
Soybean Pest : सध्याचा काळ हा खरीप पिकांवर विविध किड रोग येण्याचा काळ आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी किड, रोग नियंत्रणासाठी फवारणीची कामे सुरु आहेत. ही किटकनाशके अत्यंत विषारी असल्यामुळे त्यांची फवारणी नीट काळजी घेऊन करावी लागते. थोडी जरी कसूर झाली तर त्याची मोठी किंमत चुकवावी लागते. पण तरिही काही शेतकरी कीटकनाशक खरेदी करताना आणि फवारताना खबरदारी घेत नाहीत. त्यामुळे मोठे अपघात घडतात. अस होऊ नये म्हणून कीटकनाशक खेरदी करताना आणि फवारताना काय काळजी घ्यायची याबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती पाहुया.
किटकनाशके खरेदी करताना परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करा. खरेदी करतेवेळी बॅच क्रमांक, नोंदणी क्रमांक, लेबलवरिल उत्पादन तारीख, एक्सपायर तारीख नक्की तपासा. बील घेतेवेळी त्यावर सर्व तपशील आहे का? याची खात्री करा. किटकनाशक खरेदी करताना किडीची नीट ओळख असण गरजेच आहे. त्यासाठी किडीसाठी शिफारस केलेल्या कीटकनाशकाचीच खरेदी करा. विविध किडीसाठी शिफारस असलेल्या किटकनाशकाची माहिती तुम्हाला www.cibrc.nic.in या वेबसाईटला मिळेल. किंवा तुमच्या विभागातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांची मदत घ्या.
किटकनाशके वापरण्यापुर्वी सोबत दिलेले माहिती पत्रक वाचून त्यात दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करा. आणि माहितीपत्रक व बील नीट जपून ठेवा.
ही झाली किटकनाशक खरेदी करताना घ्यायची काळजी आता पाहुया फावारणी करताना काय काळजी घ्यायची ते.
फवारणीसाठी मिश्रण तयार करताना किटकनाशकाची शिफारशीनूसार मात्रा मोजपात्राने मोजून घ्या. दाणेदार किटकनाशके काढण्यासाठी . लांब दांडीच्या चमचाचा वापर करा.
सुरुवातीला एका बकेटमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मोजलेले कीटकनाशक टाकून लाकडी काठीने ढवळाव. अस एकजीव केलेल मिश्रण हळूवार पंपातील मोजलेल्या पाण्यात टाकून ढवळून घ्याव आणि त्यानंतरच फवारणी करावी. फवारणी करताना संरक्षणात्मक किटचा वापर करावा, यामध्ये हातमोजे, टोपी, गॉगल, जॅकेट, मास्क आणि पायात बुट असण गरजेच आहे. कारण अनेक शेतकरी अशी कोणतीही खबरदारी न घेता डायरेक्ट फवारणीचा पंप हातात घेतात. असं केल्यामुळे वाऱ्यामुळे कीटकनाशक नाकातोंडात जाऊन विषबाधा होऊ शकते. याशिवाय शरिरावर जखम असलेल्या व्यक्तींनी फवारणी करु नये. गळके फवारणी पंप वापरु नका. तणनाशके आणि किडनाशके फवारण्याचा पंप वेगवेगळा असावा. फवारणी पंपाच्या नोझल मध्ये अडकलेला कचरा तोंडाने फुंकून साफ करु नये. त्याऐवजी खराब झालेला टुथब्रश किंवा बारीक तार वापरावी. फवारणी करताना खाद्यपदार्थ खाणं किंवा धुम्रपान करु नका.
पिक फुलोऱ्यात असताना किटकनाशकाची फवारणी करु नका त्यामुळे मित्रकिटकांच संरक्षण होईल.
फवारणी झाल्यानंतर विशिष्ट काळापर्यंत फळे भाज्या खाण्यासाठी वापरु नका. याशिवाय फवारणी झालेल्या ठिकाणी जनावरांना चरण्यासाठी सोडू नका. फवारणी झाल्यानंतर रिकामे डबे धुऊन वापरु नका. ते काठीने ठेचून जमिनीत गाडावेत. उरलेली किटकनाशके कुलूपबंद ठिकाणी ठेवावीत.
फवारणी झाल्यानंतर आंघोळ करावी आणि कपडे स्वच्छ धुवावेत. अशा प्रकारे फवारणी करताना काळजी घेतल्यास विषबाधे सारखे प्रकार घडणार नाहीत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.