सुशांत सुर्वे
योग्य ठिकाणी, योग्य वेळी गुंतवणूक महत्वाची
मागील आठवड्यात, मराठवाड्यात (Marathwada) लाडसावंगी येथे गेलो असताना, समृद्धीच्या शेजारून तेथील शेतकऱ्यांसोबत गाडीवर चाललो होतो. रोडच्या बाजूला मोठे बंगले पाहून शेतकऱ्यांना विचारले तर त्यांनी सांगितले, अनेकांना समृद्धीचे कोट्यावधी रुपये मिळाले.
काहींनी चढाओढीत कोटींचे बंगले बांधले आता अनेकांचे पैसे संपले आहेत. काहींनी दुसरीकडे जमिनी घेऊन शेती चालू केली आहे. यात मोठे भांडवल मिळाले पण गुंतवणूक अनेकांची मोठ्या प्रमाणात घर आणि गाड्यांमध्ये गेली.
दुसरं, काही शेतकऱ्यांचा 5-7 वर्षांपूर्वी डाळिंबशेतीमध्ये चलतीचा काळ होता. यातील एक आजोबा, दोन प्रगतशील शेतकरी यांचा अनुभव असा. आजोबा सांगत होते, डाळिंबमध्ये त्याकाळी खूप पैसे मिळायचे, त्यावेळी 80 लाखाच्या 2 सायपन केल्या.
बाग वाढवली नंतर तेल्या आला. बाग संपल्या.आता तितकी उलाढाल होत नाही. एक सायपन विकून टाकली आहे. पैसा नाही म्हणून आता लोक पण बदलले आहे, नातेवाईक पण पहिल्यासारखी ओळख देत नाही.
आम्हाला त्याकाळी वाटायचं, नेहमीच असे पैसे होत राहतील, म्हणून मोठे मोठे खर्च शेतीत केले. आता दिवस अवघड आले आहेत. थोडीफार बाग बाकी आहे, त्यातून 2 वर्षांत उत्पन्न नाही पण पैसे होतील या आशेवर बाग ठेवली आहे.
फळपिकांची सवय लागली आहे म्हणून भाजीपालामध्ये तितकासा शाश्वत नफा मिळत नाही. एक किराणा दुकान आहे म्हणून बरं चालू नाही. जसं वातावरण बदललं आहे तस अचानक रिव्हर्स गिअर पडल्यासारखे झाले आहे मागील 3-4 वर्षपासून अशी विवंचना त्यांनी माझ्यापाशी बोलून दाखवली.
दुसरे एक प्रगतशील शेतकरी यांच्याच वयाचे, त्यांनी डाळिंबशेती मध्ये उलाढाल होत असताना, 5-7 वर्षांपूर्वी, संगमनेर शहराच्या ठिकाणी 5-6 गुंठे जागा घेऊन ठेवली होती.
नंतर तिचे बाजार खूप वाढले, बिल्डर ला 60-40 टक्केवारी मध्ये डेव्हलोप करायला दिली,यातून पाच मजली बिल्डिंग बिल्डरने बांधली व यातील काही फ्लॅट व काही गाळे या शेतकरीकडे आले.
आलेले फ्लॅट व गाळे त्यांनी भाड्याने दिलेले आहेत, त्यातून आता चांगले उत्पन्न महिन्याकाठी त्यांना येत आहे. आता यांच्याकडे पण एवढी डाळिंब बाग शिल्लक नाही राहिली, पण काही दुग्धव्यवसाय व या गाळे-फ्लॅट मधून मिळणाऱ्या पैशातून चांगले उत्पन्न महिन्याकाठी येते.
काही पैसा, शेती सोडून अन्य ठिकाणी गुंतवणे गरजेचे
मराठवाड्यातील भेटीतील दोन प्रगतशील शेतकऱ्यांपैकी एकाने सांगितले, जेव्हा डाळिंबशेतीत पैसे होत होते...तेव्हा निव्वळ बागच वाढवत बसलो, बाग वाढला तसा खर्च वाढला. पण कमी बागेत लक्ष अधिक राहायचे.
कमी बागेत जेवढे उत्पन्न निघत होते, बाग वाढवल्यानंतर लक्ष कमी झाले. उत्पन्न कमी झाले. पैसे मिळत होते तेव्हा हे दिवस कायम राहतील म्हणून कुठे काही गुंतवणूक केली नाही.
जेव्हा काही अडचणी नव्हत्या शेतीत तेव्हा हातोहात पैसे होत होते, आता कितीही आदबुन काम केले तरी तितके पैसे होत नाही. चलतीच्या काळात, काही पैसे जुने कर्ज फेडण्यात गेले तर काही बाग वाढवण्यात. त्या काळी बाग वाढवण्यापेक्षा, गावात शहरात कुठे काही थोडी गुंतवणूक केली असती तर अधिक फायदा झाला असता असे ते म्हणतात.
दुसरे एक शेतकरी, त्यांनी डाळिंबाच्या पैशातून गावात काही गुंठे जमीन घेतली. नंतर त्या जमिनीवर 3 मजली बिल्डिंग बांधली. नंतर एक मजला एक पतसंस्थेला, दोन दुसऱ्या व्यावसायिकांना भाड्याने दिला. व त्यातून आता भाडे स्वरूपात महिन्याकाठी चांगले उत्पन्न येत आहे.
सांगायचा मतितार्थ एवढाच कि, आपला व्यवसाय असो कि शेती असो ज्यावेळी आपल्याला चांगला रिटर्न येत असतो, तेव्हा त्यातील काही नफा हा एखाद्या स्थावर गुंतवणुकीत गुंतवावा, जो कि आपल्याला पॅसिव्ह इन्कम देईल. म्हणजे परिस्थिती काहीही असो, आपल्याला पगार स्वरूपात काहीतरी स्थिर महिना तेथून येईलच.
व्यवसायातील पैसा, किंवा शेतीतील पैसा काही दिवस पूर्णपणे त्यातच गुंतवावा...पण काही वर्षानंतर जेव्हा आपला जम चांगला असतो, त्यावेळी 100% गुंतवणूक परत तेथेच करण्यापेक्षा त्यातील काही गुंतवणूक हि स्थावर मालमत्तेमध्ये पण असावी.
व्यवसाय अथवा शेतीमध्येही सुगीचे दिवस नेहमीच राहतील असे नाही. पण ज्यावेळी ते आहेत त्यावेळी भविष्यात ते असो वा नसो, आपल्याला पॅसिव्ह इन्कम देईल अशा ठिकाणी गुंतवणूक त्या काळात होणे पण गरजेचे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.