
अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी देश आणि वैयक्तिक पातळीवर शेतजमिनीत मोठ्या प्रमाणावर रसायनं, औषधं आणि यांत्रिकीकरणाचा वापर केला गेला. यामुळे जमिनीतून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ तर झालीच, पण दुसरीकडे मातीचं आरोग्य ढासळत गेलं. जमिनीचा पोत बिघडत गेला आणि तिची सुपीकता कमी झाली.
आज ५ डिसेंबर जागतिक मृदा दिनाच्या (World Soil Day 2022 ) निमित्तानं शेतीची उत्पादकता घसरल्यामुळे शेतीला सावरण्यासाठी ‘जमीन सुपीकता’ हाच (Soil Fertility) मंत्र जपावा लागेल. कमी खर्चात जमिनीचे आरोग्य सुधारण्याची संधी शेतकऱ्यांकडे आहे. त्यासाठी जमिनीतील सूक्ष्मजीवसृष्टी तयार केल्यास मातीतून पुन्हा सोने मिळू शकेल. जमिनीचे आरोग्य जपण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रगतीशिल शेतकरी प्रताप चिपळूणकर यांनी दिलेली माहिती पाहुयात.
आरोग्यपत्रिकेनूसार जमिन सुधारणा करणे आवश्यक
आज बरेच शेतकरी माती पिरक्षण तर करतात पण आरोग्यपत्रिकेतील प्रत्येक घटकांची माहिती देत त्यानुसार जमिनीमध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये कोणते बदल करायला पाहिजे, याचे ज्ञान शेतकऱ्यांना दिले जात नाही. आरोग्यपत्रिकेचे दोन भाग आहेत. उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचा अभ्यास करून चालू पिकाच्या खतांच्या शिफारसी हा अर्धा भाग सर्वांना महत्त्वाचा वाटतो. तो तसा समजण्यास सोपाही आहे. मात्र, सूक्ष्मजीव शास्त्राच्या अभ्यासानंतर त्यातील त्रुटी समोर येतात. त्यानूसार दुसरा अर्ध्या भागामध्ये जमिनीचा सामू, क्षारता व सेंद्रिय कर्बाची टक्केवारी असते. यात अति कमी, कमी, समाधानकारक, भरपूर अशा पद्धतीने प्रमाणित आकडेवारीशी सेंद्रिय कर्बाचा तुलनात्मक माहिती असते. त्यानूसार आपल्या जमिनीची सुपिकता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची गरज आहे. तरच मातीचे आरोग्य जपले जाईल.
शेतकऱ्यांने भू-सूक्ष्मजीवशास्त्र शिकलेच पाहिजे
१९६०-७० च्या हरितक्रांतीनंतर २०-२५ वर्षे आपण धान्योत्पादनाचे उच्चांक केले. १९९० नंतर त्याला उतरती कळा लागली.. कृषिशास्त्रावर आज जैवतंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असून, शेतीतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर म्हणजे त्याला प्रतिकारक जात शोधणे असा कल होत आहे. मात्र त्याला निश्चित मर्यादा आहेत. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकवण्याच्या दृष्टीने भू-सूक्ष्मजीवशास्त्र फायद्याचेच ठरणार आहे. कृषी अभ्यासक्रमासह शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणात याचा सखोल समावेश झाल्यास शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल.
सेंद्रिय कर्ब महत्वाचा का आहे?
जमिनीची सुपीकता घटण्यामागे कमी झालेला सेंद्रिय कर्ब जबाबदार आहे. शेणखत, कंपोस्ट खत टाकून कर्ब वाढविण्यास मर्यादा आहे.
प्रमुख मूलद्रव्यातील कर्ब हे कार्बन वनस्पती हवेतील कर्बवायू पासून मिळवितात. तर उर्वरित बाकी दोन घटक पाण्यातून मिळू शकतात. वनस्पती प्रकाश संश्लेषण क्रियेतून अन्ननिर्मिती करतात. प्राणी जगत या वनस्पतींनी तयार केलेल्या अन्नद्रव्यांवर अवलंबून असते, हे सर्वांना माहीत आहे. यातील कर्ब चक्र पूर्ण होण्यामध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांचा सहभाग असतो. हे कर्ब चक्र हवा, जमीन व पाणी अशा पृथ्वीतलावरील तीनही घटकांत चालू असते. प्रत्येक वनस्पती आपापल्या अनुवंशिकतेप्रमाणे वेगवेगळे पदार्थ निर्माण करीत असतात. त्याप्रमाणे बाकी तेरा घटकांच्या गरजा कमी-जास्त बदलत असतात. प्रमुख तीन घटकाव्यतिरिक्त बाकी अन्नघटक कमी प्रमाणात लागत असले तरी त्याचे महत्त्व प्रमुख तीन घटकांपेक्षा किंचितही कमी होऊ शकत नाही. गरजेपेक्षा एखादे अन्नद्रव्य कमी प्रमाणात उपलब्ध असल्यास अन्य सर्व अन्नद्रव्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही उत्पादनामध्ये घट येते. त्यासाठी तो कमतरता असलेला घटक कारणीभूत ठरतो. त्यामुळे जमिनीसाठी सर्वच घटक समान प्रमाणात गरजेचे असतात. कुजण्याच्या क्रियेतून अनेक सेंद्रिय आम्ले, संजीवके व वाढ वृद्धिंगत पदार्थ तयार होत असतात जे आज प्रयोगशाळेत कृत्रिमपणे बनवून विक्रीस बाजारात उपलब्ध आहेत. शेतकऱ्याने हे पदार्थ थेट जमिनीत तयार करायला शिकले पाहिजे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.