Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Damage : राज्यात पिकांवर ‘परती’चे पाणी

गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने राज्यातील विविध भागांत पिकांचे अतोनात नुकसान केले आहे. मराठवाड्यात सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिके पाण्यात गेली आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या परतीच्या पावसाने (Heavy Monsoon Rain) राज्यातील विविध भागांत पिकांचे अतोनात (Crop Damage) नुकसान केले आहे. मराठवाड्यात सोयाबीन (Soybean), कपाशी (Cotton), तूर आदी पिके पाण्यात गेली आहेत. विदर्भात परतीच्या पावसाने सर्वदूर हाहाकार उडाला आहे. नाशिकसह खानदेशात पिकांचे मातेरे झाले आहे.

मका, सोयाबीन, बाजरी ही पिके सडण्याची वेळ आली आहे. तर कोकणात भात पीक धोक्यात आले आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नगर जिल्ह्यांत सोयाबीनसह फळबागांना फटका बसला आहे. उसात पाणी साचल्याने गळीत हंगामावर परिणाम होणार असल्याची स्थिती आहे. ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर बळीराजा अडचणीत आला आहे.

मराठवाड्यात पिकांची दाणादाण

मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, लातूर, जालना, उस्मानाबादसह हिंगोली, परभणी जिल्ह्यांत हाती आलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिके मिळून सुमारे ८ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील पिकांची परतीच्या पावसामुळे दाणादाण झाली आहे.

सर्वाधिक फटका काढणीला आलेल्या सोयाबीनला बसला असून, ५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर नुकसान झाले आहे. दोन लाखांहून अधिक हेक्टरवरील कपाशी तसेच ७७ हजार हेक्टरवरील तूर, हजारो हेक्टरवरील हळद, ऊस,फळे, भाजीपाला पिके बाधित झाली आहेत. सोयाबीनच्या शेंगांवर बुरशीची वाढ झाली. दाणे डागी झाले आहेत. उघडीप नसल्याने मोड फुटत आहेत. फुटलेल्या बोंडातून कापूस लोंबत आहे. धाग्याची प्रत खराब झाली आहे. तुरीचे पीक उमळून गेले आहे.

उत्तर महाराष्ट्राला दणका सुरूच...

नाशिक जिल्ह्यात चार दिवसांपासून काढणीला आलेल्या खरीप पिकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. भाजीपाला पीक डोळ्यासमोरच मातीमोल झाल्याने शेतकरी पुरता कोलमडून गेला आहे. द्राक्ष पीक अडचणीत आले आहे. खरीप हंगामातील मका, सोयाबीन, बाजरी ही पिके पावसात भिजून सडण्याची वेळ आली आहे. टोमॅटो पिकाची फुलगळ होत आहे.

नगर जिल्ह्यात कापूस, बाजरी, सोयाबीन, तूर, कांद्याचे नुकसान वाढले आहे. कापसाच्या मुळ्या सडत असून, पाने पिवळी पडली आहेत. त्यामुळे पातेगळ, बोंडालाही नुकसान पोचत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. जिल्ह्यात नुकसानीचा आकडा एक लाख हेक्टरवर जाण्याची शक्यता आहे.

कोकणात भात पीक धोक्यात

रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील बहुतांश भागाला पावसाने झोडपून काढले. ६० टक्के भात पीक धोक्यात आले आहे. काही भागांत कापणीला आलेली भातपिके परिपक्व झालेल्या लोब्यांच्या भारामुळे आडवी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात पिकांना फटका

पुणे जिल्ह्यात सातत्याने पडणाऱ्या पावसाने खरीप पिके अडचणीत आली आहेत. सोयाबीन, मका उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने दाणादाण उडविली आहे. सर्वाधिक नुकसान बार्शी तालुक्यात झाले आहे. सोयाबीन, मकासह द्राक्ष, सीताफळ, लिंबू या फळबागांना त्याचा मोठा फटका बसला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक फटका हातकणंगले तालुक्याला बसला आहे.

जिल्ह्यातील ९८९ हेक्टर क्षेत्राचे नुकसान क्षेत्रापैकी हातकणंगलेतील तब्बल ९३३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून सोयाबीन पिकाची काढणी सुरू आहे. ७५ टक्के म्हणजे ३१ हजार ५०० हेक्टरवरील सोयाबीनची काढणी खोळंबली आहे. सातारा जिल्ह्यात ऐन पीक काढणीच्या हंगामा संकटात आहे. पिके कुजून जाऊ लागली आहेत. सोयाबीन उगवू लागले असून ज्वारी, बाजरी आडवी झाली आहे.

विदर्भात धानासह सोयाबीन, कपाशीला दणका

विदर्भात परतीच्या पावसाने सर्वदूर पिकांची दाणादाण उडविली आहे. धानपिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये कपाशी सोयाबीन ही पिके प्रभावित झाली आहेत.

खानदेशात पिकांचे मातेरे

खानदेशात या महिन्यात सुरुवातीपासून पाऊस सुरूच आहे. अनेक भागांत ६ ते ९ ऑक्टोबरदरम्यान अतिवृष्टीही झाली आहे. ज्वारी, मका, सोयाबीन, कापूस पिकांचे मातेरे झाले आहे. पण पंचनामे कुठेही सुरू झालेले नाहीत. खानदेशात सुमारे ५० हजार हेक्टरवरील पूर्वहंगामी कापूस पिकाची मोठी हानी झाली आहे. कैऱ्या, बोंडे लाल पडून त्यांचे १०० टक्के नुकसान झाले आहे. मका, ज्वारीचे नुकसान झाले आहे. ज्वारी काळवंडू लागली आहे. खानदेशात सुमारे २० हजार हेक्टरवरील ज्वारीची हानी झाली आहे. सुमारे १० ते ११ हजार हेक्टरवरील सोयाबीन पाण्यात गेल्याची स्थिती आहे.

अतिपावसाने कापूस, ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे. पण प्रशासन पंचनामे करण्यास नकार देत आहे. आपल्याकडे पंचनाम्यांचे आदेशच नाहीत, असे तलाठी सांगत आहेत. आमच्या जमिनी, पशुधन पाण्यात वाहून जाईल, तेव्हा शासन मदतीची तयारी करेल का? -
अनिल पाटील, शेतकरी, सावखेडासीम, (ता. यावल, जि. जळगाव)
हंगामाच्या सुरुवातीला संततधार पावसामुळे दुबार-तिबार पेरणीची वेळ आली. आता दोन दिवसांपूर्वी सोयाबीनची काढणी केल्यानंतर जोराचा पाऊस झाला. यात सोयाबीन भिजल्याने शेंगा खराब झाल्या आहेत. -
संजय जिकार, शेतकरी, नागापूर, वर्धा
यंदा पावसामुळे कापूस, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सोसावा लागणार आहे. यंदा पिके चांगली होती. मात्र गेल्या महिनाभरापासून पडत असलेल्‍या पावसाने बहुतांश शेतकऱ्यांची पिके हिरावली आहेत. -
बाळासाहेब मरकड, शेतकरी, दहिगाव, ता. शेवगाव, जि. नगर

नुकसान दृष्टिक्षेपात :

- सोयाबीनला मोड फुटले

- सोंगलेली मका काळवंडली

- खरीप कांद्याच्या लागवडी वाहून गेल्या

- द्राक्ष बागांत गोळी घड होण्याची समस्या

- कापूस पिकांत बोंडे खराब होऊन नुकसान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT