Organic Farming : सेंद्रिय शेती पद्धतीकडे वळताना...

जगभरामध्ये सेंद्रिय शेतीचे विविध प्रकार आहेत. त्यातील कोणत्याही प्रकाराने शेती करणार असलो, तरी जमिनीचा सेंद्रिय कर्ब आणि सुपीकता वाढवणे हे सर्वांत महत्त्वाचे ठरते. त्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, पिकांचे सेंद्रिय अवशेष जमिनीमध्ये गाडले जातील याकडे लक्ष दिले पाहिजे.
Organic Farming
Organic FarmingAgrowon

जितेंद्र दुर्गे, सविता कणसे

सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये (Organic Farming) रासायनिक निविष्ठांचा वापर वर्ज्य मानला जातो. त्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके (Weedicide), संजीवके, विद्राव्य खते (Soluble Fertilizers)यांच्या ऐवजी पिकांच्या योग्य वाढीसाठी सेंद्रिय खते, हिरवळीची खते (Green Manure) आणि जैविक घटकांचा वापर केला जातो.

सोबतच मशागतीय पद्धती उदा. पिकांची फेरपालट, मिश्र पीक पद्धती, सापळा पिकांची लागवड इ. या व्यवस्थापनामध्ये समावेश केला जातो. रासायनिक शेती पद्धतीचे रूपांतर पूर्णपणे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये करावयाचे झाल्यास साधारणत: ४ ते ६ वर्षांचा कालावधी लागतो.

Organic Farming
Organic Farming : कर्ब वाढीसाठी प्रयत्न गरजेचे

यामध्ये सुरुवातीच्या ३ वर्षांमध्ये उत्पादित मालासाठी सेंद्रियचे प्रमाणपत्र उपलब्ध होत नाही. मात्र पुढे ४ ते ६ वर्षांमध्ये शेतीचे पूर्ण सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर त्यास सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे प्रमाणपत्र प्राप्त होऊ शकते.

या प्रमाणपत्राच्या आधारे आपल्या शेती उत्पादनांची विक्री सेंद्रिय प्रमाणित उत्पादित माल स्वरूपामध्ये देश विदेशामध्ये विक्री करता येते. हे प्रमाणीकरण करण्यासाठी भारत सरकारने काही विशिष्ट यंत्रणा नेमलेल्या आहेत. त्यांच्याकडून सेंद्रिय शेतीचे प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक असते.

Organic Farming
Organic Farming : सेंद्रिय शेतीचा धाडसी प्रयोग

सेंद्रिय शेतीची सुरुवात करताना...

सेंद्रिय शेतीखाली आणावयाच्या एकूण क्षेत्राच्या एक तृतीयांश क्षेत्रावर वनशेती करणे क्रमप्राप्त असते. त्यात सुबाभूळ, गिरिपुष्प, शेवरी, शेवगा, हादगा, आपटा, बोर, आंबा, कडुनिंब, साग, सीताफळ, बांबू अशा वृक्षांची लागवड करून जैवविविधता जपावी लागते.

एक तृतीयांश क्षेत्रावर नगदी पिकांची लागवड करावी.

राहिलेल्या एक तृतीयांश क्षेत्रावर अन्नधान्य पिकांची लागवड करावी.

या लागवड पद्धतीचा अवलंब केल्यास प्रचलित शेतीमध्ये पिकांची जैवविविधता निर्माण होते. त्यामुळे सेंद्रिय शेतीसाठी पूरक असे सूक्ष्म वातावरण निर्मिती शक्य होते.

जमीन जिवंत करण्याकरिता...

जिवंत जमीन हे सेंद्रिय शेतीचा केंद्र बिंदू आहे. ती तयार करण्यासाठी जमिनीतील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाणात २ टक्क्यांपर्यंत वाढ करणे गरजेचे असते. सध्या महाराष्ट्रातील जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण खूप कमी (०.८ टक्क्यापेक्षा कमी) झाले आहे.

जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाची उपलब्धता करण्यासाठी पिकाचे सर्वच प्रकारचे शिल्लक अवशेष शेतातील जमिनीमध्ये गाडले जातील, किंवा त्यापासून कंपोस्ट बनेल, याकडे लक्ष द्यावे. उदा. शेतातील काडी- कचरा, धसकटे, पिकाचे अवशेष, पाला-पाचोळा, निंदण केलेले गवत, पीक उत्पादनाचे टाकाऊ घटक इ. अशा पदार्थांना शेणखताची जोड दिल्यास ते लवकर कुजतात.

त्यांच्याद्वारे सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण २ टक्क्यांपर्यंत निश्‍चितच नेता येईल.

Organic Farming
Organic Farming : सृष्टिचक्रात शेतकरी महत्त्वाचा घटक : यादव

जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारला की जमिनीचे भौतिक व रासायनिक गुणधर्मांमध्ये मोठी सुधारणा होते. उदा. जमिनीचा सामू उदासीनच्या जवळपास येतो. माती कणांची जलधारण क्षमता वाढते. अतिरिक्त पाऊस व अन्य स्थितीमध्ये पाण्याचा निचरा चांगल्या प्रकारे होतो.

परिणामी, जमीन अधिक काळ वाफसा स्थितीमध्ये राहते. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची व अन्य जैविक घटकांची संख्या वाढते. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते.

सेंद्रिय शेती (ऑरगॅनिक फार्मिंग) प्रमाणेच इकोफार्मिंग, इकोफ्रेंडली फार्मिंग, इकॉलॉजीकल फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, बायोलॉजिकल फार्मिंग, बायोडायनॅमिक फार्मिंग, बायोइंटेसिव्ह फार्मिंग, कॉन्झर्व्हेटिव्ह फार्मिंग, नो टिलेज फार्मिंग, झिरो टिलेज फार्मिंग, मिनिमम टिलेज फार्मिंग, पर्माकल्चर, परमनंट ॲग्रिकल्चर, रिजनरेटिव्ह ॲग्रिकल्चर, इंडिजिनस ॲग्रिकल्चर, अल्टरनेट ॲग्रिकल्चर अशी सेंद्रिय शेतीला जवळ जाणाऱ्या पद्धती देश विदेशात प्रचलित आहेत. त्यामध्ये फारच थोडा फरक आहे.

मात्र या सर्व प्रकारामध्ये जमिनीची सुपीकता आणि त्यातील सेंद्रिय कर्ब अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे सेंद्रिय शेतीच्या कोणत्याही प्रकारामध्ये आपण आपली शेती नेणार असू, तर त्याकडे प्रथम लक्ष दिले पाहिजे.

या पद्धतीने पिकांचे व्यवस्थापन करताना सेंद्रिय निविष्ठा, जैविक निविष्ठा, वनस्पतिजन्य निविष्ठा यांचा बीजप्रक्रिया; अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन; किडी-रोग आणि तणांचे व्यवस्थापन करण्यावर भर दिला पाहिजे. सध्या सेंद्रिय निविष्ठांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या अत्यल्प आहेत. त्यामुळे निविष्ठांचे स्रोतही मर्यादित आहेत.

त्यांच्या गुणवत्ता व दर्जा, उपलब्धता याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रामुख्याने स्वतः अनेक निविष्ठा घरगुती पातळीवर किंवा गट पातळीवर तयार करून वापराव्या लागतात.

त्यामुळे त्यांची मुबलक प्रमाणातील उपलब्धता ही एक समस्या ठरत आहेत. अशा उत्पादनाच्या निर्मितीसाठी शेतकऱ्यांच्या गटाने किंवा शेतकरी कंपन्यांनी पुढाकार घेणे गरजेचे ठरणार आहे. उदा. गांडूळ खताचे उत्पादन, कडुनिंबाचा अर्क, दशपर्णी अर्क निर्मिती इ.

अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी हिरवळीची पिके

इनसिटू पद्धत : बोरू, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या खत पिकाची लागवड पिकासोबत किंवा काहीशी आधी पीक फुलोऱ्याच्या सुरुवातीच्या अवस्थेत असताना मातीत गाडून घेणे. बांधावर किंवा अन्यत्र वनशेतीतील झाडे लावून त्यांची पाने व कोवळ्या फांद्या जमिनीमध्ये गाडणे, याला ‘ग्रीनलिफ मॅन्युरिंग’ असे म्हणतात. उदा. ग्लिरिसिडीया, सुबाभूळ, सिझालपिनीया, करंज इ. वनस्पतीच्या कोवळ्या फांद्या उभ्या पिकात दोन ओळींतील जागेत साधारणत: २.५ ते ३.२५ टन प्रति एकर याप्रमाणे पसरवून द्याव्यात.

सापळा पिके

मुख्य पिकाच्या संरक्षणासाठी पिकांची लागवड करताना किंवा काही काळ अधिक सापळा पिकांची लागवड करण्याची शिफारस केली जाते.

सापळा पीक उद्देश

झेंडू मावा व इतर किडींपासून पिकाचे रक्षण करते. पिकाचा सूत्रकृमीपासून बचाव करते. मधमाश्या व मित्र कीटकांना आकर्षित करते.

तूर फुलोरा अवस्थेत असताना मित्र कीटकांना व परजीवी कीटकांना आकर्षित करते. त्यांचे आवडीचे निवासस्थान आहे.

गाजर फुलोरा अवस्थेतील गाजर मधमाश्या, परजीवी कीटक, मित्र कीटकांना आकर्षित करते.

मोहरी उत्तम सापळा पीक म्हणून काम करते. मधमाश्या व मित्र कीटकांना आकर्षित करते.

मका अनेक मित्र कीटक व परजीवी कीटकांचे निवासस्थान आहे. पक्ष्यांना बसण्यासाठी पक्षिथांबा म्हणूनही उपयुक्त.

कारळा मधमाश्या व मित्र कीटकांना मोठ्या संख्येने आकर्षित करते.

गाजर गवत निर्मूलनासाठी मेक्सिकन कीटक

जैविक पद्धतीत गाजर गवत निर्मूलनासाठी झायगोग्रामा बायकलरॅटा या मेक्झिकन कीटकाचा वापर करता येतो.

सेंद्रिय खताद्वारे अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन

सेंद्रिय खताचा प्रकार द्यावयाची मात्रा

शेणखत २.०-३.२५ टन / एकर

कंपोस्ट खत २.० टन / एकर

गांडूळ खत १.२५-१.५ टन / एकर

निंबोळी पेंड ४००-६०० किलो/ एकर

तलावातील गाळ ३.२५ - ४.० टन / एकर

उसाची मळी २.७५ - ४.० टन / एकर

तेलबिया पेंड ४००- ६०० किलो / एकर

जितेंद्र दुर्गे, ९४०३३०६०६७

सहयोगी प्राध्यापक - कृषी विद्या,

श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com