Crop insurance Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा अर्ज भरताना शेतकऱ्यांची दमछाक

Kharif Crop : अतिवृष्टी, सर्व्हर डाउनमुळे अर्जांना विलंब

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
crop insurance application : पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या खरीप हंगामासाठी पीकविमा काढण्यासाठी दिलेली मुदत उद्या (ता.३१) संपत असताना ऑनलाइन अर्ज भरताना शेतकऱ्यांची पुरती दमछाक होत आहे. अतिवृष्टीमुळे वाहतूक बंद आणि दुसऱ्या बाजूला ‘सर्व्हर डाउन’ अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे विमा अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी राज्यभरातून होत आहे.


राज्यात विम्यासाठी ऑनलाइन अर्ज दाखल करताना अनेक समस्या असतानाही शनिवारी (ता.२९) सकाळपर्यंत अर्जांची एकूण संख्या १.३५ कोटींपर्यंत गेली. दिवसाला ६-७ लाखापर्यंत अर्ज येत आहेत. अर्ज दाखल करण्यात काही जिल्हे आघाडीवर आहेत. छत्रपती संभाजीनगरमधून ११ लाख, बीडमधून १६ लाख, नांदेड ११ लाख, तर लातूर व परभणीतून सात लाखांच्या पुढे विमा अर्ज दाखल झालेले आहेत. मात्र, नाशिक भागात विमा अर्ज भरताना अप्लाय फॉर इन्शुरन्स ’या पर्यायावर क्लिक केल्यानंतर पुढचा पर्याय येत नव्हता.

उत्तर महाराष्ट्र्राप्रमाणेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून सर्व्हर डाउनच्या तक्रारी येत आहेत. सर्व्हर डाउन होणे, गट व खाते नंबर टाकल्यानंतर पडताळणी न होणे या समस्यांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. अर्ज भरण्यासाठी शेती कामे सोडून तासन् तास ताटकळावे लागल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. काही गावांमध्ये शेतकरी जनसुविधा केंद्रावर दोन-तीन दिवसांपासून चकरा मारताना आढळत आहेत. सोलापूरमध्येही विमा संकेतस्थळ संथगतीने चालत होते. त्यामुळे यंदा विम्यापासून अनेक शेतकरी वंचित राहतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

परभणी भागात पीकविमा अर्ज भरणाऱ्या जनसुविधा केंद्रांवर ताण येत असल्याचे दिसून आले. दिवसभर सर्व्हरवर डाउनमुळे मध्यरात्रीनंतर अर्ज भरावे लागत आहेत. संगणकचालक घाईघाईने अर्ज भरत असल्याने विमा क्षेत्र, खातेदार नावे, बँक खात्याचा तपशिलात चुका होत आहेत. या गोंधळाचा फायदा घेत काही केंद्रांवर अर्जासाठी ५० ते १०० रुपये उकळले जात आहेत.

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा योजनेच्या संकेतस्थळाने हैराण केले आहे. शेतकरी तेथे पाच-पाच तास ताटकळत असून पोर्टल हँग, सर्व्हर डाऊन अशी कारणे सांगितली जात आहेत. विमा योजनेत खानदेशातील ३० टक्के शेतकरी अद्यापही सहभागी होवू शकलेले नाहीत. यवतमाळ जिल्ह्यात पुरामुळे शेतकऱ्यांना विमा काढणे शक्य झालेले नाही. त्यात पुन्हा पायपीट करून केंद्रात गेल्यानंतर तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळ चालत नसल्याचे पुसद तालुक्यातील शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकरी मनीष जाधव (वागद, ता. महागाव, जि.यवतमाळ) म्हणाले, ‘‘अतिवृष्टीमुळे वाहतूक अनेक ठिकाणी बंद झाली आहे. शेतकऱ्यांना जनसुविधा केंद्रावर जाता आलेले नाही. त्यामुळे विमा अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढवायला हवी.

जनसुविधा केंद्रांवर विम्यासाठी रोज मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होत आहेत. सर्व्हर डाउन असतो. पुन्हा केंद्रचालकांकडून अर्ज भरतानाही चुका होत आहेत. त्यामुळे यंदा नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित राहतील, अशी भीती आहे.
- शेतकरी नरेश शिंदे, सनपुरी, ता. जि. परभणी.

अतिवृष्टीमुळे दोन दिवस वाया
कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होण्यासाठी देण्यात आलेली मुदत पुरेशी होती. परंतु, या मुदतीपैकी काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोन दिवस वाया गेले आहेत. तसेच, संकेतस्थळाच्या अडचणीदेखील उद्भवत आहेत. भूमि अभिलेख खात्याकडून पीकविम्याच्या प्रक्रियेला जोडली जाणारी संगणक प्रणाली देखभालीसाठी बंद ठेवली जाणार होती. हे कळताच कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी स्वतः भूमि अभिलेख आयुक्त नि. कु. सुधांशू यांच्याशी संपर्क साधला. त्यामुळे समन्वयाने अडचण दूर करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT