Crop Damage Agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance : पीकविमा भरपाईसाठी ४९ लाख पूर्वसूचना

३० लाख दाव्यांपोटी १७३० कोटी रुपये निश्‍चित

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः सतत होणाऱ्या पावसामुळे राज्यातील खरीप पिकांच्या झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांकडून विक्रमी पूर्वसूचना आल्या आहेत. आतापर्यंत ४९ लाख पूर्वसूचना आल्या असून साडेपाच लाख अर्जांचा निपटारा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना २१९ कोटी रुपयांची पीकविमा भरपाई देण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पीकविम्याच्या कामांमधील अडचणींबाबत ‘अॅग्रोवन’मधून प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर कृषी विभागाने विमा कंपन्यांकडे अजून पाठपुरावा सुरू केला आहे. पीक नुकसानीनंतर पूर्वसूचना देणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवू नका, अशा स्पष्ट सूचना विमा कंपन्यांना देण्यात आल्याचे कृषी आयुक्तालयातील सूत्रांचे म्हणणे आहे.

“विमा योजनेचे ऑनलाइन काम आता उत्तम पद्धतीने सुरू आहे. पीक नुकसानीबाबत यंदाच्या खरिपात आतापर्यंत ४९ लाख इतक्या विक्रमी पूर्वसूचना शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. विमा कंपन्यांसह कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये पूर्वसूचना स्वीकारल्या जात आहेत. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व मध्य हंगाम अधिसूचना अशा दोन्ही गटांमध्ये लाखो अर्जांवर कामे सुरू आहेत. त्यापैकी ३०.११ लाख अर्जांवर निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे १७३० कोटी ८० लाख रुपयांची भरपाई वाटपाच्या दाव्यांवर कामकाज पूर्ण झाले आहे. यातील ५.५८ लाख अर्जांबाबत २१९ कोटींची विमाभरपाई प्रत्यक्ष वाटण्यात आली आहे,” असा दावा आयुक्तालयाने केला आहे.

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्याच्या पूर्वसूचनांची संख्या आता ४५.८८ लाखांवर गेली आहे. त्यातील ३२.६९ लाख पूर्वसूचनांच्या स्थळांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. १३.१९ लाख ठिकाणी अद्याप सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. यातील सर्वेक्षण पूर्ण झालेल्या अर्जांबाबत नुकसान भरपाईची रक्कम विमा कंपन्यांकडून निश्चित केली जाते. अशा अर्जांची संख्या १४.६९ लाख इतकी आहे. यातून विमा भरपाईपोटी १०१३.३३ कोटी रुपयांचे वितरण होऊ शकते. यात प्रत्यक्ष भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या १.६८ लाख असून, त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम ६२.८४ कोटी इतकी आहे.

शेतकऱ्यांना भरपाईची आशा
मध्य हंगामाची अधिसूचना जारी झालेल्या १५ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना भरपाईची आशा लागून आहे. यातील १३ जिल्ह्यांमध्ये १५.४२ लाख अर्जांवर विमा कंपन्यांनी ७१७.४७ कोटी रुपयांची पीकविमा भरपाई निश्‍चित केली आहे. कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, यातील ३.९० लाख अर्जांचा निपटारा झाला असून, शेतकऱ्यांच्या खात्यात १५६.२४ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

३ लाख ठिकाणी काढणीपश्‍चात नुकसान
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. खरिपाची उभी पिके किंवा कापणी करून ठेवलेली पिके वाया गेल्याचे ३.१२ लाख दावे विमा कंपन्यांकडे आले आहेत. यातील ९८ हजार ४३२ दाव्यांचे सर्वेक्षण झाले आहे. अद्याप दोन लाख १३ हजार ठिकाणी सर्वेक्षण सुरू आहे. मात्र विमा कंपन्यांनी अद्याप कोणालाही पीकविमा भरपाई प्रत्यक्ष अदा केलेली नाही. त्याबाबत कृषी विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Budget for Farmer 2026 : शेतकऱ्यांसाठी 'भारत-विस्तार एआय टूल', अर्थमंत्र्यांची घोषणा; नारळ, काजू आणि चंदन उत्पादकांसाठी घोषणा

Textile Industry: कापूस उद्योगासाठी मोठी घोषणा; वस्त्रोद्योगासाठी सर्वसमावेशक ५ कलमी कार्यक्रम जाहीर

Cultural Economy: निसर्गप्रधान जीवनशैली व सांस्कृतिक-अर्थकारण

National Waterways: पुढील पाच वर्षात २० राष्ट्रीय जलमार्ग सुरु करणार; अर्थमंत्र्यांची घोषणा

Grass lands: गवताळ राने जपणे गरजेचे

SCROLL FOR NEXT