पट्ट्यातील काही ग्रामपंचायतींनी टँकरची मागणी करण्यासाठी प्रस्ताव बनविण्याचे काम सुरू केले आहे. पाऊस पडून विहिरींना पाणी उपलब्ध होईल या आशेवर आतापर्यंत टँकरची मागणी अधिकृतपणे बारामती पंचायत समितीकडे करण्यात आली नव्हती. मात्र सध्या आहे त्या पाण्यावर संपूर्ण गावात पाणीपुरवठा करण्याची मोठी कसरत ग्रामपंचायत प्रशासनाला करावी लागत असून, संबंधित विभागाने टँकर सुरू करावेत अशी नागरिकांची मागणी आहे. तरडोली पाझर तलावात पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणी सोडल्यास किमान पाच गावांच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. मात्र तलाव, विहिरीतील पाण्याच्या पातळीने तळ गाठला असल्याची वस्तुस्थिती आहे. पाण्याअभावी शेती आणि शेतीपूरक व्यवसाय दोन्हीही अडचणीत आले असून, शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

‘तरडोली तलावात पाणी सोडावे’
तरडोली तलावावर पाच गावांच्या पाणीपुरवठा योजनेसह या भागातील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. त्यामुळे पुरंदर उपसा सिंचन योजनेचे पाणीटंचाई निवारण फंडातून सोडल्यास येथील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. संबंधित विभागाने पुरंदर योजनेचे पाणी तरडोली तलावात सोडावे, अशी मागणी तरडोलीच्या सरपंच विद्या भापकर, माजी सरपंच रामचंद्र भोसले, शेतकरी विनायक गाडे, विशाल पवार, निखिल गाडे यांनी केली आहे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT