
सुरेश पाटील
कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकरी यांच्या कष्टातून भारत देश अन्नधान्यात आत्मनिर्भर बनला. आज जगाची भूक भागविण्याची क्षमता भारत देशात आहे. अनेक देशांत आपला शेतीमाल निर्यात होतोय.
हे सारं करत असताना यातील दोन घटक भारत सरकार आणि कृषी शास्त्रज्ञ याचं ठीक चाललंय पण शेतकऱ्यांचं अजून काहीच ठीक नाही. उलट देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या (Farmer Suicide) वाढत आहेत.
एखाद्या समारंभात, कार्यक्रमात किंवा प्रवास करताना सहज जरी ओळख करून देताना ‘शेती करतोय’ असं म्हटलं की अगदी तुच्छतेने पाहिले जातं.
ही सामाजिक दरी कोणी तयार केली? एखाद्या चित्रपटात, नाटकात काम करणारा कलाकार असेल किंवा क्रीडा क्षेत्रातील खेळाडू असेल फार फार तर राजकारणातील छोटा कार्यकर्ता जरी असला तरी त्याला एक सामाजिक वलय आहे, त्याच्याभोवती गर्दी दिसते. पण शेतकऱ्यासाठी असं होताना दिसत नाही.
कित्येक बॅंकानी शेतकऱ्याचं सिबिल खराब आहे म्हणून ऐन हंगामात पत पुरवठा खंडीत केला. शेतकरी कधीच फक्त आपल्या कुटुंबापुरता विचार करत नाही की आपल्या कुटुंबापुरतच पिकवत नाही. साऱ्या सृष्टीची त्याला काळजी आहे.
पीक बहरात आलं की पशु-पक्षी-कीटक आणि मानव सारेजण त्या पिकलेल्या धान्यावर हक्क सांगतात. मग साऱ्यांची भूक भागवणाऱ्या ‘अन्नदात्याचं’ ऐन हंगामात सिबिल कसं खराब होतंय? कित्येक तरुण अत्यंत धाडसाने शेती क्षेत्रात येत आहेत. पण त्याचं वय विवाहयोग्य झाल ती अडचण यायला सुरुवात होते.
हल्ली माणसांची लग्न त्याच्या प्रोफेशनसी होत आहेत. जसे की डॉक्टरचं लग्न डॉक्टर मुलीशी. वकिलाचे लग्न वकिली करणाऱ्या मुलीशी आणि शिक्षकाचे लग्न शिक्षिकेशी! अशी कितीतरी उदाहरण देता येतील, याला काही अपवादही असतील.
परंतु शेती करणाऱ्या तरुणाचा विवाह जमवणे ही एक सामाजिक समस्या झाली आहे. कोणतीही मुलगी सहजासहजी ‘शेतकरी नवरा’ म्हणून स्वीकारण्यास तयार नाही.
खरं तर शेतकऱ्यांना समजतच नाही की आपलं शोषण कोण करतंय? राजकीय लोक केवळ राजकारणासाठी वापर करतात. अधिकारी लोक अधिकार गाजवण्यासाठी अन् व्यापारी लोक फसवणूक करण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करतात.
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत लोकप्रतिनिधी असंवेदनशील वक्तव्ये करतात. समाज बांधव म्हणून आपण कधी तरी त्यांच्याकडे त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेकडे गांभीर्याने पाहणार आहोत की नाही?
सुरेश पाटील (कृषि पंडित) बुदिहाळ जि. बेळगांव
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.