SMART Scheme Agrowon
ताज्या बातम्या

Smart Project : ‘स्मार्ट’मध्ये रुजू न झाल्यास कारवाई; आयुक्तांचा इशारा

कृषी विभागातून स्मार्ट प्रकल्पात बदली करण्यात आलेले काही अधिकारी व कर्मचारी आता रुजू होण्यास टाळाटाळ करीत आहेत.

टीम ॲग्रोवन

पुणे ः कृषी विभागातून (Department Of Agriculture) स्मार्ट प्रकल्पात (SMART Project) बदली करण्यात आलेले काही अधिकारी व कर्मचारी आता रुजू होण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे, ‘‘बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू न होणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,’’ असे आदेश कृषी आयुक्तांनी (Agriculture Commissioner) दिले आहेत.

आस्थापना विभागाच्या म्हणण्यानुसार, कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सोयीनुसार बदल्या करून घेण्याची किंवा झालेल्या बदल्या रद्द करण्याची सवय लागलेली आहे. अपवादात्मक स्थितीत तसे करणे योग्यही समजले जाते. मात्र, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पात करण्यात आलेल्या बदल्यांमध्ये हेराफेरी करता येणार नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री स्वतः या प्रकल्पाचा आढावा घेत असल्यामुळे बदलीच्या ठिकाणी त्वरित रुजू होणे हेच अधिकाऱ्यांच्या हिताचे असेल.

काही अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्मार्टमध्ये बदल्या करताना विकल्प घेण्यात आलेले नाहीत. मनमानी पद्धतीने बदल्या केल्या असून वरिष्ठांनी आपल्या कार्यालयात नकोसे झालेले अधिकारी बाहेर काढण्यासाठी स्मार्टच्या बदली यादीत घुसवले आहेत. त्याबद्दल योग्य त्याठिकाणी दाद मागितली जाईल. अर्थात, आस्थापना विभागाने या तक्रारीत तथ्य नसल्याचे म्हटले आहे. ‘‘बदल्या करताना बहुतेकांची सोय पाहिली आहे. अनेक बदल्या त्याच ठिकाणी झालेल्या असून फक्त कामाचे स्वरूप बदलणार आहे. आता तक्रार केल्यानंतरही ती ग्राह्य धरली जाण्याची शक्यता कमी आहे,’’ असे एका प्रशासन अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी बदल्यांचे आदेश जारी करताना कडक भूमिका घेतली आहे. ‘‘कृषी विभागात सध्या ज्या कक्षात संबंधित अधिकारी काम करीत आहे; त्याला स्मार्टमध्ये बदली झालेल्या ठिकाणी जाण्यासाठी जाऊ द्यावे, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. वरिष्ठांनी अशा बदली झालेल्या अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची रजा मंजूर न करण्याचे आदेश दिले गेले आहेत,’’ असेही आस्थापना विभागाने स्पष्ट केले आहे.

रायगड आत्माचे उपसंचालक सतीश बोऱ्हाडे यांची आता रायगडमध्ये स्मार्टचे जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे उपसंचालक म्हणून बदली झाली आहे. रत्नागिरीचे कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांना त्याच जिल्ह्यात स्मार्टचे उपसंचालकपद मिळाले आहे. रायगडचे कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे यांना सिंधुदुर्ग स्मार्टचे उपसंचालकपद दिले गेले आहे. अहमदनगरचे आत्मा उपसंचालक राजाराम गायकवाड आता त्याचठिकाणी स्मार्टचे जिल्हा प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे उपसंचालक म्हणून काम बघतील. सोलापूर आत्माचे उपसंचालक मदन मुकणेदेखील त्याच जिल्ह्यात स्मार्टचे काम सांभाळतील.

स्मार्टमध्ये बदली झालेले काही अधिकारी व त्यांचे सध्याचे कामाचे ठिकाण असे ः विजय कोळेकर (मुंबई), स्मिता धावडे (रत्नागिरी), मनीषा भोसले (पुणे), दीपक रेंगडे (पुणे), धम्मशीला भडीकर (औरंगाबाद), गिरीष कुलकर्णी (मुंबई), भाग्यश्री पवार फरांदे (गडहिंग्लज), विवेक ननावरे (वाळवा), चंद्रशेखर चवणे (नागपूर), प्रेषिता टकले (पाटण), रवींद्र पाचपुते (पनवेल), सुवर्णा अदक (शिरुर), ज्ञानेश्वर पाचे (कल्याण), तृप्ती वाघमोडे (ठाणे), दीपाली अडसूळ (खोपोली), तरुणकुमार वैती (पालघर), विजय जाधव (पालघर), भाऊसाहेब गावडे (महाड), अनिल रोकडे (पेण), माधुरी अगस्ती मुटके (सावंतवाडी), अश्विनी सपकाळ (अहमदनगर), अंकुश बरडे (सोलापूर), अश्विनी भोसले (पुणे), मनिषा कौटे (अहमदनगर), सूर्यकांत मोरे (मोहोळ).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT