Unseasonal Rain
Unseasonal Rain Agrowon
ताज्या बातम्या

Unseasonal Rain Crop Damage : अस्मानी संकटापुढे शेतकरी हतबल

Team Agrowon

Pune News राज्याच्या विविध भागांत वादळी पावसाचा (Unseasonal Rain) तडाखा सुरूच आहे. वादळी वारे, पाऊस आणि गारपिटीने (Hailstorm) रब्बीसह (Rabi Season), भाजीपाला आणि फळपिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले आहे. वीज कोसळल्याने अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. जनावरांची मोठी जीवितहानी झाली आहे. सततच्या अस्मानी संकटामुळे, नुकसानीमुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम या जिल्ह्यांत शुक्रवारी (ता.७) विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपिटीने पिकांचे अतोनात नुकसान झाले. अकोला जिल्ह्यात पातूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, अकोला या तालुक्यांत या वादळाचा जोर अधिक होता.

बाळापूर तालुक्यात वादळामुळे बीजोत्पादनाचा कांदा, लिंबू, कलिंगड, खरबूज पिकांचे नुकसान झाले. अकोल्यात गहू, हरभरा, भाजीपाला पिकांना फटका बसला. अकोला व बुलडाणा जिल्ह्यात वीज पडून दोन जण ठार झाले. तर दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये १८ बकऱ्यासुद्धा दगावल्या.

नगर जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वीही वादळी पावसाने नगर जिल्ह्यात शेतपिकांचे नुकसान झाले आहे. त्यात आता नेवासा, राहुरी, पारनेर, नगर तालुक्यांसह अनेक भागात जोरदार वादळी पाऊस झाला.

द्राक्ष, आंबा, चिंचेसह भाजीपाला, पालेभाज्या, कांदा, उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे. पुणे जिल्ह्यात हलका पाऊस झाला.

हवेली, खेड, मावळ, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत वादळी वाऱ्यासह पावसाने तडाखा दिला. त्यामुळे गहू, ज्वारी, बाजरीसह आंबा, कांदा भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.

सातारा जिल्ह्यात मोठी दैना केली. दुष्काळी भागात सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. यामध्ये डांभेवाडीतील द्राक्ष बागांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सातारा, वाई, कोरेगाव, खटाव, पाटण, फलटण या तालुक्यांत कांदा, ज्वारीसह भाजीपाला पिके आडवी झाली.

सांगली जिल्ह्यातील तासगाव, पलूस, शिरा यासह अन्य भागांत शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे बेदाणा उत्पादक धास्तावला आहे. पावसाने द्राक्ष पिकाचेही नुकसान झाले.

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण, राजापूर, संगमेश्वर तालुक्यांत वादळी पावसाने हजेरी लावली. चिपळूण तालुक्यातील सती, चिंचघरी, अनारी, टेरव परिसरात वादळी वाऱ्याने दणका दिला.

पावसामुळे आंबा, काजू, केळीच्या झाडांचेही नुकसान झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि वैभववाडी तालुक्यांत पावसाचा जोर अधिक राहिला. आंबा आणि काजूचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

मराठवाड्याच्या विविध भागात शुक्रवारी तासात दुपारनंतर विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने कहर केला. वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले.

छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, बीड, लातूर धाराशिव जिल्ह्यात २५ जनावरांचाही मृत्यू झाला. आंबा बागांना मोठा फटका बसला. रब्बीतील पिकांचेही मोठे नुकसान झाले.

परभणी, हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (ता. ८) दुपारी मेघगर्जना, वेगाच्या वाऱ्यासह पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील एकबुर्जी वाडी (ता. औंढा नागनाथ) शिवारात वीज कोसळून एक बैल दगावला. उशिरा पेरणी केलेला गहू, ज्वारी पिके पावसात भिजल्याने शेतीमालाचे नुकसान झाले.

खानदेशात जोरदार वारा, मध्यम ते हलका पावसामुळे मका, ज्वारी, सूर्यफूल, बाजरी आदी पिके आडवी झाली. जळगाव जिल्ह्यात अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर,

पाचोरा, जळगाव, एरंडोल आदी भागांत हलका पाऊस झाला. धुळ्यातील धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर भागांत सुसाट वारा, हलका पाऊस अशी स्थिती होती.

विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यांत शुक्रवारी (ता.७) पावसासह अनेक भागात गारपीट झाली. याचा फटका मिरची, कांदा यांसह भाजीपाला पिकांना बसला.

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यात वीज कोसळून एक जण दगावला, तर एक बैल जोडी मृत्यूमुखी पडली. नागपूर जिल्ह्यात गहू, संत्रा व लिंबाचे नुकसान झाले.

नाशिकमध्ये द्राक्ष बागा, कांद्याला दणका

नाशिक जिल्ह्यात शनिवारी (ता. ८) दुपारी दोननंतर जोरदार वारे वाहू लागले. तर काही ठिकाणी हलक्या तर जोराच्या सरी सुरू झाल्या. सटाणा तालुक्यातील पिंगळवाडे, आखतवाडे, बिजोटे, आसखेडा, निताने, भुयाने परिसराला गारपिटीने झोडपले. १५ मिनिटे झालेल्या जोरदार गारपिटीमुळे खरड छाटणी होऊन सबकेन झालेल्या द्राक्ष बागांचे तर काढणीसाठी आलेल्या उन्हाळ कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

शनिवारी (ता. ८) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मि.मी)(स्रोत - हवामान विभाग).

कोकण : गुहागर १०.

मध्य महाराष्ट्र : राहुरी ३०, शेवगाव, तासगाव, लोणावळा, सातारा प्रत्येकी १०.

मराठवाडा : उदगीर ४०, निलंगा ३०, देवणी, देगलूर, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, पैठण प्रत्येकी १०.

विदर्भ : खामगाव ४०, नेर ३०, देवळी, कामठी, करंजलाड, नागपूर, काटोल, वर्धा, हिंगणघाट, बाभूळगाव आष्टी, कळंब प्रत्येकी २०, पारशिवणी, रामटेक, कळमेश्वर, दारव्हा, देवरी, सेलू, नरखेड, आर्वी, यवतमाळ, कुही, खारंघा, मौदा, सावनेर, मोहाडी प्रत्येकी १०.

राज्यातील नुकसान स्थिती अशी...

- वादळी पावसाने पिकांसह, जीवितहानी

- वऱ्हाडात दोन ठार, बकऱ्या दगावल्या

- खानदेशात पाऊस, नुकसान सुरूच

-नाशिकमध्ये द्राक्ष बागा, कांद्याचे अतोनात नुकसान

- नगरमध्ये फळपीके, कांद्याचे नुकसान

- पुण्यात हलक्या ते मध्यम सरी

- सांगलीत बेदाणा उत्पादक धास्तावले.

- रत्नागिरी, सिंधुदुर्गात वादळी पावसाची हजेरी

- आंबा, काजूवर नुकसानीचे सावट

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT