सांगली ः राज्यात गेल्या तीन वर्षांपासून अतिवृष्टी (Heavy Rain), मॉन्सूनोत्तर पाऊस (Post Monsoon Rain) या संकटांत द्राक्ष उत्पादक (Grape Producer Farmer In Crisis) सापडला आहे. या साऱ्या नैसर्गिक आपत्तींचा फटका (Natural Calamity) नव्या होणाऱ्या द्राक्ष लागवडीवर (Grape Cultivation) झाला आहे. परिणामी, नव्या द्राक्ष लागवडीसाठी शेतकरी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पन्नास टक्क्यांनी नवी लागवड कमी झाली असल्याची माहिती द्राक्ष संघाच्या सूत्रांनी दिली आहे.
राज्यात द्राक्षाचे क्षेत्र सुमारे चार ते पाच लाख एकर इतके आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत नव्या द्राक्षाच्या लागवडी वाढत आहे. त्यामुळे राज्यातील द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे दिसते आहे. तसेच निर्यातही वाढली आहे. २०२० मध्ये कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव असल्याने ऐन हंगामात संपूर्ण व्यवस्था कोलमडली होती.
त्याचा फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही बसला होता. विक्री करणे मुश्कील होते. त्यातूनही शेतकऱ्यांनी द्राक्षाची विक्री केली. परंतु अपेक्षित दर मिळाला नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला होता. त्यातूनही शेतकरी सावरला.
वास्तविक पाहता, राज्यात दरवर्षी द्राक्षाची नवी लागवड करण्यासाठी शेतकरी पुढे येत असतो. प्रत्येक वर्षी सरासरी ३० ते ४० हजार एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर नव्या द्राक्षाची लागवड होते. परंतु गेल्या तीन वर्षांपासून राज्यात ऐन फळ छाटणीच्या वेळी अतिपाऊस पडतो. त्यातून शेतकरी फळ छाटण्या घेऊन काटेकोर नियोजन करून द्राक्ष बागा शेतकरी साधतो.
फुलोरावस्थेत पुन्हा वातावरणात बदल होतो, त्यामुळे डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रारंभ होतो. त्यातूनही शेतकरी बागा कशाबशा वाचवतो. वेलीवर उत्तम दर्जाचे घड तयार होतात. त्याच दरम्यान, अतिवृष्टी आणि मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका तयार होत असलेल्या मण्यांना बसतो. घडकुज, डाऊनी, घड जिरणे या समस्या उद्भवतात. यामुळे शेतकरी संकटात सापडतो. या साऱ्याचा परिणाम नव्या द्राक्ष बागेच्या लागवडीवर होतो.
दोन वर्षांपूर्वी राज्यात सुमारे ४० हजार एकरांवर नवी लागवड झाली होती. परंतु त्या वेळी देखील अतिवृष्टी आणि मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका बागेला बसला होता. त्यामुळे गेल्या वर्षी द्राक्षाची नवी लागवड अंदाजे २० ते २५ हजार एकरांवर झाली होती. अर्थात, लागवडीत पन्नास टक्क्यांनी घट झाली असल्याचे पाहायला मिळाले.
गेल्या वर्षीही द्राक्ष बागा पावसाच्या तडाख्यातून वाचल्या नाहीत. त्यामुळे यंदा द्राक्षाची नवी लागवड १० ते १२ हजार एकरांवर झाली असल्याचे द्राक्ष बागायतदार संघाच्या सूत्रांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांपासून अवेळी पडणारा पाऊस हा द्राक्ष बागेला धोका निर्माण करत असल्यामुळे दरवर्षी नवीन द्राक्ष लागवडीस अडथळा ठरत आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी नव्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
नवी बाग लागवडीचे प्रमाण घटले
राज्यातील अनेक बागांचे वय झाल्याने जुनी बाग काढून त्या ठिकाणी नवी बाग लावली जाते. अशा पद्धतीची सुमारे १० हजार एकरांवर लागवड होते. परंतु या बागांना देखील पाऊस, नैसर्गिक आपत्ती आणि बदलत्या वातावरणाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे जुनी बाग काढून नवी बाग लागवड करण्याचेही प्रमाण अंदाजे २० ते ३० टक्क्यांनी घटले आहे. त्यामुळे द्राक्ष पिकाचे भवितव्य काय असा प्रश्न द्राक्ष उत्पादक शेतकरी उपस्थित करू लागला आहे.
राज्यात गेल्या तीन वर्षांपासून द्राक्ष पिकांवर नैसर्गिक आपत्ती आणि पावसाचे संकट आहे. या साऱ्यामुळे द्राक्षाची नवी होणारी लागवड थांबली आहे. तसेच जुनी बाग काढून नवी बाग लावण्यासाठी शेतकरी धाडस करत नसल्याचे दिसते आहे.शिवाजी पवार, अध्यक्ष, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.