Bullock Castration Agrowon
ताज्या बातम्या

Animal Care : बैलांच्या खच्चीकरणावेळी द्यावी लागणार भूल

Team Agrowon

Solapur Agriculture News : बैल, रेड्यांचे शेती कामात मन लागावे, स्वभाव क्रूर होऊ नये यासाठी विशिष्ट वयात आलेल्या बैल, रेड्याचे खच्चीकरण (Bullock Castration) करण्याची प्रथा आहे.

पारंपरिक वेदनादायी पद्धतीत बदल करून नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्याकडून भूल देऊन खच्चीकरण करावे, असे आदेश राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने काढले आहेत. ‘ॲनिमल राहत’ या सेवाभावी संस्थेने यासाठी २०१७ पासून पाठपुरावा केला होता.

बैल, रेड्याचे खच्चीकरण करणे ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बाब आहे. यासाठी शेतकरी पशुवैद्यकाकडून जनावरांचे खच्चीकरण करून घेतात. यासाठी अनधिकृत पशुवैद्यक, पशू पदविकाधारकांकडून अमानुषरीत्या, अघोरी पद्धतीने बैल, रेड्यास दोरीच्या साह्याने जमिनीवर पाडून त्यांचे चारही पाय बांधून खच्चीकरण केले जाते.

ही पद्धत अत्यंत वेदानादायी असल्याने बैल, रेड्यांना भयंकर यातना सोसाव्या लागतात. ही पद्धत बंद करून भूल देऊन खच्चीकरण करावे, यासाठी सांगली येथील ‘ॲनिमल राहत’ या संस्थेने शासनाकडे २०१७ पासून पाठपुरावा केला.

केंद्र सरकारने २० मार्च २०२३ रोजी प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध (पशुपालन प्रथा आणि पद्धती) नियम, २०२३ अधिसूचित केले आहे. त्यात नोंदणीकृत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत जनावरांना वेदनारहित खच्चीकरण करणे व इतर बाबी संदर्भात शासनाने स्पष्ट नियमावली दिली आहे. अवैध पद्धती अवलंबल्यास ‘प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा’अंतर्गत शिक्षेच्या तरतुदी आहेत.

यासाठी ॲनिमल राहत आणि पशुसंवर्धन विभागाच्या समन्वयाने पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी याची दखल घेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना १२ मे रोजी आदेश दिले आहेत. यामुळे आता नव्या पद्धतीनेच खच्चीकरण करावे लागेल.

सर्व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना नव्या पद्धतीचे प्रशिक्षण ॲनिमल राहतचे अधिकारी देत आहेत. यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन यादव, डॉ. आकाश यादव, डॉ. अनिकेत नावकर यांनी प्रयत्न केले आहेत.

का करतात खच्चीकरण?
खच्चीकरण याचा थोडक्यात अर्थ नसबंदी असा आहे. वंशवाढीसाठी राखण्यात आलेल्या वळू व्यतिरिक्त शेती कामाचे बैल व रेड्यांचे खच्चीकरण केले जाते.

वयात आलेला बैल, रेड्याचा स्वभाव क्रूर होऊ नये, त्यांनी माणसांना मारू नये, तसेच जोमाने शेतीकाम करावे, त्यांची तब्येत धष्टपुष्ट राहावी, यासाठी खच्चीकरण करण्याची प्रथा आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...
- खच्चीकरण करताना मऊ मातीत बैल, रेड्यास पाडणे आवश्यक. मानेखाली मऊ उशी द्यावी.
- खच्चीकरण करताना बैल, रेड्याच्या डोळ्यांना कापड बांधणे आवश्यक.
- नव्या नियमावलीनुसार नोंदणीकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच करता येणार खच्चीकरण.
- खच्चीकरणानंतर वेदनाशामक इंजेक्शन, गोळ्या तसेच सहा ते आठ दिवस बैल, रेड्यास आराम देणे आवश्यक.
- इंजेक्शनसाठी प्रत्येक जनावरांसाठी नवीन ‘सिंगल यूझ’ सुया वापराव्या लागणार.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Price : सोयाबीनची दरवाढ हंगामात टिकेल का?

Dairy Development Project : विदर्भ, मराठवाड्यासाठी दूध विकासाचा दुसरा टप्पा मंजूर

Jute Export : तागाची १७७ हजार टन निर्यात

PM AASHA : शेतीमालाचे दर सावरण्यासाठी ३५ हजार कोटी

Maharashtra Rain : पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT