येवला : ऑगस्ट महिन्यात तालुक्यात झालेल्या मुसळधार (Heavy Rainfall) पावसाने शेतकऱ्यांचे खरिपातील पिकांचे (Kharif Crop) कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त १६ गावांतील तब्बल ३ हजार ७८ हेक्टर वरील नुकसानीचे पंचनामे होऊन अहवालही शासन दरबारी गेला. मात्र २४ तासांत ६५ मिलिमीटर पाऊस हवा या निकषामुळे तब्बल ३ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईला ब्रेक लागला आहे.
यामुळे नुकसान होऊनही शेतकऱ्यांना मिळणाऱ्या थोड्याफार भरपाईवर पाणी फिरले आहे. तालुक्यात जूनला रुसलेला पाऊस टप्प्याटप्प्याने पडत गेला. मात्र ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसाने तालुक्याच्या पाटोदा, शिरसगाव लौकी, मुखेड परिसरात पिकांची वाट लावली होती. काही शेतकऱ्यांनी तर या पावसाने खराब झालेल्या मकाची शेती नांगरूनही टाकली होती. याशिवाय तालुक्याच्या विविध भागांतही नियमित पडलेल्या पावसाने मका, सोयाबीन, मुगाच्या शेतीचे मोठे नुकसान झाले होते.
तालुक्यातील मुखेड, शिरसगाव, पाटोदा परिसरात १२ गावांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने सुमारे साडेतीन हजार हेक्टरवरील शेतीपिकाचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे रस्ते उध्वस्त झाले असून शाळेच्या इमारती तसेच घरांचे देखील प्रचंड नुकसान झाले होते. पिके जमाने येत असतानाच हे नुकसान झाल्याने कोट्यवधीचा फटका शेतकऱ्यांना बसला किंबहुना त्यानंतर मका, कपाशीवर विविध रोगांचाही प्रादुर्भाव होऊन उत्पन्नात मोठी झळ बसणार आहे.
शासनाच्या सूचनेनुसार महसूल व कृषी विभागाने ऑगस्टमधील पावसाने नुकसान झालेल्या १६ गावांतील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून तसा अहवालही शासनाला पाठविला होता. मात्र अतिवृष्टीच्या नुकसानीसाठी ३३ टक्क्यांवर शेती पिकांचे नुकसान आणि २४ तासात ६५ मिलिमीटर पाऊस पडलेला हवा या निकषामुळे तालुक्यातील शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहे. ऑगस्टमधील नुकसानीसाठी शासनाने जिल्ह्यासाठी सुमारे अकरा कोटीचा निधी दिला आहे.
यात दहा तालुक्यांचा समावेश असून, उर्वरित पाच तालुके मात्र ६५ मिलिमीटरच्या निकषामुळे बाद झाले आहे. यात येवल्यालाही मोठा फटका बसला आहे. प्रशासनाने तब्बल १६ गावांतील ३ हजार ७८ शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे केले होते. यात ३३ टक्क्यांच्या वर तब्बल २ हजार ४८ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाल्याचे या अहवालात नमूद केले होते. तसा अहवालही शासनाकडे पाठविण्यात आला होता. या नुकसानी पोटी शासनाच्या नव्या दरानुसार तब्बल २ कोटी ७८ लाख रुपयांची मदत तालुक्यातील ३ हजार शेतकऱ्यांना मिळाली असती. मात्र निकषामुळे प्रस्ताव पाठवूनही या मदतीला ब्रेक लागला असल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.
वास्तव पाहा..निकष बदला!
शासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीला मदत देताना पावसाच्या ६५ मिलिमीटरचा निकष न लावता उभ्या पिकांची लागलेली वाट, त्यामुळे झालेले नुकसान विचारात घ्यायला हवे अशी मागणी होत आहे. अनेकदा ६५ मिलिमीटर पेक्षाही जास्त पाऊस होतो पण नुकसान मात्र होत नाही आणि अनेकदा पाऊस पाच-सात दिवसापर्यंत २० ते ४० मिमीपर्यंत कमी अधिक प्रमाणात सुरू राहतो.
त्यामुळे जमिनीतील पाण्याचा निचरा होत नाही आणि मुळे सडून पिकांचे मोठे नुकसान होते. या वास्तव परिस्थितीचा विचार करून निकषात बदल करण्याची मागणी ही शेतकरी करत आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेबांनी राज्याचे सचिव असीम गुप्ता तसेच जिल्हाधिकारी श्री. गंगाधरण यांच्याशी संपर्क साधून पावसाच्या निकषाची व नुकसानीची वास्तव परिस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. आता झालेल्या पावसाचे सरसकट पंचनामे करून त्यांना भरपाई मिळवून द्यावी अशी सूचना त्यांनी केली आहे.
निकषात बदल व्हावा यासाठी साहेब स्वतः पाठपुरावा करत आहे.
- बाळासाहेब लोखंडे, भुजबळ संपर्क कार्यालय प्रमुख, येवला
ऑगस्टमध्ये तालुक्यात पाटोदा, धुळगाव परिसरात ढगफुटी सदृश तर इतरत्र सततचा पाऊस झाल्याने अनेक हेक्टर मका, सोयाबीन, मूग आदी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.काही भागात फक्त पंचनामे झाले,
परंतु धूळगावसह अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे पंचनामेसुद्धा केले नाहीत तेव्हा आर्थिक मदत तर दूरच. शासनाने आतापर्यंतच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना रब्बी पीक उभे करण्यासाठी तातडीने आर्थिक मदत करावी. फक्त घोषणांचा पाऊस नको.
- बापूसाहेब पगारे, शेतकरी संघटना नेते येवला
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.