Organic Farming : सेंद्रिय शेतीचा धाडसी प्रयोग

सेंद्रिय शेती (Organic Farming) म्हणजे गोमूत्राची शेती, सोपी शेती म्हणणाऱ्यांनी वसंत जानतेची शेती बघावी. ही शेती आव्हानात्मक आहे. हे सामान्य शेतकऱ्यांचं काम नाही. वसंत म्हणतो, ही सेंद्रिय शेती करणं म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणं आहे. निसर्गाच्या चक्रात फारसा हस्तक्षेप न करता केली जाणारी ही सेंद्रिय शेती मला मनापासून भावते. शिवाय यातून मी स्वतःचं एक वेगळं विश्‍व निर्माण करतोय, त्याचा आनंद आहेच. यातूनही पैसे मिळणार आहेतच. फक्त तेवढा काळ वाट बघण्याची तयारी हवी.
Organic Farming
Organic Farming Agrowon

हाडोळी (ता. चाकूर) हे लातूर जिल्ह्यातील आडवळणाचं गाव. हे माझं आजोळ. दहावीपर्यंत मी उन्हाळी सुट्ट्यात इथं यायचो. वसंत रंगनाथप्पा जानते हा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी लहान असावा. पण शालेय आयुष्यात (School Life) सुट्ट्यांचा काळ एकत्र घालविल्यामुळे मित्रासारखे संबंध. त्याचा स्वतःचा व्यवसाय असून बंगळूर, मुंबई, दिल्ली इथं त्याची कार्यालयं आहेत.

Organic Farming
Organic farming: केंद्र सरकार १४ दशलक्ष हेक्टर जमीन सेंद्रिय शेतीखाली आणणार

मी २०११ मध्ये शिरूर ताजबंदला (ता. अहमदपूर, जि. लातूर) शेतीत राहायला आलो. मी २०१३ मध्ये छोटीशी फळबाग लावली. त्यानंतर तो मला भेटायला आला. त्याने दोन वर्षांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीत माझ्यासारखीच विविध फळांची बाग लावली. एकेदिवशी तो शेतात असताना गवतावर तणनाशक फवारलं जात होतं. ते गवत जळून गेलं. काही दिवसांनी तिथं गवत उगवलं.

तिथंच जनावरं चारली जात असल्याचं त्यानं बघितलं. त्या उगवलेल्या गवतात तणनाशकाचा अंश असणारच. ते गवत गाई-म्हशींच्या पोटात जाणार. ते दुधात उतरणार आणि पुन्हा आपल्या पोटात जाणार! ही साखळी लक्षात आल्याने तो अस्वस्थ झाला आणि २०१६ पासून शेतीत कोणतीही रासायनिक खते, कीटकनाशके वापरायची नाहीत, असा निर्णय त्याने घेतला.

Organic Farming
Organic Farming : संवर्धित शेतीला प्रोत्साहनाची गरज

शेती हा वसंतचा पोटापाण्याचा व्यवसाय नसल्याने त्याला प्रयोग करणं सहज शक्य होतं. रासायनिक खत, फवारण्यांशिवाय पहिल्या वर्षी उत्पादन जेमतेम आलं. दुसऱ्या वर्षी मोठी घट झाली. सोयाबीनसारखी पिकं सेंद्रिय पद्धतीने पिकवूनही ती नेहमीच्या सोयाबीनच्या भावानेच विकली जात होती. त्याने २०१८ मध्ये ऊस लावला. तो साधारण आला. साखर कारखान्याच्या मजुरांनी ऊसतोडीसाठी २० हजार रुपयांची मागणी केली. त्याने पैसे द्यायला नकार दिला. स्वतः ऊस गाळण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याला बरीच धावपळ करावी लागली.

एक प्रयोग म्हणून त्याने दहा किलो आणि एक किलो वजनाच्या गुळाच्या ढेपी तयार केल्या. पहिल्यांदाच गूळ काढल्याने नातेवाइकांना भेट म्हणून दिला. सहा टन गूळ होता. बंगळूरमधील ओळखीच्या लोकांना त्याने नमुन्यादाखल गूळ दिला. त्याची चव सगळ्यांना आवडली. शिल्लक गूळ ३० रुपयांपासून ते १०० रुपये किलो दराने विकला. कारखान्याला ऊस घातला असता त्यापेक्षा गुळाचे अधिक पैसे झाले. हा अनुभव त्याच्यासाठी उत्साहवर्धक होता. त्याच्या लक्षात आलं, की शेतीतील सेंद्रिय उत्पादन विकायचं असेल तर प्रक्रिया व विक्रीची व्यवस्था उभी करावी लागेल. कंपनी स्थापन करावी लागेल. तिचं सर्टिफिकेशन करावं लागेल.

Organic Farming
Organic Farming : कर्ब वाढीसाठी प्रयत्न गरजेचे

वसंतने डिसेंबर २०१८ मध्ये Vj Organic farms ही कंपनी स्थापन केली. ही कंपनी सेंद्रिय शेतीमाल खरेदी करते. शिवाय शेतकऱ्यांना ऑरगॅनिक सर्टिफिकेशन करून देण्यासाठी मदत करते. त्याने प्रोसेसिंगसाठी दोन वेगळ्या कंपन्या स्थापन केल्या. सरकारी नियमानुसार कंपनीचे २०० सभासद असतील तर अनुदान, सवलती मिळतता. आता हे सभासद आणणार कोठून? हे शक्य नसल्याने वसंतने दहा शेतकरी सभासदांची हडोळी ऑरगॅनिक प्रोड्यूसर कंपनी जुलै २०१९ मध्ये सुरू केली. बारा एकरांवर सुरुवात केली. आज २०२२ मध्ये शंभर एकरवर सेंद्रिय पिकांचं उत्पादन घेतलं जातंय. ही कंपनी गूळ, पीठ, डाळी यांचं उत्पादन घेते. तसेच शेवग्याची, पपयाची पानं, टोमॅटो, कांदा हे ड्रायर मशिनमध्ये वाळवलं जातं. सनड्राय केलेला हा माल साधारण वर्षभर टिकतो.

वसंतने एनजे फूड कंपनीची सुरुवात CMEGP(Chief Minister Employment Generation Program) या योजनेअंतर्गत केली. जिल्हा उद्योग केंद्राला महिला सक्षमीकरणात रस होता. वसंतने ही कंपनी त्याची मुलगी नेहाच्या नावाने सुरू केली. या कंपनीसाठी त्याने बॅंकेकडून ५० लाखाचं कर्ज घेतलंय. या युनिटला १७.५ लाखाची सबसिडी मिळून ते बॅंकेकडे जमा आहे. तीन वर्ष हे युनीट व्यवस्थित चालल्यानंतर हे पैसे कंपनीच्या खात्यावर जमा होतील.

Organic Farming
Organic Farming : सेंद्रिय शेतीची वैशिष्ट्ये काय आहेत?

सध्या एवढ्या रकमेवरचं व्याज लागत नाही. मुळात वसंतला बॅंकेकडून कर्ज घ्यायचं नव्हतं. मात्र बॅंकेमार्फत ही योजना राबवली तरच तिला सबसिडी आहे. वसंत बॅंकेच्या कामावर खुष नाही. सबसिडीचे निम्मे पैसे बॅंकेचे व्याज व प्रोसेसिंग फीसवरच जातील, असं त्याला वाटतं. २०२१ साली हे प्रोसेसिंग युनिट सुरू झालंय. इथं टोमॅटो केचप, लिंबु सरबत, लिंबू लोणचं, जांभूळ ज्यूस, मॅंगो पल्प, पेरू जाम तयार होतं. त्याचं बॉटलिंग, लेबलिंगचं कामही इथंच होतं.

या तिन्ही कंपन्यांकडे सेंद्रिय शेती व उद्योगाबाबतची स्वतंत्र प्रमाणपत्रं आहेत. ‘अपेडा’’अंतर्गत CB (Certification Body) ही स्वायत्त संस्था सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण करते. ‘सीबी’’चे लोक प्रत्यक्ष शेतावर येऊन काटेकोर पाहणी करूनच सर्टिफिकेट देतात. एका सर्टिफिकेटसाठी ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च येतो. दरवर्षी नूतनीकरण करावं लागतं.

वसंतचं हे सेंद्रिय शेतीचं पाऊल धाडसी आहे. त्याच्याकडे स्वत:चं भांडवल आहे, म्हणूनच हे शक्य झालंय. एनजे फूड कंपनीत आजपर्यंत त्याने दीड कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय. हडोळी ऑरगॅनिकमध्ये ५० लाखांची, तर शेतीत ५० लाख रुपये गुंतवलेत. थोडक्यात, एकूण अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक आहे. प्रॉडक्शन आणि ऑपरेशन्स यात १५ जण, तर विक्री आणि वितरणात पाच जण काम करत आहेत. याशिवाय शेतीत रोजंदारी मजूर सतत लागतात.

सेंद्रिय शेती उत्पादनात वसंतच्या कंपनीने विश्‍वासार्हता निर्माण केलीय. आज ग्राहकांच्या मागणीइतका तो माल पुरवू शकत नाही. याचं कारण कच्च्या मालाची पुरेशी उपलब्धता नाही. ज्या शेतकऱ्यांकडं सेंद्रिय शेतीचं प्रमाणपत्र आहे; त्यांच्याकडूनच तो माल खरेदी करू शकतो. हीच खरी अडचण आहे. शेतीत सेंद्रिय उत्पादन काढताना शेणखत, जैविक मायक्रोन्यूट्रियन्ट, जिवामृत, डीकंपोझर यांचाच वापर करावा लागतो. कुठल्याही औषधाची फवारणी करण्यापूर्वी ‘सीबी’’कडून लेखी परवानगी घ्यावी लागते. हे काम थोडंस वेळ खाणारं असल्याने पिकांवर, फळझाडांवर रोग पडू नये याबाबतीत अधिक जागरूक राहावं लागतं. अर्थात, रासायनिक खते, कीटकनाशके वापरणे बंद केल्यानंतर जमिनीची प्रतिकारशक्ती वाढते, असं त्याचं मत आहे.

वसंत जानते हा काही केवळ शेतकरी नाही. तो यशस्वी उद्योजक आहे. सेंद्रिय धान्य प्रक्रिया करून विकले तरच त्याला चांगले पैसे मिळू शकतात, हे त्याला माहीत आहे. त्यामुळेच त्याने स्वत:चा प्रक्रिया उद्योग उभारलाय. शहरी ग्राहकांना उत्तम माल चांगल्या पॅकिंगमध्ये लागतो, हे लक्षात घेऊन ती पण व्यवस्था निर्माण केलीय. आज तो त्याचा माल चार चॅनेलद्वारे विकतो. एक सेंद्रिय माल विकणाऱ्या दुकानांमधून, दुसरं इंटरनेटच्या माध्यमातून ॲमेझॉनसारख्या वितरक कंपन्यांकडून. तिसरं माध्यम म्हणजे थेट ग्राहकांना मालाची विक्री. याशिवाय मुंबईच्या विविध भागांत दर आठवड्याला सेंद्रिय उत्पादनाचे स्टॉल लागतात. इथंही तो त्याच्या कंपनीचा स्टॉल लावतो.

गतवर्षी आठवड्याला १०० ते १५० किलो माल विकला जायचा. या वर्षी तो ५०० किलोवर आला. पुढच्या सहा महिन्यांत एक टन आणि त्यानंतर आठवड्याला दोन टन माल विक्री करण्याचं उद्दिष्ट त्यानं ठेवलंय. मुंबई, हैदराबाद आणि बंगळूर ही त्याच्या माल विक्रीची तीन मुख्य ठिकाणं आहेत. त्याचा ३००-३५० च्या घरात हक्काचा ग्राहक तयार झालाय. वसंत जानते याची ही सगळी गुंतवणूक, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि उलाढाल बघितली तर, सध्या हा उद्योग नुकसानीत असणार, हे कोणाच्याही लक्षात येऊ शकतं. मी वसंतला थेट विचारलं तेव्हा तो म्हणाला, पहिल्या वर्षी म्हणजे २०२१ साली सुमारे ३० लाख रूपयांचा तोटा झाला. चालू वर्षी तो २० लाखांवर येईल. २०२४ साली आम्ही ‘ना नफा ना तोटा’’ अशा स्थितीत येऊ. सध्या माल विक्रीची वार्षिक उलाढाल ३५ लाखावर आहे. ती कोटीच्या पुढे जाईल, तेव्हा इथं फायदा होऊ लागेल.

मी वसंतचं सगळं काम बारकाईने बघितलं. शेती असो, कारखाना की वितरण, त्याने सगळीकडं सिस्टीम तयार केलीय. योग्य माणसं निवडलीत. सगळ्या कामात एक शिस्त आहे. भरपूर भांडवल, प्रशिक्षित मनुष्यबळ, सेंद्रिय शेतीवर निष्ठा, प्रेम, संयम आणि अफाट मेहनत यावर वसंतच्या सेंद्रिय शेती-उद्योगाचा डोलारा उभा राहिलाय. मनुष्यबळाची अडचण त्याला भेडसावते आहेच. खेड्यांमध्ये काम करण्याची मानसिकता राहिलेली नाही. अशा एका खेड्यात तो हे सगळं काम करतोय. कितीही कष्ट करावे लागले, तरी त्याला हा उद्योग यशस्वी करायचाच. खऱ्या अर्थाने तो सेंद्रिय शेतीसाठी वेडा झालाय. हे वेडेपण यश मिळवून देतंच.

पण असं हे एका विषयाला वाहून घेणं खूप कठीण असतं. सेंद्रिय शेती म्हणजे गोमूत्राची शेती, सोपी शेती म्हणणाऱ्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारं हे ठळक उदाहरण आहे. सेंद्रिय शेती किती आव्हानात्मक आहे, याची कल्पना वसंतची शेती बघून येते. हे सामान्य शेतकऱ्यांचं काम नाही. खरं तर मी सेंद्रिय शेतीचा टीकाकार आहे तो यामुळेच. ही शेती करणं म्हणजे, पायात पुन्हा दुसरी मजबूत बेडी घालून घेणं आहे. शिवाय यासाठीचं भांडवल, प्रक्रिया उद्योग, विक्री व्यवस्था कशी उभी करायची? मी त्याला मागेच सांगितलं, की ही शेती मी नाही करणार.

अर्थात, ज्यांना कोणाला सेंद्रिय शेतीमध्ये मनापासून रस आहे त्यांच्यासाठी वसंतचं उदाहरण दिशादर्शक आहे. अशा शेतकऱ्यांनी एक तर अशा एखाद्या कंपनीशी स्वत:ला जोडून घ्यावं किंवा भांडवल गुंतवणुकीपासून ते प्रक्रिया व विक्रीपर्यंतची साखळी स्वत: निर्माण करावी. यश मिळण्यासाठी वाट बघण्याची तयारी हवी. सरकारचं सध्याचं धोरण बघता आगामी काळात या शेतीला बरे दिवस येऊ शकतात. सेंद्रिय शेतीत उतरायचं, तर सगळ्या बाबींचा गांभीर्याने विचार करून उतरावं. हे काम सोपं नाही.

मी शेवटी वसंतला विचारलं, की हे रात्रं-दिवस परिश्रम तू कशासाठी करतोयस? पैसे तर तुला यापेक्षा कमी श्रमात दुसऱ्या कशातही मिळतील. वसंत बोलला, ही सेंद्रिय शेती करणं म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणं आहे. त्यात मला आनंद आहे. निसर्गाच्या चक्रात फारसा हस्तक्षेप न करता केली जाणारी ही सेंद्रिय शेती मला मनापासून भावते. शिवाय यातून मी स्वत:चं एक वेगळं विश्‍व निर्माण करतोय, त्याचा आनंद आहेच. यातूनही पैसे मिळणार आहेतच. फक्त तेवढा काळ वाट बघण्याची तयारी हवी.

मात्र मी कोणालाही सेंद्रिय शेती करा, असा सल्ला देत नाही. हे आव्हान जो स्वीकारू शकेल, तो यात उतरेलच!

: ९०९६१३९६६६, ९४२२४६९३३९

(लेखक लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार व शेतकरी आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com