Sant Tukaram Maharaj Palkhi  Agrowon
ताज्या बातम्या

Ashadhi Wari 2023 : आषाढी वारीच्या आनंद सोहळ्यास प्रारंभ

‘तुकोबाऽ तुकोबाऽऽ’ आणि ‘ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’ असे नामघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात सर्व तल्लीन झाले.

Team Agrowon

Dehu News : पंढरीची वारी। आनंद सोहळा।।

पुण्य उभे राहो आता। संताच्या या कारणे।।

पंढरीच्या लागा वाटे। सखा भेटे विठ्ठल।।

या भावनेने संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो भाविक शनिवारी (ता. १०) सहभागी झाले. ‘तुकोबाऽ तुकोबाऽऽ’ आणि ‘ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’ असे नामघोष आणि टाळमृदंगाच्या गजरात सर्व तल्लीन झाले.

आषाढी वारीनिमित्त सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने देहूतून पंढरपूरकडे शनिवारी दुपारी अडीच वाजता प्रस्थान ठेवले. हातात भगव्या पताका घेऊन नामघोष करणाऱ्या वारकऱ्यांमुळे आणि टाळ-मृदंगाच्या गजराने देहूनगरी दुमदुमली. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वैष्णवांनी आनंदाने दिंड्यांमधून फेर धरला.

पालखी प्रस्थान सोहळ्याचे पारंपरिक कार्यक्रम पहाटे साडेचारपासून सुरू झाले. पाच वाजता देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात पालखी सोहळाप्रमुख भानुदासमहाराज मोरे, अजितमहाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तममहाराज मोरे व त्यांच्या पत्नीच्या हस्ते महापूजा झाली. पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोषमहाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली.

देऊळवाड्यातील भजनी मंडपात सकाळी दहा वाजता पुंडलिक महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. ‘तुझिये संगती झाली आमुची निशकिंती। नाही देखियेले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे्र या अभंगाचे निरुपण त्यांनी केले. सकाळी साडेदहा वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतील घोडेकर बंधू (सराफ) यांनी चकाकी देऊन इनामदारवाड्यात आणल्या. दिलीप महाराज गोसावी इनामदार यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाली.

मानकरी म्हसलेकर दिंडीतील सेवेकऱ्यांनी पादुका डोक्यावर घेवून संबळ, टाळ-मृदंग आणि तुतारीच्या स्वरात वाजतगाजत मुख्य मंदिरातील भजनी मंडपात आणल्या. दुपारी दोन वाजता प्रस्थान सोहळ्यास सुरवात झाली. भजनी मंडपात संत तुकाराम महाराज पादुका आणि माउलींच्या पादुकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्निक महापूजा केली.

खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, माजीमंत्री हर्षवर्धन पाटील, बाळा भेगडे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, श्रीकांत भारती, सुनिल शेळके सपत्निक, माजी आमदार विलास लांडे यांनीही पूजा व आरती केली. देहू गावातील ज्येष्ठ वारकरी विक्रमबुवा माळवे देहूकर यांना यंदा पूजेचा मान मिळाला. कोथरुड येथील ग्रामोपाध्याय सुहास टंकसाळे यांनी पौराहित्य केले. संस्थानचे अध्यक्ष, सोहळाप्रमुख व विश्वस्तांसह नगराध्यक्षा स्मिता चव्हाण उपस्थित होत्या.

...असा रंगला सोहळा

शनिवारी सकाळी महाद्वारातून मानाच्या दिंड्यांना देऊळवाड्यात प्रवेश देण्यात आला. अकलूज येथील मोहिते पाटील व बाभुळगावकर यांच्या अश्वांनी महाद्वारातून प्रवेश केला. पादुका पूजनानंतर फडकरी, मानकरी, दिंडीप्रमुख यांचा संस्थानतर्फे सत्कार करण्यात आला. देऊवाड्यात मंदिर प्रदक्षिणेसाठी फुलांनी सजविलेल्या पालखीमध्ये पादुका ठेवण्यात आल्या. मंदिर प्रदिक्षणा सुरू झाली.

वारकऱ्यांनी ‘ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’ नामघोष आणि विठुनामाचा गजर करीत वारकरी फुगड्या खेळले. देहभान विसरून वारकरी आनंदाने नाचत होते. प्रदिक्षिणेसाठी मानाच्या दिंड्या सज्ज होत्या. मानाचे अश्व होते. खांद्यावर गरुडटक्के आणि हातात चोप घेतलेले चोपदार होते.

वरून वरूण राजाने हलकीशी हजेरी लावली आणि वारकरी आणखी आनंदीत होऊन नाचू लागले. देऊळवाड्यातील प्रदक्षिणेनंतर सायंकाळी पालखी सोहळा इनामदारवाड्यात मुक्कामी पोचला. रविवारी (ता. ११) सकाळी अकरा वाजता पालखी सोहऴा आकुर्डी येथील मुक्कामाकडे मार्गस्थ होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT